“हीच का पक्षांतर्गत लोकशाही?” काँग्रेसमधून निलंबनानंतर संजय झा यांचा थोरातांना सवाल

| Updated on: Jul 16, 2020 | 4:16 PM

पक्षविरोधी कारवाई आणि शिस्तभंग केल्याप्रकरणी संजय झा यांच्यावर काँग्रेसने निलंबनाची कारवाई केली.

हीच का पक्षांतर्गत लोकशाही? काँग्रेसमधून निलंबनानंतर संजय झा यांचा थोरातांना सवाल
Follow us on

नवी दिल्ली : काँग्रेसने निलंबनाची कारवाई केल्यानंतर पक्षाचे माजी प्रवक्ते संजय झा यांनी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना प्रश्न विचारले आहेत. “हीच आहे का पक्षांतर्गत लोकशाही?” असा सवाल झा यांनी थोरातांना विचारला. (Sanjay Jha asks Balasaheb Thorat on suspending Congress membership)

“बाळासाहेब थोरात, टीव्ही चॅनेलवर ‘पक्षविरोधी कारवाया’ केल्याबद्दल काँग्रेसने माझे सदस्यत्व रद्द केल्याची तुमची नोटिस मी पाहिली. कोणतीही कारणे दाखवा नोटीस न बजावता, उत्तर देण्याची संधीही दिली गेली नाही. हीच का अंतर्गत लोकशाही? कृपया मी ज्या-ज्या ठिकाणी राजकीय शिस्तभंग केले, त्या विशिष्ट घटनांची यादी द्या” असे ट्वीट संजय झा यांनी केले आहे.

हेही वाचा : सचिन पायलट यांचे समर्थन भोवले, महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्याचे पक्षातून निलंबन

पक्षविरोधी कारवाई आणि शिस्तभंग केल्याप्रकरणी संजय झा यांच्यावर काँग्रेसने कारवाई केली. राजस्थानमधील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ते टीव्हीवरील एका चर्चासत्रात काँग्रेसवरच टीका करताना दिसले.

पायलट यांना उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षपदावरुन काढून टाकल्यानंतर झा यांनी ट्विट केले होते. ” 2013 ते 2018 ही पाच वर्षे सचिन पायलट यांनी काँग्रेससाठी रक्त, अश्रू, कष्ट आणि घाम दिले. काँग्रेस 21 जागांसारख्या अत्यंत वाईट स्थितीतून 100 वर परत आली. मात्र आम्ही त्यांना नुकताच कामगिरीचा बोनस दिला. आम्ही किती गुणग्राहक आहोत. आम्ही खूप पारदर्शक आहोत.” असे उपरोधिक ट्वीट त्यांनी केले होते. त्यानंतर एका वाहिनीवरील चर्चेत त्यांनी पुन्हा स्वपक्षावर हल्लाबोल चढवला होता.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

कोण आहेत संजय झा ?

संजय झा यांच्याकडे 2013 पासून काँग्रेसच्या प्रवक्तेपदाची जबाबदारी होती. अनेक चर्चासत्रांमध्ये ते काँग्रेस पक्षाची बाजू मांडत असत. त्यांच्याकडे महाराष्ट्रातील अखिल भारतीय व्यावसायिक कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती.

विकीलीक्सचा हवाला देत 25 एप्रिल 2014 रोजी संजय झा यांनी ट्विटमध्ये दावा केला होता की भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी हे सीआयए एजंट आहेत. स्वामींनी झा यांना कायदेशीर नोटीस बजावली आणि त्यांच्यावर तीन कोटी रुपयांचा दावा दाखल केला होता, त्यानंतर संजय झा यांनी माफी मागितली.

हेही वाचा : शिवसेनेकडून दिलगिरी व्यक्त, महाजॉब्स जाहिरात वादावर बाळासाहेब थोरातांची रोखठोक भूमिका

अटल बिहारी वाजपेयी हे भारताचे “सर्वात कमकुवत” पंतप्रधान होते, अशी टीका त्यांनी केल्यानंतर भारतीय जनता पक्षाकडून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त झाली होती. इतकंच नव्हे तर काँग्रेसनेही त्यावेळी हात झटकले होते. (Sanjay Jha asks Balasaheb Thorat on suspending Congress membership)