टीव्ही 9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट | 43 पैकी अजून 14 मंत्री राहिले, शिवसेनेच्या आमदारांमध्ये धाकधूक, राष्ट्रवादीला कोणती खाती?
अजित पवार गटाला कोणती खाती मिळणार, याकडे नजरा लागलेल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांना देवेंद्र फडणवीसांकडील अर्थ खातं मिळण्याची शक्यता आहे. मात्र अर्थ खातं देऊ नका, असा विरोधी सूर शिंदेंच्या शिवसेनेचा असल्याचं कळतंय. अजित पवार गटाच्या 9 मंत्र्यांना कोणती खाती मिळू शकतात, याबाबतची माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट!

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह त्यांच्या गटाच्या 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आणि आता खातेवाटपावरुन, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार गटात रस्सीखेच सुरु झाल्याची माहिती आहे. मात्र असं असलं तरी अजित पवारांना अर्थ खातं मिळण्याची शक्यता आहे, tv9ला सूत्रांकडून ही माहिती मिळालीय. मात्र अजित पवारांना अर्थ खातं देण्यास शिंदेंच्या शिवसेनेचा विरोध असल्याचं कळतंय. कारण महाविकास आघाडीत अर्थमंत्री असताना निधी वाटपात भेदभावाचा आरोप शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदारांनीच केला होता.
अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर, पहिलीच मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि या बैठकीनंतर, मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांमध्ये खाते वाटपावरुन चर्चाही झाली. सध्या 20 मंत्र्यांकडेच 43 खात्यांचा कार्यभार आहे. त्यामुळे अतिरिक्त खाती काढून ती खाती, अजित पवार गटाला देण्यात येतील.
राष्ट्रवादीला कोणती खाती मिळणार?
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवारांना अर्थ, महसूल खातं मिळण्याची शक्यता आहे. सध्या हे खातं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडेच आहे. असं झाल्यास फडणवीसांकडे गृहखातं राहील. दिलीप वळसे-पाटलांना कृषी आणि सांस्कृतिक खातं मिळू शकतं. कृषी खातं सध्या शिंदेंच्या शिवसेनेच्या अब्दुल सत्तारांकडे आहे. तर सांस्कृतिक खातं सुधीर मुनगंटीवारांकडे आहे.
हसन मुश्रीफांना अल्पसंख्याक आणि कामगार मंत्रालय मिळू शकतं. सध्या अल्पसंख्याक विकास मंत्रालय स्वत: मुख्यमंत्री शिंदेंकडेच आहेत. तर भाजपच्या सुरेश खाडेंकडे कामगार मंत्रालय आहे. छगन भुजबळांना ओबीसी आणि बहुजन विकास खातं मिळण्याची शक्यता आहे. हे खातं सध्या भाजपच्या अतुल सावेंकडे आहे.
धनंजय मुंडेंना सामाजिक न्याय मंत्रालय मिळू शकतं. हे खातं सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडेच आहे. अदिती तटकरेंना महिला व बाल कल्याण खातं मिळण्याची शक्यता आहे. या खात्याचा कार्यभार भाजपच्या मंगलप्रभात लोढांकडे आहे. धर्मराव आत्राम यांना आदिवासी विकास मंत्रालय मिळू शकतं. हे खातं सध्या भाजपच्या विजयकुमार गावितांकडे आहे.
संजय बनसोडेंना क्रीडा आणि युवक कल्याणची जबाबदारी येऊ शकते. या खात्याचा अतिरिक्त कार्यभार सध्या भाजपच्या गिरीश महाजनांकडे आहे.अनिल पाटील यांना अन्न व नागरी पुरवठा खातं मिळण्याची शक्यता आहे. हे खातं सध्या भाजपच्या गिरीश महाजनांकडे आहे.
शिवसेना आमदारांमध्ये धाकधूक
अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानं, शिंदेंच्या शिवसेनेतल्या आमदारांमध्ये धाकधूक वाढलीय आणि शिंदेंच्या शिवसेनेतच अधिक आमदार मंत्रिपदासाठी इच्छुक होते. पण आता नाराज राहून काय फायदा? अशी बोलकी प्रतिक्रिया भरत गोगावलेंनी दिलीय. तर सुधीर मुनगंटीवारांनी, 3 पक्षांच्या कॅबिनेटला गंगा, यमुना सरस्वतीचा जोड म्हटलंय.
महाराष्ट्रात सध्या 29 मंत्री झालेत. यात भाजपचे 10 मंत्री, शिंदेंच्या शिवसेनेचे 10 मंत्री आणि अजित पवार गटाचे 9 मंत्री आहेत. आणखी 14 मंत्री करता येतात. या 14 मध्ये पुन्हा तिन्ही पक्षाच्या आमदारांना सामावून घ्यावं लागेल. त्यामुळं शिंदेंच्या शिवसेनेच्या वाट्याला 3 ते 4 मंत्रिपदं येऊ शकतात. त्यात भरत गोगावले, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, संजय गायकवाड, चिमणराव पाटील, अपक्ष बच्चू कडूंपैकी कोणाला संधी मिळेल हेही पाहवं लागेल.
दुसरीकडे खाते वाटपाच्या चर्चेदरम्यान, अजित पवारांनी पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींचं कौतुक करत विकासासाठी भाजपसोबत आल्याचं म्हटलंय. शिंदे-फडणवीस सरकारला अजित पवारांच्या रुपानं नवा साथी मिळालाय. आता अजित पवारांच्या गटाला कोणती खाती देऊन समाधान केलं जातं, हे दिसेलच.
