
Sanjay Raut : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमुळे राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आघाडी आणि युतीच्या राजकाराणाला वेग आला आहे. मनसेचे प्रमुख राजा ठाकरे हे विरोधी नेत्यासोबत दिसत आहे. त्यामुळे लवकरच ते महाविकास आघाडीचा भाग होतात की काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे. काँग्रेसने मात्र मनसेला सोबत घेतल्यास परप्रांतीय मतदार दूर जाईल, अशी शंका व्यक्त केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उपस्थित केलेल्या याच शंकेमुळे आता महाविकास आघाडीत धुसफूस चालू आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सपकाळ यांची काँग्रेसच्या दिल्लीतील नेत्यांकडे तक्रार केल्याचे बोलले जात आहे. असे असतानाच आता या सर्व चर्चांवर खुद्द संजय राऊत यांनी समोर येऊन प्रतिक्रिया दिली आहे. मी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींना पत्र पाठवलेलं नाही, असे संजय राऊत म्हणाले आहेत. दुसरीकडे मीदेखील मनसेचा विरोध करण्यासाठी हायकमांडला कोणतेही पत्र पाठवलेले नाही, असे याआधीच स्पष्ट केले आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थंच्या निवडणुकीत ठाकरे गट आणि मनसे एकत्र येण्याची दाट शक्यता आहे. त्यासाठी या दोघांमध्ये चर्चा चालू आहेत. मनसेचे प्रमुख राज ठाकरे हे विरोधकांच्या शिष्टमंडळासोबत निवडणू आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठीही गेले होते. त्यामुळेच राज ठाकरे हे महाविकास आघाडीचा भाग होणार का? असे विचारले जात आहे. याविषयी अद्याप आमच्याकडे तसा प्रस्ताव आलेला नाही, अस काँग्रेसने सांगितलेले आहे. मात्र राज यांना सोबत घेतले तर परप्रांतीय मतदार दूर जाईल, असे सपकाळ यांना वाटत आहे. तशी माहिती त्यांनी पक्षश्रेष्ठींना दिल्याचेही बोलले जात आहे. काँग्रेसच्या याच भूमिकेवर नाराज होऊन संजय राऊतांनी काँग्रेसच्या दिल्लीतील वरिष्ठांकडे पत्र लिहून ठाकरे गटाची नाराजी व्यक्त केल्याचे सांगितले जात होते. मात्र आता यावर राऊतांनी पुढे येत मी पत्र दिलेलं नाही, असे सांगत या चर्चांवर पडदा टाकला आहे.
मी पत्र लिहिल्याची बातमी कुठून कशी आली मला माहिती नाही. हर्षवर्धन सपकाळ हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. आमचे सहकारी आहेत. महाविकास आघाडीचे आमचे उत्तम मित्र आहेत. आमच्या चांगला संवाद होत असताना, त्यांच्या केंद्राच्या मंत्र्यांशी बोलण्याचा संबंध येत नाही. नक्की त्यांच्या पक्षाची एक भूमिका आहे. त्यांना त्यांच्या हाय कमांडला विचारावं लागतं. आमच्याकडे तसे नाही आहे. हर्षवर्धन सपकाळ यांना दिल्लीत जायचं होतं, त्यामुळे बाळासाहेब थोरात यांना त्यांच्या केंद्रातील नेत्यांनी आमच्यासोबत बैठकीला पाठवले. सध्या सुरू असलेल्या चर्चांमध्ये कोणतेही तथ्य नाही, असे राऊत यांनी सांगितले.
यंदाच्या मनसेच्या दीपोत्सवाचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. यावर बोलताना आकाश बदललेले आहे. दोन भावांच्या एकत्र येण्याने प्रकाश अधिक रंगीत आणि तेजस्वी होईल, असे म्हणत दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याचे सूतोवाच केले आहे. दरम्यान, आता राऊत यांनी आमचा काँग्रेससोबत कोणताही वाद नाही, असेच एका प्रकारे सूचित केले आहे. त्यामुळे आता भविष्यात नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.