
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी फूट पडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सत्तेतील भाजप आणि शिवसेना पक्षासोबत मैत्री केली आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा अजित पवारांच्या या कृतीला विरोध आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात हल्लकल्लोळ माजला आहे. शरद पवार समर्थक आणि अजित पवार समर्थक असे दोन पक्षात पडले आहेत. दोन्ही गटांकडून आपल्याकडे सर्वाधिक आमदार असा दावा केला जातोय. दोन्ही गटाची उद्या बैठक आयोजित करण्यात आली आहे. शरद पवार यांची वाय बी चव्हाण सेंटर येथे बैठक बोलावण्यात आली आहे. तर अजित पवार यांची त्यांच्या नव्या कार्यालयात बैठक बोलावण्यात आली आहे. त्यामुळे उद्या कोणता गट खऱ्या अर्थाने ताकदवान आहे ते स्पष्ट होणार आहे.
विशेष म्हणजे दोन्ही गटाच्या आमदारांना बैठकीसाठी हजर राहण्यासाठी दोन्ही बाजूने दबाव निर्माण करण्यात आला आहे. अजित पवार यांच्याकडून प्रतोद अनिल पाटील यांनी सर्व आमदारांना उद्याच्या बैठकीला हजर राहण्याचा आदेश देण्यात आला आहे. तर शरद पवार यांच्या गटाचे जयंत पाटील यांनी विधीमंडळाचा गटनेता म्हणून सर्व आमदारांसाठी शरद पवार यांच्या बैठकीला हजर राहण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे नेमकं कुणाच्या बैठकीला जायचं हा आमदारांपुढे मोठा प्रश्न आहे.
या सगळ्या घडामोडी एकीकडे घडत असताना महाराष्ट्रातील दोन जिल्ह्याच्या राष्ट्रवादीच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शरद पवार यांना पाठिंबा जाहीर केला आहे. बुलढाणा आणि सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव राष्ट्रवादीचे आमदार डॉ राजेंद्र शिंगणे हे शरद पवार यांच्यासोबत आहेत. जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष नाझेर काझी हे देखीस शरद पवार यांच्यासोबत आहेत. तर जिल्ह्यातील 150 पेक्षा जास्त पदाधिकारी सुद्धा शरद पवारांसोबत आहेत. यामध्ये तालुकाध्यक्ष, शहर अध्यक्षांसह इतरांचा समावेश आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील 9 जिल्हा परिषद सदस्य सुद्धा शरद पवार यांच्यासोबत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नाझेर काझी यांनी याबाबत माहिती दिली आहे.
सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी आणि आमदार यांनी आपण शरद पवारांसोबतच असल्याचे जाहीर केले आहे. सांगलीत आज राष्ट्रवादी कार्यालयात आयोजित बैठकीत तासागावचे आमदार सुमनताई पाटील, शिराळ्याचे आमदार मानसिंगराव नाईक, आणि विधानपरिषद आमदार अरुण लाड यांनी उपस्थिती लावत सांगली जिल्ह्याची राष्ट्रवादी ही जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली शरद पवारांच्या मागेच ठामपणे असल्याचे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी जाहीर केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष अविनाश काका पाटील, शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, विधानसभा अध्यक्ष प्राध्यापक पद्माकर जगदाळे, सांगली महापालिकेचे महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी जयंत पाटील आणि शरद पवार यांच्या सोबतच राहण्याचा निर्णय घेतला आहे. तर राष्ट्रवादीचे माजी महापौर इंद्रिस नायकवडी हे अजित दादा पवार यांच्यासोबत राहणार असल्याचे स्पष्ट सांगितले आहे. उद्या 5 तारखेला मुंबईत बैठक असल्यामुळे 5 तारखेनंतर सर्व चित्र सांगली जिल्ह्यातील स्पष्ट होईल, कोण कोणाकडे राहील हे स्पष्ट होणार आहे.