गांधी परिवार हेच काँग्रेसचे आधार कार्ड, राहुल गांधी उत्तम नेते : संजय राऊत

| Updated on: Aug 25, 2020 | 1:20 PM

महाविकास आघाडीतून काँग्रेसने बाहेर पडावे, अशी राहुल गांधी यांची इच्छा दिसत नाही, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

गांधी परिवार हेच काँग्रेसचे आधार कार्ड, राहुल गांधी उत्तम नेते : संजय राऊत
Follow us on

मुंबई : गांधी परिवार हेच काँग्रेसचे आधार कार्ड आहे. राहुल गांधी उत्तम नेतृत्व करु शकतात, असे मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे. लोकसभा निवडणुकीत पराभवानंतर पक्षाध्यक्ष पद सोडण्याचा राहुल गांधींचा निर्णय मला पटला नव्हता, असेही संजय राऊत म्हणाले. (Sanjay Raut says only Gandhi Family member can lead Congress Party effectively)

“काँग्रेसच्या कार्यकारिणी बैठकीतील मुद्दे हा पक्षांतर्गत प्रश्न आहे. मात्र काँग्रेस हा देशातील मुख्य विरोधीपक्ष आहे. काँग्रेसमध्ये विस्कळीतपणा आला आहे, त्यातून पक्षाने सावरावे. देशभरातील प्रत्येक गावात, अगदी उत्तर आणि पश्चिमेपासून ईशान्य भारतापर्यंत, प्रत्येक गावात कार्यकर्ता असलेला काँग्रेस हा एकमेव पक्ष आहे. पण विरोधीपक्ष म्हणून त्यांनी उभारी घ्यावी” असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले

“गांधी परिवार हेच काँग्रेसचे आधार कार्ड आहे. गांधी कुटुंबाबाहेरच्या व्यक्तीने पक्षाचे नेतृत्व करावे, अशी मागणी केली जाते. ती तितकीशी संयुक्तिक नाही. पक्षाचे नेतृत्व करण्यासारखे गांधी परिवाराबाहेरील कोणी दिसत नाही. त्यामुळे सोनिया गांधी, राहुल गांधी किंवा प्रियांका गांधी यांनीच जबाबदारी उचलावी. सोनिया गांधी सध्या आजारपाने क्षीण झाल्या आहेत. परंतु राहुल किंवा प्रियांका गांधी यांनी नेतृत्व करायला हवे” असे राऊत पत्रकार परिषदेत म्हणाले.

हेही वाचा : काँग्रेसच्या नाराज आमदाराची अजित पवारांकडून समजूत, गोरंट्याल म्हणतात “दादा, तुमच्यावर पूर्ण भरोसा”

“राहुल गांधी उत्तम नेतृत्व करु शकतात. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये त्यांच्या नेतृत्वात पक्षाने विधानसभा निवडणुका जिंकल्या. लोकसभेनंतर राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्ष पदावरुन स्वतःला दूर केले. व्यक्तीश: मला तो निर्णय पटला नव्हता. पराभवामुळे त्यांना वैफल्य आले असेल, हे समजू शकते. परंतु ते पक्षाचे प्रमुख नेते आहेत. प्रत्येक पक्षाला अशा संकटांना तोंड द्यावे लागते.” असेही संजय राऊत म्हणाले.

मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मत व्यक्त केलं असलं, तरी महाविकास आघाडीतून काँग्रेसने बाहेर पडावे, अशी राहुल यांची इच्छा दिसत नाही. हे सरकार चालावे, याच मताचे राहुल गांधी आहेत, आमचा त्यांच्याशी संवाद होतो, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

“अग्रलेखाबद्दल काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा फोन आला. तेव्हा त्यांनी समान निधी वाटपाबाबत भूमिका मांडली, जी योग्य आहे. आमदारांच्या मागण्यांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मार्ग काढतील. अजित पवार अर्थमंत्री असेल तरी आघाडी सरकारमध्ये एकत्र बसून मार्ग काढणे, राज्य चालवण्यासाठी हिताचे आहे. नाराजी काँग्रेसमध्ये नाही, तर काही आमदारांमध्ये आहे. मुळात त्याला नाराजी म्हणता येणार नाही. कामाच्या बाबतीत काही मागण्या आहेत. सध्या कोरोनाच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रित असल्याने इतर कामांकडे लक्ष गेले नाही. आमदारांच्या काही मागण्या असतील, तर मंत्रिमंडळातील समन्वय समितीचे नेते एकत्र बसून मार्ग काढतील” असे राऊत यांनी स्पष्ट केले.