भाजपने आता मुख्यमंत्रिपदच काय, इंद्राचं आसन दिलं तरी नको : संजय राऊत

"आता कोणी इंद्राचं आसनही दिलं, तरी आम्हाला नको", असं म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपशी जुळवून घेण्याचे सर्व मार्ग शिवसेनेने बंद केल्याचे संकेत दिले आहेत

भाजपने आता मुख्यमंत्रिपदच काय, इंद्राचं आसन दिलं तरी नको : संजय राऊत

मुंबई : “आता कोणी इंद्राचं आसनही दिलं, तरी आम्हाला नको”, असं म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपशी जुळवून घेण्याचे सर्व मार्ग शिवसेनेने बंद केल्याचे संकेत दिले आहेत (Sanjay Raut On BJP’s CM Offer). तसेच, पाच वर्ष शिवसेनेचाच मुख्यमंत्री असेल, महाराष्ट्राचं मुख्यमंत्रिपद एक शिवसैनिकच भूषवेल असंही त्यांनी सांगितलं. राज्यात महासेनाआघाडीचं सरकार स्थापन होण्याच्या हालचालींना वेग आला आहे (Maharashtra Political Situation). येत्या दोन दिवसांत महाराष्ट्राचं भवितव्य ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत महासेनाआघाडीच्या पुढच्या वाटचालीबाबत माहिती दिली (Sanjay Raut Press Conference).

यावेळी, भाजपने शिवसेनेला अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदासाठी ऑफर दिली आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला, त्यावर “कसली ऑफर, कुठला नेता. शिवसेनेने राज्याचं मुख्यमंत्रिपद हे स्वत:च्या ताकदीवर, राज्याच्या स्वाभिमानासाठी आपल्याकडे ठेवलेलं आहे. आता कोणी इंद्राचं आसनही दिलं तरी आम्हाला नको”, असं म्हणत संजय राऊतांनी भाजपवर निशाणा साधला.

“महाराष्ट्रात येत्या एक-दोन दिवसांत नवीन सरकार स्थापन होईल आणि त्या सरकारचं नेतृत्त्व शिवसेना करेल. हे मी गेल्या 20-22 दिवसांपासून सतत सांगत आलो आहे. आता अखेर ती वेळ आली आहे, जेव्हा देशाची जनता पाहील, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदावर एक शिवसैनिक विराजमान होईल. हे उद्धव ठाकरे यांनीही नेहमी सांगितलं की, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदावर एक शिवसैनिकच बसेल, येणाऱ्या दोन दिवसांमध्ये त्याचा निर्णय होईल”, असं संजय राऊतांनी स्पष्ट केलं.

राज्यात पाच वर्ष शिवसेनेचाच मुख्यमंत्री

“पाच वर्ष शिवसेनेचाच मुख्यमंत्री असेल. त्यावर तिन्ही पक्षांची सहमती आहे. त्याच्यावर इतर कोणी काही ऑफर देत असेल तर त्या ऑफरची वेळ आता संपली, सेलची वेळ संपली आहे. शिवसेनेने अत्यंत स्वाभिमानाने हा निर्णय घेतला आहे. तो महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा निर्णय आहे. या महाराष्ट्राला एक मजबूत कणखर नेतृत्त्व मिळेल.”

“मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री व्हावेत, ही संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेची इच्छा आहे आणि लाखो शिवसैनिकांची भावना आहे. ते आमच्या भावनांचा आदर करतील असा विश्वास आम्हाला आहे.”

“महाराष्ट्राची राजकीय कुंडली ही शिवसेनाच निश्चित करेल आणखी कुणी नाही, हे मी आधीच सांगितलं होतं. त्यांना (भाजप) वाटत होतं, की दिल्लीत बसून सत्ता आणि ताकदीच्या भरवश्यावर ते महाराष्ट्राची कुंडली बिघडवतील. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक आहोत हे कुणीही विसरु नये”, असं इशारा संजय राऊतांनी भाजपला दिला.

मी बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक : संजय राऊत

“मी नेहमीच एक शिवसैनिक म्हणून काम केलं. माझ्या नावाची मुख्यमंत्रिपदासाठी चर्चा नाही. मी रात्रीच पवार साहेबांना भेटलो, महाराष्ट्रातील जनतेला उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री हवे. जी महाराष्ट्राच्या जनतेची इच्छा आहे, जी महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची इच्छा आहे. त्या इच्छेला उद्धव ठाकरे मान देतील. त्यांच्या भावना ओळखतील याविषयी माझ्या मनात शंका नाही.”

“दोन दिवसांत राष्ट्रपती राजवट संपुष्टात येईल, जेव्हा तिन्ही पक्षाचे नेते राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा प्रस्ताव घेऊन जातील त्यानंतर राष्ट्रपती राजवट हटवण्याच्या दिशेने वाटचाल होईल.”

“आदित्य ठाकरे यांचं नेतृत्त्व महाराष्ट्राला हवं आहे. मात्र, या क्षणी महाआघाडीचं जे सरकार येत आहे, त्याचं नेत्तृत्व उद्धव ठाकरेंनी करावं अशी तिन्हा पक्षांच्या प्रमुख नेत्यांची इच्छा आहे”, असंही संजय राऊतांनी सांगितलं.

महाराष्ट्राची सत्ता दिल्ली चालवू शकत नाही

“महाराष्ट्रात नेहमी जे दिल्लीचे आदेश घेऊन येणारे असतात ते यशस्वी होत नाहीत. महाराष्ट्राची सत्ता दिल्ली चालवू शकत नाही”, असं सांगत संजय राऊतांनी भाजपला टोला लगावला.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *