उद्धव ठाकरेंनी वर्षा बंगला सोडताच टोपली भर लिंबू सापडले; एकनाथ शिंदे यांच्या हवाल्यावरून रामदास कदम यांची टीका

संजय राऊत यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. फडणवीस हे वर्षा बंगल्यावर का जात नाहीत? तिथे शिंदे का आहेत? हे आता काळ्या जादूवाल्यांनीच सांगावं, अशी टीका संजय राऊत यांनी केली होती. राऊत यांच्या या टीकेचा रामदास कदम यांनी समाचार घेतला आहे.

उद्धव ठाकरेंनी वर्षा बंगला सोडताच टोपली भर लिंबू सापडले; एकनाथ शिंदे यांच्या हवाल्यावरून रामदास कदम यांची टीका
ramdas kadam
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Feb 02, 2025 | 2:59 PM

देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर राहायला का जात नाही? याचं उत्तर काळ्या जादूवाल्याने द्यावं. माझ्या नादाला लागू नका, असा इशारा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी दिला आहे. संजय राऊत यांच्या या विधानाचा शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी समाचार घेतला आहे. काळ्या जादूबद्दल बोलू नका. काळी जादू का असते हे उद्धव ठाकरे यांनाच विचारा, असं म्हणतानाच उद्धव ठाकरेंनी वर्षा बंगला सोडला तेव्हा बंगल्यावर टोपलीभर लिंबू सापडले होते, तसं एकनाथ शिंदे यांनीच सांगितलं होतं, असं रामदास कदम यांनी म्हटलंय.

रामदास कदम यांनी मीडियाशी संवाद साधताना संजय राऊत यांच्यावर घणाघाती हल्ला चढवला. उद्धव ठाकरे बुके घेऊन फडणवीस यांना भेटायला जातात. आणि दुसऱ्या बाजूला अमित शाह यांना अफजल खान म्हणतात. देवेंद्र फडणवीस आणि शिंदे यांच्यात मतभेद कसे निर्माण होतील हा त्यांचा हेतू आहेत. हा बालिश प्रयत्न आहे, असं सांगतानाच मला वाटतं काळी जादू काय हे संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना विचारावं. एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की, उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगला सोडला तेव्हा टोपलीभर लिंबू मिळाले. काळी जादू काय आहे त्यांना विचारा. त्यांचा अनुभव अधिक असावा, असा टोला रामदास कदम यांनी लगावला.

आमच्यात मतभेद नाही

यावेळी रामदास कदम यांनी दैनिक सामनातून करण्यात आलेल्या टीकेचाही समाचार घेतला. काही लोकांना ऐकायला येत नसेल. काही लोकांचे डोळे बंद असतील, काहींचे कान बंद असतील. झोपलेल्यांना जागं करू शकतो. पण झोपण्याचं सोंग घेतलेल्यांना जागं करू शकत नाही. सामनातील बातम्या झोपेचं सोंग घेऊन केलेल्या बातम्या आहेत. त्यात तथ्य नाही. शिवसेना कधीच फुटणार नाही. प्रत्येक आमदारांच्या मतदारसंघात कामासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी गेला आहे. पुन्हा आमदार निवडून आणले आहेत. सर्व आमदार एकनाथ शिंदेच्या पाठी खंबीर उभे आहेत. कुठेही मतभेद नाहीत, असा दावा कदम यांनी केला.

आम्ही भीक घालत नाही

उदय सामंत चांगलं काम करत आहेत. माझ्या लहान भावासारखे आहेत. एकनाथ शिंदेंच्या भावासारखे आहेत. शिंदेंच्या पाठी खंबीर आहेत. एकनाथ शिंदेंचा विश्वासू सहकारी म्हणून उदय सामंत यांचं नाव घेतलं जातं. त्यामुळे उदय सामंत आणि एकनाथ शिंदे यांच्या नात्यात मीठ टाकण्याचा प्रयत्न होत आहे. त्याला आम्ही भीक घालत नाही. शिवसेना आणि भाजपमध्ये मतभेद कसे होतील हेच ठाकरे गट पाहत आहे. त्यांचे 20 आमदार राहतील की नाही अशी परिस्थिती आहे. आमदारांना कसं थांबवावं हेच पाहत आहे, असंही ते म्हणाले.