मनसेच्या माघारीने शिवसेना, राष्ट्रवादीच्या गालावर खळी, मतं खेचण्याचा प्रयत्न

| Updated on: Jul 05, 2019 | 4:14 PM

मुंबई: राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. मनसेने पत्रक काढून लोकसभा निवडणूक 2019 न लढण्याचं जाहीर केलं. मनसेचं विधानसभा लढण्याचं लक्ष्य आहे. मात्र मनसेच्या माघारीमुळे लोकसभा निवडणुकीत फायदा कुणाला होणार याची चर्चा सुरु झाली आहे. मनसेची मतं आपल्या पदरात कशी पडतील याची चाचपणी होत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे […]

मनसेच्या माघारीने शिवसेना, राष्ट्रवादीच्या गालावर खळी, मतं खेचण्याचा प्रयत्न
Follow us on

मुंबई: राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. मनसेने पत्रक काढून लोकसभा निवडणूक 2019 न लढण्याचं जाहीर केलं. मनसेचं विधानसभा लढण्याचं लक्ष्य आहे. मात्र मनसेच्या माघारीमुळे लोकसभा निवडणुकीत फायदा कुणाला होणार याची चर्चा सुरु झाली आहे. मनसेची मतं आपल्या पदरात कशी पडतील याची चाचपणी होत आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मदत करणार असल्याची चर्चा आहे. मात्र मनसेची मतं ही पारंपारिक आपलीच असल्याचा दावा शिवसेनेकडून सातत्याने होत असतो.

मनसेच्या मतांवर शिवसेना, राष्ट्रवादीचा डोळा
मनसेने लोकसभा निवडणूक न लढण्याची घोषणा केल्याने , मनसेच्या मतांवर आता शिवसेना आणि राष्ट्रवादीचा डोळा आहे. विशेषत: मनसेची मुंबई आणि उपनगरातील मतं आपल्याला मिळतील अशी आशा शिवसेना आणि राष्ट्रवादीला आहे.

मुंबई-उपनगरात मनसेची ताकद
मुंबई आणि उपनगरात मनसेची ठराविक पॉकेट्समध्ये मतं आहेत. लोकसभेच्या 2014 च्या निवडणुकीत, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई उत्तर पश्चिम, ठाणे आणि कल्याण या भागात मिळून मनसेला 4 लाख मतं मिळाली होती. त्यानंतर 6 महिन्यांनी विधानसभा निवडणुकीत मनसेच्या मतांचा आकडा 7 लाखांवर पोहोचला होता.

मुंबई उत्तर पश्चिम आणि कल्याण लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडून मनसेला सोडली जाईल अशी चर्चा होती.

“आम्ही भाजपच्या किरीट सोमय्यांविरुद्ध लढण्यासाठी उत्सुक होतो. तिथे मनसेला विजय नक्कीच मिळाला असता. तिथे शिवसेनेसह सर्वपक्षीयांनी मनसेला मदत केली असती. शिवसेनेसाठी ही जागा प्रतिष्ठेची होती. इथे कोणत्याही विद्यमान खासदाराला दुसऱ्यांदा विजय मिळवता येत नाही. तिकडे कल्याणमध्येही मनसेला मोठा पाठिंबा आहे. असं असूनही काँग्रेसने मनसेला महाआघाडीत घेण्यास विरोध केला” असं मनसेच्या एका नेत्याने सांगितलं.

दरम्यान, मनसेच्या लोकसभा माघारीमुळे राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या गालावर कळी खुलली आहे. मनसेची मते राष्ट्रवादीऐवजी शिवसेनेला मिळतील अशी चर्चा आहे.

राष्ट्रवादीपेक्षा मनसेच्या कार्यकर्त्यांना शिवसेनेशी अधिक जवळीक असेल हे नैसर्गिक आहे. खरं तर, कल्याण आणि ठाणे इथे तशी जुळवाजुळव सुरुही झाली आहे. कल्याणमध्ये शिवसेना खासदार डॉ श्रीकांत शिंदे आणि ठाण्यात खासदार राजन विचारे यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे उमेदवार रिंगणात आहेत. अशा परिस्थितीत मनसैनिक शिवसेनेला मतदान करतील अशी आशा शिवसेनेला आहे.

युती-आघाडी

जाणकारांचा मते, राज ठाकरेंचा लोकसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय हे राजकीय शहाणपण आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत कोणत्याही एकट्या पक्षाला स्थान नाही. राजकीय पक्ष जर शिवसेना-भाजप किंवा काँग्रेस-राष्ट्रवादी या युती-आघाडीत असेल तरच त्यांना स्थान आहे. जर तुम्ही एखाद्या गटात नसाल, तर तुम्हाला मतदारांना स्वत:कडे खेचणं अवघड जाईल. तेच मागील 2014 च्या लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळालं होतं. त्यावेळी मनसेच्या सर्व 12 उमेदवारांचं डिपॉजिट जप्त झालं होतं.