देशात वन नेशन वन हसबंड राबवताय का? राऊत भडकले, भाजपावर हल्लाबोल!

संजय राऊत यांनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत भाजपावर जोरदार निशाणा साधला आहे.

देशात वन नेशन वन हसबंड राबवताय का? राऊत भडकले, भाजपावर हल्लाबोल!
sanjay raut
| Updated on: Jun 01, 2025 | 2:48 PM

देशाच्या सेनेने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख भाजपाकडून वारंवार केला जात आहे. वेगवेगळ्या कार्यक्रमात या मोहिमेचा उल्लेख करून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रुपातील नेतृत्त्व किती कणकर आहे, हे भाजपाच्या नेत्यांकडून सांगितले जात आहे. आता भाजपाच्या याच मुद्द्यावरून राऊतांनी भाजपाला खडे बोल सुनावले आहेत. वन नेशन वन इलेक्शनप्रमाणे वन नेशन वन हसबंड मोहीम राबवली जात आहे का? असा सवाल राऊतांनी केला.

राऊत काय म्हणाले?

भाजपा घरोघरी आता सिंदूर घेऊन जात आहे. देशात वन नेशन वन हसबंड अशी मोहीम राबवली जातेय का? फक्त पतीच आपल्या पत्नीला सिंदूर देत असतो. एखादी बाहेरची व्यक्ती घरी जाऊन अन्य महिलेला सिंदूर देत नाही, अशी थेट टीका संजय राऊत यांनी केली.

राऊतांची शिरसाट यांच्यावर टीका

तसेच, ज्या पद्धतीने तुम्ही वन नेशन वन इलेक्शन आणले आहे. त्याच पद्धतीने वन नेशन वन हसबंड असा नवा कार्यक्रम आणला आहे का? असा रोखठोक सवाल राऊतांनी केला आहे.
मंत्री संजय शिरसाट यांचे पुत्र सिद्धांत शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये 67 कोटींचे हॉटेल विकत घेतले आहे. यावरून ठाकरेंच्या शिवसेनेने गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. राऊतांनीही संजय शिरसाट यांच्याकडे एवढे पैसे कुठून आले, असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यांच्या या टीकेला संजय शिरसाटांनी उत्तर दिले होते. आता पुन्हा एकदा राऊतांनी शिरसाट यांच्यावर निशाणा साधला. आमच्या वक्तव्याला महत्त्व द्या, असे आम्ही तुम्हाला सांगितले आहे का? तुम्ही तिथे कांड केले आहे. हा महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा आदर का करतो हे त्यांना अजून समजले नाही. त्यांचे कौटूंबिक, मुलाच्या आणि स्वतःचे जास्त प्रॉब्लेम आहेत, असा हल्लाबोल शिरसाट यांनी केला.

प्रशासकाने राज्य करणे म्हणजे भ्रष्टाचाराला सूट देणे

महानगरपालिकेच्या निवडणुकीवरही त्यांनी भाष्य केले. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशाने निवडणुका होत आहेत. गेल्या तीन ते साडेतीन वर्षांपासून प्रशासकाने राज्य करणे म्हणजे भ्रष्टाचाराला सूट देणे आहे. यांनी नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य निवडणून आणू शकले नाहीत. विधानसभेच्या निवडणुकीत ते लबाडी आणि पैशाचा गैरवापर करून निवडून आले आहेत, असा आरोप राऊत यांनी केला.

तसेच, आता निवडून यायची त्यांना खात्री नाही. मालेगावच्या महापालिका निवडणुकीत काय करायचे आहे त्यासाठी आम्ही काम करीत आहोत. जात, धर्म, गट, पैसा यांना सामोरे जाऊन मालेगाव मनपा निवडणूक लढवायची आहे. मालेगाव मनपा निवडणुकसाठी कोअर कमिटी तयार करणार, अशी माहिती राऊत यांनी दिली.