
मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी शिंदे समर्थक बंडखोर आमदार संतोष बांगर (santosh bangar) यांची जिल्हाप्रमुख पदावरून हकालपट्टी केली आहे. तसेच त्यांची शिवसेनेतूनही हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली आहे. शिवसेनेच्या या कारवाईवर संतोष बांगर चांगलेच संतापले आहेत. मलाच काय साध्या तालुका प्रमुखांनाही ते काढू शकत नाहीत. आमचीच शिवसेना खरी आहे, अशा शब्दात संतोष बांगर यांनी थेट उद्धव ठाकरे यांनाच ललकारले आहेत. शिवसेनेने (shivsena) केलेल्या कारवाईमुळे बांगर हे आज किंवा उद्या शक्तिप्रदर्शन करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे येत्या काळात उद्धव ठाकरे आणि संतोष बांगर आमनेसामने येण्याची चिन्हे दिसत आहेत. टीव्ही 9 मराठीशी संवाद साधताना त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.
मला काढण्याचा अधिकार कुणाला ही नाही. मी शिवसेनेचा जिल्हा प्रमुख आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मी मतदान केले आणि आज बातमी आली की तुम्हाला शिवसेच्या जिल्हा अध्यक्ष पदावरून काढलं. मी हे मान्य करत नाही. मी शिवसेनेचा जिल्हा प्रमुख आहे. जिल्हा प्रमुख राहणार. माझ्या मतदारसंघातले उपजिल्हा प्रमुख, सह संपर्क प्रमुख, तालुका प्रमुख, सर्कल प्रमुख, उप तालुका प्रमुख, शहर प्रमुख, शाखा प्रमुख यांना कुणालाही काढण्याचा अधिकार नाही. मी शिवसेनेचा जिल्हा प्रमुख आहे, असं संतोष बांगर यांनी सांगितलं.
अनेक खासदार ओरिजनल शिवसेनेकडे येण्यासाठी तयार आहेत. अनेक जिल्हा प्रमुख, किमान 50 जिल्हा प्रमुख आमच्या ओरिजिनल शिवसेनेमध्ये येण्यासाठी तयार आहेत. उद्धव साहेबांना काही लोक मिस गाईड करतात. माझी आजही विनंती आहे की, उद्धव साहेबांनी या लोकांच ऐकू नये, असं आवाहनही त्यांनी केलं.
जिल्हा प्रमुखपदावरून काढल्या नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत तुमची काही चर्च्या झाली का? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत माझी चर्चा झालेली आहे. त्यांनी मला सागितलं की, तूच जिल्हा प्रमुख आहे आणि ओरिजनल शिवसेना ही आपलीच आहे. काही दिवसात तुम्हाला कळून चुकेल शिवसेना कुणाची. शिवसेना सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंची. बाळासाहेब ठाकरेंनी हाडाच पाणी केलं. एक एक हिंदू जोडला. बाळासाहेब ठाकरे यांनी मला जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी दिली होती. त्यामुळे मी आजही शिवसेना जिल्हा प्रमुख आहे, असं ते म्हणाले.
तुम्ही आज जोरदार शक्ती प्रदर्शन करून मुंबईकडे रवाना होणार आहात का? असा सवालही त्यांना करण्यात आला. जिल्ह्यातील आज हजारोच्या संख्येने शिवसैनिक हिंगोलीतून मुंबईला रवाना होणार आहेत. 15 खासगी बसेस, 70-80 चारचाकी गाड्या घेऊन हे लोक येत आहेत. प्रतिनिधी आणि पदाधिकारी मुंबईत येणार आहेत. यात सामान्य शिवसैनिक नसणार आहे, असं त्यांनी सांगितलं.