शरद पवारांच्या ताफ्यातील तीन सुरक्षारक्षक, सिल्व्हर ओकमधील दोन कर्मचारी कोरोनाग्रस्त

मुंबईतील सिल्व्हर ओक भागात असलेल्या शरद पवार यांच्या निवासस्थानी हे सुरक्षारक्षक तैनात होते

शरद पवारांच्या ताफ्यातील तीन सुरक्षारक्षक, सिल्व्हर ओकमधील दोन कर्मचारी कोरोनाग्रस्त
| Updated on: Aug 17, 2020 | 10:43 AM

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ताफ्यातील तीन सुरक्षारक्षक तसेच निवासस्थानावरील दोन कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. सुदैवाने यापैकी कोणीही पवारांच्या संपर्कात नसल्याने चिंता मिटली आहे. (Sharad Pawar Security Personnel tested Corona Positive)

मुंबईतील सिल्व्हर ओक भागात असलेल्या शरद पवार यांच्या निवासस्थानी 15 सुरक्षारक्षक तैनात असतात. एकूण सहा जणांची रॅपिड अँटिजन कोरोना टेस्ट करण्यात आली होती. त्यापैकी तीन सुरक्षारक्षक आणि दोन कर्मचारी अशा पाच जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती आहे.

सुदैवाने यापैकी कोणीही शरद पवार यांच्या संपर्कात नव्हते, त्यामुळे चिंतेचं कारण नाही. “शरद पवार व्यवस्थित आहेत. कालच त्यांची टेस्ट करण्यात आली होती, त्यांना कोणतीही अडचण नसून ते सुरक्षित आहेत” अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

सिल्व्हर ओकमधील इतर सर्व कर्मचारी आणि शरद पवार यांचे पीए यांची कोरोना चाचणी करण्यात आली, त्याचे रिपोर्ट येणं बाकी आहे. शरद पवार पुढील चार दिवस कुणालाही न भेटण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : माजी खासदार निलेश राणेंना कोरोना, मुंबईत सेल्फ क्वारंटाईन

यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि धाकटे सुपुत्र तेजस ठाकरे या दोघांच्याही सुरक्षारक्षकांना कोरोनाची लागण झाली होती. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ताफ्यातील दोन पोलिसांनाही कोरोनाचा संसर्ग झाला होता. सुदैवाने या सर्व सुरक्षाकर्मींनी कोरोनावर मात केली आहे.

ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांच्या बंगल्याबाहेर तैनात असलेल्या सुरक्षारक्षकांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यावेळी त्यांचा बंगला कंटेन्मेंट झोन घोषित करण्यात आला होता. काही दिवसातच सुरक्षारक्षक कोरोनामुक्तही झाले.