कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणूक, सहकार पॅनेलचा सर्व 21 जागांवर दणदणीत विजय, पृथ्वीराज चव्हाण, विश्वजित कदमांचे मनसुबे उधळले 

| Updated on: Jul 02, 2021 | 12:16 AM

कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत डॉ. अतुल भोसलेंच्या सत्ताधारी सहकार पॅनेलचा दणदणीत विजय झाला आहे.

कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणूक, सहकार पॅनेलचा सर्व 21 जागांवर दणदणीत विजय, पृथ्वीराज चव्हाण, विश्वजित कदमांचे मनसुबे उधळले 
krishna sugar mill
Follow us on

सातारा : कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत डॉ. अतुल भोसलेंच्या सत्ताधारी सहकार पॅनेलचा दणदणीत विजय झाला आहे. या सहकार पॅनेलचा सर्व 21 जागांवर विजय झाला असून भाजपाच्या डॉ. अतुल भोसलेंकडून (Atul Bhosale)  कारखाना हिसकावून घेण्याचे दोन्ही काँग्रेस नेत्यांचे मनसुबे कृष्णेच्या सभासदांनी उधळून लावले आहेत. (Satara Karad Yashwantrao Mohite Krishna sugar mill election DR Atul Bhosales sahakari panel won all 21 seats)

जयवंतराव भोसले सहकार पॅनेलचा सर्व 21 जागांवर विजय

कराडच्या कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक 29 जून रोजी पार पडली. त्यावेळी तब्बल 34532 सभासदांनी मतदान केले होते. आता या निवडणुकीचे निकाल स्पष्ट झाले आहेत. मतमोजणीचा निकाल जाहीर झाला आहे. या निवडणुकीत डॉ. अतुल भोसले यांच्या सत्ताधारी जयवंतराव भोसले सहकार पॅनेलने सर्व 21 जागांवर दहा हजारांच्या मताधिक्याने विजय मिळवला आहे. मतमोजणीच्या सुरुवातीपासून सहकार पॅनेलचे उमेदवार आघाडीवर असल्यामुळे दुपारपासूनच कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष सुरु केला होता. रात्री उशीरापर्यंत मतमोजणी सुरू होती. आता निकाल स्पष्ट झाले आहेत.

तिरंगी लढत, पृथ्वीराज चव्हाण आणि विश्वजित कदमांचे प्रयत्न फोल

सातारा-सांगली जिल्ह्यात 47145 सभासद असणाऱ्या कराडच्या यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत भाजप नेते डॉ. अतुल भोसले यांच्या सत्ताधारी जयवंतराव भोसले सहकार पॅनेलने दणदणीत विजयी मिळवला. या निवडणुकीत मिळालेलं मताधिक्य आतापर्यंतच्या इतिहासात सर्वात जास्त आहे. या कारखान्याची सत्ता भोसले गटाकडून दुसरीकडे जावी म्हणून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सर्व विरोधक एकत्र आणण्यासाठी प्रयत्न केले. मात्र हे प्रयत्न यशस्वी ठरले नाहीत. त्यामुळे ही निवडणूक तिरंगी झाली. माजी चेअरमन अविनाश मोहिते यांचे संस्थापक पॅनेल आणि राज्यमंत्री विश्वजित कदम नेतृत्व करत असलेले रयत पॅनेल अशी आणखी दोन पॅनल रिंगणात आल्याने या निवडणुकीची चर्चा झाली.

निकालाचे विधानसभा निवडणुकीवर पडसाद

या निवडणुकीमुळे सातारा आणि सांगली जिल्ह्यातील पाच तालुक्यातील वातावरण ढवळून निघाले होते. या निवडणुकीत मतदानही विक्रमी झाले. दिग्गजांचे विधानसभा मतदारसंघ या कार्यक्षेत्रात येत असल्याने सगळ्याच नेत्यांचे लक्ष या निवडणुकीकडे होते. मात्र भोसले गटाने मोठ्या फरकाने इतरांचा पराभव करत कृष्णाची सहकारी साखर कारखान्याची सत्ता पुन्हा एकदा मिळवल्याने आता विरोधकांची चिंता वाढली आहे. या निवडणुकीचे पडसाद आगामी विधानसभा निवडणुकीवर पडणार हे निश्चित असल्याचे मानले जात आहे.

सहकारी संस्थेत राजकारण बाजूला ठेवण्याचा संदेश दिला

दरम्यान, या विजयानंतर बोलताना, “ही निवडणूक ऐतिहासिक झाली असून सभासदांनी दिलेल्या मोठ्या मताधिक्‍यामुळे जबाबदारी वाढली आहे. लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कार्यरत राहणे गरजेचे आहे. या निवडणुकीत अनेक राजकारणी पडले होते. सहकारी संस्थेत राजकारण बाजूला ठेवण्याचा संदेश या निवडणुकीने दिला,” अशी प्रतिक्रिया सत्ताधारी सहकार पॅनलचे प्रमुख व चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी दिली

शेतकरी सभासदांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी काम करणार

तसेच कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीनिमित्त कृष्णा सहकारी साखर कारखाना राजकारणाचा अड्डा बनवण्याचे षड्यंत्र अनेक राजकारण्यांचं होतं. मात्र सुज्ञ सभासदांनी तो डाव उधळून लावला असून यापुढील काळात शेतकरी सभासदांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी काम करणार असल्याची प्रतिक्रिया विजयानंतर डॉ अतुल भोसले यांनी दिली

इतर बातम्या :

मराठा आरक्षणाचा उरलेला एकमेव मार्ग कोणता? आता चेंडू मोदी सरकारच्या कोर्टात? वाचा कोर्ट काय म्हणालं होतं?

BIG News:मराठा आरक्षणाला पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाचा झटका, मोदी सरकारची पुनर्विचार याचिका फेटाळली

केंद्र सरकार कमी पडलं असा आमचा आरोप नाही, प्रश्न सुटणं महत्वाचं – अशोक चव्हाण

(Satara Karad Yashwantrao Mohite Krishna sugar mill election DR Atul Bhosales sahakari panel won all 21 seats)