शरद पवार धूर्त राजकारणी, 2024 आधीच हिशोब चुकता करतील; शालिनीताई पाटील यांचं मोठं विधान

सिंचन घोटाळ्याचे अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप आहेत. या सगळ्यांचे पुरावे माझ्याकडे आहेत. भविष्यामध्ये ते सगळे पुरावे मी समोर आणणार आहे, असा इशारा शालिनीताई पाटील यांनी दिला.

शरद पवार धूर्त राजकारणी, 2024 आधीच हिशोब चुकता करतील; शालिनीताई पाटील यांचं मोठं विधान
shalini patil
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 08, 2023 | 1:38 PM

मुंबई : वसंतदादा पाटील यांच्या काळात शरद पवार यांनी केलेल्या बंडामागे एक विचार होता. अजित पवार यांनी केलेल्या बंडामागे कोणताही विचार नाही. केवळ त्यांना सत्ता आणि संरक्षण हवं आहे. केलेल्या अपराधांना झाकण्यासाठी त्यांना संरक्षण पाहिजे. त्यासाठी सत्तेत जायचं आहे. पण असल्या बेसवर ते फार काळ टिकणार नाहीत. शरद पवार मुत्सद्दी राजकारणी आहेत. धूर्त आहेत. ते कुणाला माफ करत नाहीत. 2024 पर्यंत वाट पाहण्याची गरज नाही. त्या आधीच ते हिशोब चुकता करतील, असं मोठं विधान माजी आमदार आणि ज्येष्ठ राजकारणी शालिनीताई पाटील यांनी केलं आहे. शालिनीताई पाटील यांनी अनेक महत्त्वाचे दावेही केले आहेत. त्या मीडियाशी संवाद साधत होत्या.

ज्येष्ठ म्हणून माझा अजित पवार यांना सल्ला राहील. अर्थात तो मानावा अथवा मानू नये. त्यांनी केलेली ही चूक आहे, असं मला वाटतं. ते भाजपकडे गेले म्हणजे आश्रयाला गेले आहेत. अपराध केले आहेत. त्यामुळे लपवायला गेले. लोकशाहीत अनंत काळ हे टिकत नाही. परिस्थिती बदलते. नवे लोक येतील. सत्य हे सत्यच असते, असं सूचक विधान शालिनीताई पाटील यांनी केलं.

मोदींना सत्य सांगितलं जात नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदींना राज्यातील लोक सत्य सांगत नाहीत. मोदींना हे सत्य कळेल तेव्हा ते विचार करतीलच ना. एवढे मोठे अपराध केल्यानंतर कोर्टाने एफआयआर दाखल करायला सांगितले आहेत. ही साधी गोष्ट नाही. जे संरक्षण देतील त्यांना उद्या याचा गंभीरपणे विचार करावा लागेल. त्यांनी विचार करावा अशी विनंती राहील, असंही त्या म्हणाल्या.

यामागे पवार नाही

शरद पवार यांनीच अजितदादा यांना भाजपकडे पाठवल्याची चर्चा आहे. त्यावरही त्यांनी भाष्य करताना या चर्चेत तथ्य नसल्याचं सांगितलं. शरद पवार असला प्रयोग करणार नाहीत, असं त्यांनी स्पष्ट केलं.

जनता साथ देणार नाही

आताची परिस्थिती वेगळी आहे. ऐनवेळी शरद पवारांना सोडून जायचं होतं असं नाही. तुम्हाला भाजपकडे जायचं होतं तर भाजपच्या तिकीटावर उभं राहा. किंवा तुम्हाला वेगळा पक्ष काढायचा असेल तर वेगळा पक्ष काढून लढा. तुमच्या वागण्याला तात्त्विक बेस नाहीये. तुम्ही दरोडे घालून आलाय आणि संपत्ती लुटण्यासाठी सत्तेचा कौल मागत आहात. हे वर्षभरात जनतेपर्यंत गेल्याशिवाय राहणार नाही. आणि जनता त्यांना साथ देणार नाही, असंही त्या म्हणाल्या.