Sanjay Raut : ‘संभाजीराजेंना पुढे करुन महाराष्ट्रात एक डाव खेळण्याचा प्रयत्न होता’, संजय राऊतांचा फडणवीसांवर निशाणा, शाहू महाराजांचे मानले आभार

| Updated on: May 28, 2022 | 6:53 PM

श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांच्या या भूमिकेनंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्यांचे आभार मानले आहेत. तसंच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. 'संभाजीराजेंना पुढे करुन महाराष्ट्रात एक वेगळा डाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला, असा आरोपच राऊत यांनी केलाय.

Sanjay Raut : संभाजीराजेंना पुढे करुन महाराष्ट्रात एक डाव खेळण्याचा प्रयत्न होता, संजय राऊतांचा फडणवीसांवर निशाणा, शाहू महाराजांचे मानले आभार
देवेंद्र फडणवीस, संभाजीराजे छत्रपती, संजय राऊत
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : राज्यसभा निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chatrapati) यांनी मुख्यमंत्र्यांनी शब्द बदलल्याचा आरोप केला. त्यामुळे राज्यात संभाजीराजे समर्थकांकडून शिवसेनेविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात होता. अशावेळी संभाजीराजे यांचे वडील श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी आपली भूमिका स्पष्ट केलीय. संभाजीराजेंना उमेदवारी नाकारण्यात आल्याने छत्रपती घराण्याचा अपमान झालेला नाही. ही संभाजीराजेंची राजकीय भूमिका होती. ती त्यांची वैयक्तिक भूमिका होती’, असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांच्या या भूमिकेनंतर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी त्यांचे आभार मानले आहेत. तसंच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. ‘संभाजीराजेंना पुढे करुन महाराष्ट्रात एक वेगळा डाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला, असा आरोपच राऊत यांनी केलाय.

शाहू महाराजांच्या भूमिकेनंतर संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी राऊत यांनी फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केलीय. ‘कुणीतरी संभाजीराजेंना पुढे करुन महाराष्ट्रात एक वेगळ्या प्रकारचा डाव खेळण्याचा प्रयत्न करत होता. तो डाव नाही तर कपट होतं. पण ते कपट काय होतं हे स्वत: छत्रपती शाहू महाराज यांनी स्पष्ट केलंय. म्हणून आजही महाराष्ट्र शाहू घराण्यासमोर झुकतो. त्याचं कारण हेच आहे की सत्याची कास, सचोटी, प्रामाणिकपणा आणि महाराष्ट्रावर जेव्हा जेव्हा संकट आलं तेव्हा शाहू घराण्याचं भूमिका घेतली आहे. मी त्यांना भेटणार आहे आणि त्यांचा आशीर्वाद घेणार आहे’, असं राऊतांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

‘कोल्हापूरच्या मातीमध्ये आजही सत्य आणि प्रामाणिकपणा टिकून’

‘एक स्पष्ट झालं की कोल्हापूरच्या मातीमध्ये आजही सत्य आणि प्रामाणिकपणा टिकून आहे. शाहू घराण्यानेही सत्याची कास सोडली नाही, हे आज पुन्हा एकदा सिद्ध झालं. शिवसेनेनं कधीही कुणाची फसवणूक केली नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबाबत फडणवीसांनी जी काल विधान केलं की आम्ही ठरवून कोंडी केली. ते विधान किती खोटं होतं हे आज स्वत: श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी स्पष्ट केलं. मी त्यांचे आभार मानतो’, असंही राऊत म्हणाले.

‘शिवसेनेला बदनाम करण्याची भाषा झाली’

तसंच ‘शाहू महाराजांचा अनुभव हा अधिक दांगडा आहे. त्यांना हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा निकटचा स्नेह त्यांना मिळालाय. त्यामुळे ठाकरे घराणं आणि शाहू घराण्याचा जो जुना संबंध आहे तो सुद्धा आज त्यांच्या वक्तव्यातून दिसून आला. काही लोकांनी महाराष्ट्रात यानिमित्तानं पेटवापेटवीची भाषा केली. शिवसेनेला बदनाम करण्याची भाषा केली. शिवसेनेनं या प्रकरणात कधीही खालच्या पातळीचं राजकारण केलं नाही. फक्त आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली होती की सहावी जागा ही शिवसेनेची असेल आणि त्यासाठी आम्ही प्रस्ताव ठेवला होता’, असं राऊत यांनी यावेळी स्पष्ट केलं.

मी बोललो ते खरंच बोललो- संभाजीराजे छत्रपती

दुसरीकडे संभाजीराजे छत्रपती यांनी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या भूमिकेवर बोलणार नसल्याचं म्हटलंय. तसंच आपण पत्रकार परिषदेत जे बोललो ते खरच बोललो, असंही संभाजीराजे यांनी ट्विटरवर म्हटलंय.