SambhajiRaje Chatrapati : शिवबंधन बांधण्यासाठी ‘वर्षा’वर या, उद्धव ठाकरेंचा संभाजीराजे छत्रपतींना निरोप, पक्षप्रवेश निश्चित?

| Updated on: May 22, 2022 | 5:44 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा संभाजीराजेंना निरोप देण्यात आला. उद्या दुपारी 12 वाजता शिवबंधन बांधण्यासाठी वर्षावर येण्याचं संभाजीराजेंना सांगण्यात आलं.  त्यामुळे संभाजीराजे छत्रपती यांचा शिवसेना प्रवेश आता निश्चित मानला जात आहे. मात्र, यामुळे राज्यसभा निवडणुकीची रंगत वाढली आहे.

SambhajiRaje Chatrapati : शिवबंधन बांधण्यासाठी वर्षावर या, उद्धव ठाकरेंचा संभाजीराजे छत्रपतींना निरोप, पक्षप्रवेश निश्चित?
Follow us on

मुंबई : राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेना आग्रही राहिली. त्यामुळे संभाजीराजे छत्रपती (SambhajiRaje Chatrapati) यांची कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं. अशावेळी संभाजीराजे आणि शिवसेना (Shivsena) नेत्यांमध्ये हॉटेल ट्रायडंटमध्ये महत्वाची बैठक पार पडली. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा संभाजीराजेंना निरोप देण्यात आला. उद्या दुपारी 12 वाजता वर्षा बंगल्यावर शिवबंधन बांधण्यासाठी या, असा निरोप उद्धव ठाकरे यांनी संभाजीराजेंना दिला आहे. शिवाय शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही संभाजीराजेंना फोन केल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे संभाजीराजे छत्रपती यांचा शिवसेना प्रवेश आता निश्चित मानला जात आहे. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीची रंगत आता अधिक वाढल्याचं पाहायला मिळत आहे.

महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 6 जागांसाठी 10 जून रोजी मतदान होणार आहे. राजकीय पक्षांच्या संख्याबळानुसार भाजपचे 2, शिवेसना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा प्रत्येकी एक उमेदवार निवडून येऊ शकतो. अशावेळी सहाव्या जागेसाठी संभाजीराजे छत्रपती यांनी आपली अपक्ष उमेदवारी जाहीर केली. तसंच सर्व राजकीय पक्षांना सहकार्याचं आवाहन केलं. मात्र, शिवसेनेकडून दुसरा उमेदवार दिला जाण्याची घोषणा करण्यात आली. इतकंच नाही तर संभाजीराजे यांना शिवसेनेकडून ही जागा लढवण्याचा प्रस्तावही देण्यात आला. त्यानुसार त्याचवेळी सुरुवातीला पाठिंबा देणारे शरद पवार यांनी आपली भूमिका बदलून शिवसेना ज्या कुणाला उभा करेल त्याला आमची शिल्लक मते देऊ, असं स्पष्ट केलं. त्यामुळे महाविकास आघाडीकडून संभाजीराजे यांची कोंडी करण्यात आल्याचं पाहायला मिळालं.

शिवसेना शिष्टमंडळ आणि संभाजीराजेंमध्ये चर्चा

आज शिवसेना नेते अनिल देसाई, उदय सामंत आणि मिलिंद नार्वेकर यांनी संभाजीराजेंची भेट घेतली. ट्रायडंट हॉटेलमध्ये त्यांच्यात बैठक पार पडली. त्याचवेळी उद्या दुपारी 12 वाजता शिवबंधन बांधण्यासाठी वर्षावर या, असा उद्धव ठाकरे यांचा निरोप संभाजीराजेंना देण्यात आला. शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही संभाजीराजेंना फोन करत शिवसेनेच प्रवेश करण्याच्या प्रस्तावाचा पुनरुच्चार केला. तर संभाजीराजे छत्रपती यांनी मला शिवसेना पुरस्कृत उमेदवार घोषित करा अशी मागणी संभाजीराजे यांनी शिवसेनेच्या शिष्टमंडळाकडे केल्याचं कळतंय. त्यामुळे राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी रंगत वाढल्याचं पाहायला मिळत आहे.

हे सुद्धा वाचा

शरद पवारांनी भूमिका बदलली?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संभाजीराजे छत्रपती यांना राष्ट्रवादीचा पाठिंबा जाहीर केला होता. तसंच शिल्लक राहिलेली मतं त्यांना दिली जातील अशी घोषणाही त्यांनी केली होती. मात्र, शिवसेनेकडून राज्यसभेसाठी दुसरा उमेदवार दिला जाणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आणि आता पवारांनी आपली भूमिका बदलल्याचं पाहायला मिळत आहे. संभाजीराजे असोत की, आणखी कुणी, राष्ट्रवादी काँग्रेसची शिल्लक राहणारी मतं शिवसेनेच्या उमेदवाराला दिली जातील, अशी घोषणा पवार यांनी केली आहे.

राज्यसभेच्या सहाव्या जागेबाबत संभाजीराजे यांनी अपक्ष उमेदवारी जाहीर केली आहे. त्याबाबत पवारांना विचारलं असता ते म्हणाले की, ‘आमच्या पक्षापुरतं सांगतो. आमची एकच जागा आहे. त्यासाठीचा नंबर आमच्याकडे आहे. एक जागा निवडून देऊन आमच्याकडे काही मतं शिल्लक आहेत. दोन वर्षापूर्वी आमच्याकडे एकच जागा येत होती. मुख्यमंत्र्यांना सांगितलं आम्हाला दोन जागा हव्या. मी आणि फौजिया खान. मुख्यमंत्री म्हणाले तुम्ही असाल तर आम्ही देतो. पण पुढच्यावेळी दोन जागा आम्हाला दिल्या पाहिजे. ते आम्ही मान्य केलं. आता आमच्याकडील शिल्लक मते आम्ही शिवसेनेच्या उमेदवाराशिवाय कुणाला देऊ शकत नाही. त्यांनी जे नाव दिलं त्या नावाला आम्ही पाठिंबा देणार. मग ते संभाजीराजे असो की इतर कुणी असो. शिवसेना जो उमेदवार देईल ते त्याला आम्ही मतदान करू. राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या मतांवर उमेदवार निवडून येईल अशी परिस्थिती आहे, असं शरद पवार यांनी काल पुण्यात स्पष्ट केलं.