Sharad Pawar : संभाजीराजे छत्रपतींचा राज्यसभेवर जाण्याचा मार्ग मोकळा? शरद पवारांकडून पाठिंबा जाहीर, काय म्हणाले पवार?

| Updated on: May 16, 2022 | 6:49 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोठी घोषणा केलीय. संभाजीराजे छत्रपती यांना राष्ट्रवादीचा पाठिंबा असेल असं पवार यांनी जाहीर केलं आहे.

Sharad Pawar : संभाजीराजे छत्रपतींचा राज्यसभेवर जाण्याचा मार्ग मोकळा? शरद पवारांकडून पाठिंबा जाहीर, काय म्हणाले पवार?
Follow us on

नांदेड : राज्यातील राज्यसभेच्या 6 जागांसाठी जुलैमध्ये निवडणूक (Rajya Sabha Election) होणार आहे. त्यात भाजपचे दोन, तर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा प्रत्येकी एक उमेदवार निवडून येईल इतकं संख्याबळ त्या त्या पक्षाकडे आहे. अशावेळी सहाव्या जागेसाठी संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chatrapati) यांनी आपण अपक्ष उभे राहणार असल्याचं जाहीर केलं. त्याचबरोबर सर्व पक्षांनी आपल्याला मदत करावी असं आवाहनही त्यांनी केलं होतं. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी मोठी घोषणा केलीय. संभाजीराजे छत्रपती यांना राष्ट्रवादीचा पाठिंबा असेल असं पवार यांनी जाहीर केलं आहे. त्यामुळे संभाजीराजेंचा राज्यसभेचा मार्ग मोकळा होईल, अशी शक्यता आता व्यक्त केली जात आहे.

छत्रपती संभाजीराजे यांनी येत्या राज्यसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून अर्ज दखल करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. याकरिता संभाजीराजे यांना अर्ज दखल करण्यासाठी 10 अनुमोदक आमदारांची व निवडून येण्यासाठी एकूण 42 आमदारांच्या मतांची आवश्यकता आहे. याकरिता अनुमोदन देण्यासाठी संभाजीराजे यांनी अपक्ष आमदारांना साद घातली आहे, तर या निवडणुकीत विजयी होण्यासाठी कोणत्याच पक्षाकडे पुरेसे संख्याबळ नसल्याने त्यांनी ही जागा आपल्याला अपक्ष म्हणून देण्यात यावी, अशी जाहीर मागणी केलेली आहे.

शिल्लक राहणारी मते संभाजीराजेंना देऊ – पवार

या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी नांदेड येथील पत्रकार परिषदेत भूमिका मांडताना छत्रपती संभाजीराजे यांच्या अपक्ष उमेदवारीस महाविकास आघाडीकडून पाठिंबा जाहीर केला आहे. पवार म्हणाले की, महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्षाच्या संख्याबळाच्या जोरावर प्रत्येकी एक-एक जागा हमखास निवडून येऊ शकतात. याव्यतिरिक्त शिल्लक राहणारी मते सहाव्या जागेसाठी आम्ही संभाजीराजेंना देऊ, असं पवारांनी जाहीर केलंय.

हे सुद्धा वाचा

संभाजीराजेंचा राज्यसभेसाठीचा मार्ग मोकळा?

शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसचे प्रत्येकी एक खासदार निवडून येऊन महाविकास आघाडीकडे 27 मते शिल्लक राहतात. पाठिंबा दिलेल्या अपक्ष आमदारांची संख्या धरून महाविकास आघाडीकडे एकूण 46 मते शिल्लक राहतात. संभाजीराजे यांना निवडून येण्यासाठी 42 मतांची आवश्यकता आहे. महाविकास आघाडीच्या शिल्लक मतांच्या आधारे संभाजीराजे सहजरित्या राज्यसभेत जाऊ शकतात. शरद पवारांच्या या पाठिंब्याच्या जोरावर संभाजीराजे यांचा राज्यसभेत जाण्याचा मार्ग मोकळा झाल्याचं बोललं जात आहे.