… तर शिवसेना-भाजपच्या नेत्यांवरच कारवाई, अमित शाह-उद्धव ठाकरेंचा निर्णय

| Updated on: Jun 23, 2019 | 4:52 PM

शिवसेना-भाजप युती, जागावाटप आणि मुख्यमंत्री पद याबाबत जो कुणी गैरसमज पसरवेल त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा निर्णय उद्धव ठाकरे आणि अमित शाह यांनी घेतला आहे.

... तर शिवसेना-भाजपच्या नेत्यांवरच कारवाई, अमित शाह-उद्धव ठाकरेंचा निर्णय
Follow us on

मुंबई : दिवसेंदिवस मुख्यमंत्रीपदाबाबत शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना-भाजप युती, जागावाटप आणि मुख्यमंत्री पद याबाबत जो कुणी गैरसमज पसरवेल त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा निर्णय उद्धव ठाकरे आणि अमित शाह यांनी घेतला आहे. सुत्रांनी याबाबतची माहिती दिली आहे.

मुख्यमंत्रीपदाबाबत भाजपाध्यक्ष अमित शाह आणि माझं बोलणं झालंय. त्यामुळे कुणीही मध्ये नाक खुपसण्याची गरज नाही, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल (22 जून) स्पष्ट केलं होतं. त्यानंतर आता युतीमध्ये जो कोणी मिठाचा खडा टाकेल त्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा निर्णय घेतला आहे. याबाबत उद्धव ठाकरे आणि अमित शाह यांच्यात फोनवर चर्चा झाली. त्यावेळी शिवसेना आणि भाजप युती, जागावाटप आणि मुख्यमंत्री पद याबाबत गैरसमज पसरवणाऱ्यांवर शिस्तभंग कारवाई करण्यात येईल, असा निर्णय घेतला असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या अभूतपूर्व यशानंतर शिवसेना भाजप विधानसभेच्या तयारीला लागली आहे. त्यानुसार उद्धव ठाकरे हे सध्या दुष्काळी भागाला भेट देत आहेत. नाशिक जिल्ह्यातील नांदगावमध्ये त्यांची सभा झाली. आज (23 जून) उद्धव ठाकरे शिर्डीत सभा झाली. या सभेत उद्धव ठाकरेंनी रोज वर्तमान पत्रात मुख्यमंत्री कोण होणार याबाबतच्या विविध बातम्या छापून येत आहे. मात्र माझ्यासाठी मुख्यमंत्री पद महत्त्वाचे नाही, असे त्यांनी स्पष्ट केलं. तसेच जे मुख्यमंत्री पदाची स्वप्न पाहतात, त्यांनी सर्वप्रथम शेतकऱ्यांच्या समस्या सोडवाव्यात, अन्यथा ही आग वाढत जाईल आणि या आगीत सत्तेची आसन सुद्धा जळून राख झाल्याशिवाय राहणार नाही असा कडक शब्दात भाजपला इशारा दिला.

यंदा विधानसभा निवडणुकीत युती विरुद्ध आघाडी अशा सामन्याऐवजी, युतीत शिवसेना आणि भाजप यांच्यात तीव्र स्पर्धा होण्याची चिन्ह जास्त आहेत. मुख्यमंत्रीपदाचे लक्ष्य गाठण्याकरिता शिवसेनेने भाजपच्या पावलावर पाऊल ठेवत पक्षविस्तार आणि पक्षबांधणी हाती घेतली आहे. विधानसभा निवडणुकांना आता अवघे तीन महिने शिल्लक राहिलेत आणि मुख्यमंत्रीपदावरून युतीत स्पर्धा तीव्र झाली आहे. भाजपच्या मजबूत पक्षसंघटनेपुढे टिकाव लागण्यासाठी शिवसेनेनेही पक्षसंघटन विस्ताराचा कार्यक्रम हाती घेतला आहे.

संबंधित बातम्या : 

मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी शिवसेनेचंही भाजपच्या पावलावर पाऊल

मुख्यमंत्रीपदाबाबत अमित शाहांशी बोललोय, इतरांनी नाक खुपसू नये : उद्धव ठाकरे