फडणवीस विरोधी पक्षनेता म्हणून जबरदस्त, उद्धव ठाकरेंनी बिगर भाजपशासित राज्यांचे नेतृत्व करावे : संजय राऊत

| Updated on: Aug 27, 2020 | 1:33 PM

संपूर्ण देशात ज्यांच्या नेतृत्वात कार्यकर्ते काम करतील असे राहुल गांधीच आहेत. काँग्रेसने या वादळातून सावरावं आणि जमिनीवर काम करावं, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.

फडणवीस विरोधी पक्षनेता म्हणून जबरदस्त, उद्धव ठाकरेंनी बिगर भाजपशासित राज्यांचे नेतृत्व करावे : संजय राऊत
Follow us on

मुंबई : बिगर भाजपशासित राज्यांचे नेतृत्व आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करायला हवं, असं मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं. देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेता म्हणून जबरदस्त काम करत आहेत, देशाच्या इतिहासात त्यांचे नाव घेतले जाईल, असा तिरकस निशाणाही राऊत यांनी साधला. (Sanjay Raut expects Uddhav Thackeray to lead Non BJP led States)

“काँग्रेसमध्ये जे काय घडलं, त्यावर काँग्रेसने बोलले पाहिजे. काँग्रेस हा देशाला माहित असलेला मोठा पक्ष आहे, विरोधी पक्ष आहे. देशाला मजबूत विरोधीपक्षाची गरज आहे. पृथ्वीराज चव्हाण हे मोठे नेते आहेत. संपूर्ण देशात ज्यांच्या नेतृत्वात कार्यकर्ते काम करतील ते राहुल गांधीच आहेत. ते सक्षम आहेत. काँग्रेसने या वादळातून सावरावं आणि जमिनीवर काम करावं, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.

“उद्धव ठाकरे कधीही आडपदडा ठेवून बोलत नाहीत. विरोधी पक्षांनी एकत्र येऊन लढायला हवं, हीच भूमिका त्यांनी मांडली. बिगर भाजपशासित राज्यांचे नेतृत्व आता उद्धव ठाकरे यांनी करायला हवं. देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेता म्हणून जबरदस्त काम करत आहेत. देशाच्या इतिहासात त्यांचे नाव घेतले जाईल” असे राऊत म्हणाले.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात कालच देशभरातील विरोधीपक्षाच्या सात मुख्यमंत्र्यांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली. या बैठकीला काँग्रेसचे चार, तर इतर पक्षांचे तीन मुख्यमंत्री सहभागी होते. उद्धव ठाकरे यांना कॅबिनेटची बैठक घ्यायची होती, त्यामुळे सोनिया गांधींनी ममता बॅनर्जी यांना सांगितलं की आधी उद्धव यांना बोलू द्या. त्यावर उद्धव ठाकरे ममता दीदींना म्हणाले ‘इजाजत है क्या दीदी?’ त्यावर ममता यांनी “उद्धवजी, आप बहुत अच्छा फाईट कर रहे है” अशा शब्दात  त्यांचे कौतुक केले. तेव्हा उद्धव ठाकरे यांनीही “लढनेवाले बाप का लढनेवाला बेटा हूं” असे अभिमानाने सांगितले.

दरम्यान, तीन पक्षाचं सरकार असताना आमदार-खासदारांची निधी वाटपात नाराजी आहे. केंद्राने निधी गोठवला, त्यामुळे अडचण आहे, असे उत्तर विकास निधीच्या वाटपावरुन आमदारांमध्ये असलेल्या नाराजीवर संजय राऊत यांनी दिले. (Sanjay Raut expects Uddhav Thackeray to lead Non BJP led States)

हेही वाचा : ‘मी डाएट करतेय’, मुख्यमंत्री बोलत असताना सुप्रिया सुळेंचा आवाज, ‘सुप्रिया माईक सुरुय’, अजित पवारांकडून सूचना

“तीन पक्षात उत्तम समन्वय आहे. जी समन्वय समिती आहे, ती मंत्रालय कामकाजासाठी आहे. महाविकास आघाडीत तिन्ही पक्षांमध्ये अशी समन्वय समिती असावी, असं वाटत होतं; पण मुख्यमंत्री गरज नसल्याचं म्हटले होते, परंतु आता पुन्हा विचार करु” असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

तीन पक्षांचे सरकार असताना थोडी नाराजी असते. परभणीच्या खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर संजय जाधव मुंबईत आलेले आहेत, यातून मार्ग निघेल, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.