सांगली-कोल्हापूरकरांची पुराशी झुंज, तर सत्ताधारी पक्षप्रवेशात गुंग

| Updated on: Aug 09, 2019 | 12:05 AM

एकिकडे पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे, तर दुसरीकडे सत्ताधारी पक्ष मदतकार्यावर भर देण्याऐवजी अजूनही पक्षांतर आणि पक्षप्रवेशातच गुंतलेले दिसत आहे. त्यामुळे लोकांचे संसार उद्ध्वस्त होत असताना आणि जीव जात असताना सरकार गंभीर आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सांगली-कोल्हापूरकरांची पुराशी झुंज, तर सत्ताधारी पक्षप्रवेशात गुंग
Follow us on

मुंबई : एकिकडे पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे, तर दुसरीकडे सत्ताधारी पक्ष मदतकार्यावर भर देण्याऐवजी अजूनही पक्षांतर आणि पक्षप्रवेशातच गुंतलेले दिसत आहेत. त्यामुळे लोकांचे संसार उद्ध्वस्त होत असताना आणि जीव जात असताना सरकार गंभीर आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे. आज शिवसेनेने राष्ट्रवादीचे नेते शेखर गोरे यांना शिवसेनेत प्रवेश दिला. या पक्षप्रवेशाच्या निमित्ताने अखेर 4 दिवसांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुरावर भाष्य केले. त्यातही नागरिकांच्या मदतीसाठी काही ठोस उपाययोजनांची माहिती न देता योग्य वेळी मदत करु असं आश्वासन देण्यात आलं.

राष्ट्रवादीचे नेते शेखर गोरे यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी त्यांनी शिवसेना प्रवेश दिला. यावेळी शिवसेनेचे उपनेते नितीन बानगुडे पाटील देखील उपस्थित होते. शेखर गोरे राष्ट्रवादीचे नेते आणि काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांचे बंधू आहेत. पक्षात सन्मानपूर्वक वागणूक मिळत नसल्याने शेखर गोरे यांनी आज मातोश्रीची वाट धरली. यावेळी त्यांचे शेकडो कार्यकर्ते मातोश्रीवर हजर होते. त्यामुळे आगामी निवडणुकीत शिवसेनेकडून शेखर गोरे लढल्यास आमदार जयकुमार गोरे आणि शेखर गोरे या दोन्ही भावांमध्येच लढत होण्याची शक्यता आहे.

कोल्हापूर सांगलीमध्ये मदतकार्य अपुरं पडत आहे. त्यामुळे सरकारने तात्काळ ठोस निर्णय घेण्याची गरज तयार झाली आहे. मात्र, सरकार याबाबत पुरेसं सक्रिय नसल्याचंच पाहायला मिळत आहे. निवडणुकीच्या काळात इतर जिल्ह्यांमध्ये घर घेऊन स्थायिक होणारे नेते पुरग्रस्तांना मदतीसाठी मात्र, पुढे येताना दिसत नाही. निवडणुकीच्या काळात बारामतीत ठाण मांडून बसणारे हेच सत्ताधारी आपतकालीन स्थितीत पुर परिस्थिती निर्माण झालेल्या ठिकाणी मदतीसाठी दिसत नाही, अशी तक्रार नागरिक करत आहेत.

भाजप नेते आणि मदत व पुनर्वसन मंत्री सुभाष देशमुख यांनी अशा स्थितीतही पक्षाची बैठक घेतल्याचे समोर आले आहे. मुख्यमंत्र्यांचे हवाई दौरे खूप झाले त्यांनी आता जमिनीवर यायला हवे. स्वतः एनडीआरएफच्या कार्यालयात जाऊन प्रशासनाला गांभीर्य द्यायला हवे, अशी मागणी काँग्रेसचे नेते अतुल लोंढे यांनी केली आहे. चंद्रकांत पाटील बारामतीवर लक्ष ठेवतात, मात्र त्यांना पुराने घेरलेल्या कोल्हापूरवर लक्ष देता येत नाही, हे गंभीर असून भाजप शिवसेना निर्लज्ज पक्ष आहेत, अशी टीका राष्ट्रवादी पक्षाच्या विद्या चव्हाण यांनी केली आहे.

पुराच्या भीषण स्थितीला आता राष्ट्रीय आपत्ती घोषित करण्याचीही मागणी होत आहे. मात्र, मुख्यमंत्री फडणवीस यांनी याला बगल देत योग्य वेळी निर्णय घेऊ असे सांगितले.