मुख्यमंत्रीपदाबाबत अमित शाहांशी बोललोय, इतरांनी नाक खुपसू नये : उद्धव ठाकरे

मुख्यमंत्रीपदाबाबत अमित शाहांशी बोललोय, इतरांनी नाक खुपसू नये : उद्धव ठाकरे

मुख्यमंत्रीपदाबाबत भाजपाध्यक्ष अमित शाह आणि माझं बोलणं झालंय. त्यामुळे कुणीही मध्ये नाक खुपसण्याची गरज नाही, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला.

सचिन पाटील

| Edited By:

Jun 22, 2019 | 6:03 PM

नाशिक : शिवसेना आणि भाजपात मुख्यमंत्रीपदावरुन काहीही धुसफूस नसल्याचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा स्पष्ट केलंय. मुख्यमंत्रीपदाबाबत भाजपाध्यक्ष अमित शाह आणि माझं बोलणं झालंय. त्यामुळे कुणीही मध्ये नाक खुपसण्याची गरज नाही, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला. मुख्यमंत्रीपदाबाबत शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी हे उत्तर दिलं.

उद्धव ठाकरे सध्या दुष्काळी भागाला भेट देत आहेत. नाशिक जिल्ह्यातील नांदगावमध्ये त्यांची सभा झाली. भरपावसात झालेल्या या सभेत लोकांनी खुर्च्या डोक्यावर घेऊन भाषण ऐकलं. लोकसभा निवडणुकीत शेतकऱ्यांनी भरभरुन मतदान केल्याबद्दल उद्धव ठाकरेंनी आभारही मानले. शिवाय शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि पीकविमा यासाठी आता शिवसेना आक्रमक होणार असल्याचे संकेतही उद्धव ठाकरेंनी दिले.

कर्जमाफीचे पैसे बँकांना दिले असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. पण ते शेतकऱ्यांना का नाही मिळाले? यामध्ये घोटाळा झाल्याची शक्यता आहे. येत्या आठ दिवसात शेतकऱ्यांना पीक विमा न मिळाल्यास राज्यातील सर्व पीक विमा कंपन्याची दुकानं बंद करु, असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिलाय. शेतकरी मल्ल्या आणि निरव मोदी नाही. हे कष्टाचे पैसे आहेत. मुलांचं शिक्षण आणि लग्न कसं करायची याची चिंता शेतकऱ्यांसमोर आहे आणि आपल्याकडे काय तर मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा सुरुय, असंही ते म्हणाले.

निवडणुका आल्या तर थापा मारायच्या नाही, शिवसेना भाजपची युती घट्ट आहे. शिवसेनेच्या केंद्रावर लोक गाऱ्हाणी मांडण्यासाठी रांगा लावून उभे आहेत. घोषणा झालेल्या काही योजना खूप चांगल्या आहेत, मात्र त्या पोहचताय का? योजना पोहचल्या नसतील आणि आम्ही त्या पोहोचल्या या भ्रमात असेल तर आम्ही गुन्हेगार आहोत. प्रत्येक गावात शिवसेनेचं मदत केंद्र राहायला पाहिजे असं मी प्रत्येक शिवसैनिकांना सांगितलं आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें