कपील सिब्बल यांच्याकडून ‘ईव्हीएम’वरच प्रश्नचिन्ह, आमचं ठरलंय, 2024 ला एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही : संजय राऊत

2024 सालात विरोधकांना एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही, यावर सगळ्यांचे एकमत ठरले, पण कपिल सिब्बल यांच्यासारख्या कायदेपंडिताने त्या वेळी मतदान पद्धतीवरच प्रश्न उपस्थित केल्याचं शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आजच्या सामना रोखठोकमध्ये म्हटलं आहे.

कपील सिब्बल यांच्याकडून 'ईव्हीएम'वरच प्रश्नचिन्ह, आमचं ठरलंय, 2024 ला एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही : संजय राऊत
राहुल गांधी संजय राऊत

मुंबई : 2024 सालात विरोधकांना एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही, यावर सगळ्यांचे एकमत ठरले, पण कपिल सिब्बल यांच्यासारख्या कायदेपंडिताने त्या वेळी मतदान पद्धतीवरच प्रश्न उपस्थित केल्याचं शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आजच्या सामना रोखठोकमध्ये म्हटलं आहे. तसंच देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे मंथन सुरु असताना न्याय संस्था, राज्य घटना आणि कायदा यांचे तेज कमी झालंय, अशी टीका राऊत यांनी केंद्र सरकारवर केली.

2024 सालात एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही यावर सगळ्यांचे एकमत

दिल्लीतील वास्तव्यात अनेक प्रमुख लोकांशी भेटीगाठी होत असतात. राहुल गांधी यांना भेटून चर्चा करण्याचा योग आला. ‘ये लोग हमें संसद में भी बोलने नहीं देते और मीडिया उनके साथ है!’ असं गांधी म्हणाले. करदात्यांच्या पैशांवर लोकसभा टी.व्ही. चालते, पण विरोधकांवर त्यांचा बहिष्कार आहे. कपिल सिब्बल यांच्या घरी सोमवारी रात्री विरोधी पक्षाला जेवण ठेवले होते. 2024 सालात एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही यावर सगळ्यांचे एकमत ठरले…

‘ईव्हीएम’चा विषय मार्गी लावावाच लागेल

कपिल सिब्बल यांच्यासारख्या कायदेपंडिताने त्या वेळी मतदान पद्धतीवरच प्रश्न उपस्थित केले. ‘2024 च्या निवडणुकांतून ‘ईव्हीएम’ घालविल्याशिवाय यश मिळणार नाही. बॅलट पेपरवरच निवडणुका घेण्यासाठी लढायला हवे. मी पुराव्याशिवाय बोलत नाही!’ सिब्बल हे हवेत बाण मारणारे नेते आणि वकील नाहीत. ‘ईव्हीएम’चा विषय मार्गी लावावाच लागेल.

अमृत महोत्सवाचे मंथन सुरु; न्याय संस्था, राज्य घटना आणि कायदा यांचं तेज कमी झालंय

पुन्हा संसदेच्या आवारात आता महात्मा गांधीजी हे सर्व पाहायला हजर नाहीत. त्यांच्या भव्य पुतळ्याचा नैतिक आधार सगळ्यांनाच होता. ‘सेंट्रल व्हिस्टा’ प्रकल्पाने तो गांधी पुतळाही मोठ्या पत्र्याच्या आवरणाने झाकून ठेवला आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे मंथन सुरु असताना न्याय संस्था, राज्य घटना आणि कायदा यांचे तेज कमी झाले आहे. ‘मार्शल लॉ’ पुकारून सरकार संसद चालवते. विरोधकांचे ऐकणे हा लोकशाहीत ज्यांना अपमान वाटतो त्यांच्या हाती देश व लोकशाही सुरक्षित नसते.

लाल किल्ल्यावर तिरंगा फडकविणे एवढ्यापुरतेच स्वातंत्र्य नसते

देशातील विमा कंपन्यांचे खासगीकरण करू नका असे सांगणारे विरोधक सरकारला शत्रू वाटतात. त्यांचा आवाज दाबण्यासाठी संसदेत मार्शलला बोलावून लोकशाहीचे वस्त्रहरण केले जाते. हे स्वातंत्र्य कसले? लाल किल्ल्यावर प्रजासत्ताक दिनी तिरंगा फडकविणे एवढ्यापुरतेच स्वातंत्र्य नसते. स्वातंत्र्याशी संबंधित सर्व संस्था आणि व्यवस्थाच मोडीत निघाल्या आहेत. याविरुद्ध लिहावे व बोलावे असे ज्यांना वाटते त्यांनी तुरुंगात जाण्याचे व पेगॅससद्वारा हेरगिरीचे भय बाळगू नये.

स्वातंत्र्याचा पराभव झाला आहे काय?

त्याच भयमुक्ततेने ब्रिटिशांविरुद्ध लढा उभा राहिला व देश स्वतंत्र झाला. त्याच स्वतंत्र भारत देशाच्या संसदेत ‘मार्शल लॉ’ घुसवून विरोधकांची मुस्कटदाबी झाली! शेतकरी, नोकरदार, विद्यार्थी, गृहिणी, राजकीय कार्यकर्ते असे सगळेच नव्या सूर्यकिरणांच्या प्रतीक्षेत आहेत! स्वातंत्र्याचा पराभव झाला आहे काय?, सरतेशेवटी असा सवाल राऊतांनी रोखठोकमधून उपस्थित केलाय.

(Sanjay Raut Saamana Rokhthok Modi GOVT opposition party)

हे ही वाचा :

लोकशाहीचा सुवर्णकाळ संपलाय, संसदेत मार्शल लॉ, हे कसलं स्वातंत्र्य?, संजय राऊत यांची मोदी सरकारवर टीका

Published On - 8:34 am, Sun, 15 August 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI