BMC : दसरा मेळाव्यासाठी शिंदे गट अन् शिवसेना आग्रही, महापालिका घेणार निर्णय..!

| Updated on: Sep 18, 2022 | 12:51 PM

शिवाजी पार्कवर शिवसेनेचाच दसरा मेळावा होणार असल्याचा विश्वास पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. शिवाय विभाग प्रमुखांची बैठक घेऊन तयारीला लागा अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.

BMC : दसरा मेळाव्यासाठी शिंदे गट अन् शिवसेना आग्रही, महापालिका घेणार निर्णय..!
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : शिवाजी पार्कवर होत असलेल्या (Dussehra Rally) दसरा मेळाव्याला गेल्या 56 वर्षांची परंपरा आहे. पण यंदा या मेळाव्याला वेगळेच महत्व आहे. कारण मेळाव्यासाठीचे मैदान एक असले तरी याकरिता (Shiv Sena) शिवसेना आणि शिंदे गटाकडून अर्ज करण्यात आले होते. आतापर्यंत (Shivaji Park) शिवाजी पार्कवर मेळावा घेण्यासाठी या दोन्ही गटांकडून दावा केला जात होता. पण आता महापालिकेने यामध्ये हस्तक्षेप सुरु केला आहे. शिवाजी पार्कवरील मेळाव्यााबाबत मुंबई महापालिकेचा विधी विभाग आढावा घेणार आहे. परवानगीबाबत कायदेशीर बाबी तपासल्या जाणार आहेत. त्यामुळे शिवाजी पार्कवर मेळावा कुणाचा? हे काही दिवसांमध्येच स्पष्ट होईल असे संकेत वर्तवण्यात आले आहेत.

शिवाजी पार्कवरुन शिवसैनिकांना विचारांचे सोने लूटता यावे म्हणून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दसरा मेळाव्याला सुरवात केली होती. मात्र, आता शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर या ठिकाणी मेळावा शिवसेनेचा होणार की शिंदे गटाचा हा चर्चेचा विषय बनला आहे.

दादर येथील शिवाजी पार्कवर मेळावा घेण्यासाठी शिवसेना आणि शिंदे गटाकडूनही महापालिकेकडे अर्ज करण्यात आला आहे. मात्र, अद्यापपर्यंत महापालिकेने यावर निर्णय दिलेला नाही. असे असतानाच शिवसेनेचे माजी महापौर मिलींद वैद्य यांनी पुन्हा एकदा महापालिकेशी पत्रव्यवहार केला आहे. त्यामुळे निर्णय काय होतो हे पहावे लागणार आहे.

आतापर्यंत शिवसेना आणि शिंदे गटाकडून केवळ दावे केले जात होते. पण परवानगीबाबत महापालिका आता कायदेशीर बाजू तपासत आहे. याकरिता विधी विभाग आढावा घेणार आहे. शिंदे आणि ठाकरे गटाकडून अर्ज आल्याने महापालिका देखील कामाला लागली आहे.

शिवसेनेने अर्ज करुन अनेक दिवस उलटले आहेत. असे असताना पालिकेने कोणतेही उत्तर दिलेले नाही. त्यामुळे आता महापालिकेने लेखी उत्तर द्यावे अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे. त्यामुळे महापालिका आता आढावा घेऊन परवानगीबाबत काय तो निर्णय देणार आहे.

दुसरीकडे शिवाजी पार्कवर शिवसेनेचाच दसरा मेळावा होणार असल्याचा विश्वास पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. शिवाय विभाग प्रमुखांची बैठक घेऊन तयारीला लागा अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. त्यामुळे महापालिकेचा निर्णय काय याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.