रायगडचे पालकमंत्रिपद न मिळाल्याने नाराज, शिवसेनेचे तिन्ही आमदार उद्धव ठाकरेंच्या भेटीला

| Updated on: Jan 15, 2020 | 1:06 PM

रायगडचे पालकमंत्रिपद (Raigad guardian minister) शिवसेनेला न मिळाल्यामुळे, रायगडमधील शिवसेनेचे तिन्ही आमदार आणि जिल्ह्यातील पदाधिकारी नाराज आहेत.

रायगडचे पालकमंत्रिपद न मिळाल्याने नाराज, शिवसेनेचे तिन्ही आमदार उद्धव ठाकरेंच्या भेटीला
Follow us on

मुंबई : रायगडचे पालकमंत्रिपद (Raigad guardian minister) शिवसेनेला न मिळाल्यामुळे, रायगडमधील शिवसेनेचे तिन्ही आमदार आणि जिल्ह्यातील पदाधिकारी नाराज आहेत. ही सर्व नाराज मंडळी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी ते मुंबईतील मंत्रालयात दाखल झाले आहेत. शिवसेनेचा पालकमंत्री व्हावा अशी मागणी ते उद्धव ठाकरे यांच्याकडे करणार आहेत. सध्या उद्योग आणि पर्यटन राज्यमंत्री असलेल्या आदिती तटकरे या रायगडच्या पालकमंत्री (Raigad guardian minister) आहेत.

शिवसेनेचे महाडचे आमदार भरत गोगावले, आमदार महेंद्र थोरवे हे पदाधिकाऱ्यांसह मुंबईत आले आहेत. ज्याचे आमदार जास्त त्यांचा पालकमंत्री हा शब्द अजितदादांनी पाळावा, असं शिवसेना आमदार भरत गोगावले यांनी म्हटलं.

भरत गोगावले म्हणाले, “जिल्ह्यात ज्यांचे जास्त आमदार त्यांचा पालकमंत्री हे सूत्र आहे. रायगडला 3 आमदार शिवसेनेचे आणि एक आमदार राष्ट्रवादीचा आहे. मग इथे राष्ट्रवादीचा पालकमंत्री का?, इथे शिवसेनेचा पालकमंत्री असावा हे जनतेचं म्हणणं आहे”.

रायगडमध्ये 18 जिल्हा परिषद सदस्य शिवसेनेचे आहेत.  5 पंचायत समिती, 5 नगर पंचायती, तसंच 750 ग्राम पंचायतींपैकी 300 ग्राम पंचायती या शिवसेनेकडे आहेत, इतका लवाजमा असताना, रायगडचा पालकमंत्री शिवसेनेचा असावा, हे आम्हाला वाटणं साहजिक आहे, असं भरत गोगावले यांनी सांगितलं.

जनता आमच्या पाठिशी आहे. जनतेचंही म्हणणं तेच आहे. त्यामुळे जनतेची भूमिका काय आहे हे आम्ही आमच्या नेत्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आलो आहे.  तिन्ही आमदार हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटून, परिस्थिती सांगणार आहे.  पक्षवाढीच्या दृष्टीने जिल्ह्यातील परिस्थिती पक्षप्रमुखांपर्यंत पोहोचवणं आवश्यक आहे, असं भरत गोगावले यांनी सांगितलं.