भाजपची सरकारे नसलेल्यांनी पुतीनकडून लस मागवायची का? शिवसेनेचा सवाल

| Updated on: Oct 24, 2020 | 8:03 AM

राष्ट्रीय एकात्मतेस नव्या लसीची गरज आहे!" असा टोला शिवसेनेनं मोदी सरकारला लगावला आहे. (Shivsena Criticism Modi Government On Giving Free Corona Vaccine) 

भाजपची सरकारे नसलेल्यांनी पुतीनकडून लस मागवायची का? शिवसेनेचा सवाल
Follow us on

मुंबई : “पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, झारखंड, छत्तीसगढ, ओडिशा, पंजाब, राजस्थान अशा राज्यात भाजप विचारांची सरकारे नाहीत. त्यांनाही ‘लस’ देण्याबाबत केंद्र सरकार हात आखडता घेणार काय? या राज्यांतील सरकारांनी पुतीनकडून लस मागवायची काय?” असा सवाल शिवसेनेन उपस्थित केला आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपाची सत्ता आल्यास मोफत कोरोना लस देण्याचे आश्वासन जाहीरनाम्यात देऊन भाजपाने कोरोना लसीचेही राजकारण केले आहे. यावरुन शिवसेनेनं केंद्रावर टीका केली आहे. (Shivsena Criticism Modi Government On Giving Free Corona Vaccine)

“बिहारमध्ये जे काय निकाल लागायचे ते लागतील, पण भाजपने मोफत लसीच्या सुया टोचण्याचे ‘फुकट’ उद्योग सुरू केले आहेत. बिहारला ‘लस’ मिळावी याबाबत दुमत नाही, पण इतर राज्ये काही पाकिस्तानात नाहीत. कोरोना लसीचा मुद्दा भाजपच्या बिहारी घोषणापत्रात यावा हे योग्य नाही. लसीचे वितरण सरकारची आणि राष्ट्रीय भूमिका असायला हवी. ही एक प्रकारे भेदाभेदीच आहे. राष्ट्रीय एकात्मतेस नव्या लसीची गरज आहे!” असा टोला शिवसेनेनं मोदी सरकारला लगावला आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना या वृत्तपत्रातून शिवसेनेने अनेक प्रश्न केंद्राला विचारले आहे.

“मोफत लसीच्या सुया टोचण्याचे ‘फुकट’ उद्योग सुरू”

“भारतीय जनता पक्षाचे नक्की धोरण काय? त्यांचे दिशादर्शक कोण? याबाबत थोडे गोंधळाचे वातावरण निर्माण झालेले दिसते. दोन दिवसांपूर्वीच पंतप्रधान मोदी यांनी जनतेला आश्वासन दिले होते की, कोरोनावर ‘लस’ येताच ती देशातील सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी सरकार प्रयत्न करेल. पंतप्रधानांनी लसीचे वितरण करताना कोठेच जात, धर्म, प्रांत, राजकारण मध्ये आणले नाही, पण आता बिहार विधानसभेच्या प्रचारात भाजप नेत्यांनी विचित्र भूमिका घेतली आहे. कोरोनावरील लसीचे उत्पादन सुरू झाल्यावर बिहारमधील जनतेला ती लस मोफत उपलब्ध केली जाईल असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी तर सांगितले आहे.”

“बिहारात मैदानात जाहीर सभा सर्व सोशल डिस्टन्सिंगचे नियम धाब्यावर बसवून होत आहेत. नेत्यांची हेलिकॉप्टर्स उडत आहेत. प्रचंड गर्दीचे कार्यक्रम सुरू आहेत. त्या गर्दीत बहुधा ‘कोरोना’ चिरडून मरणार आणि राजकीय क्रांती होणार असेच चित्र बिहारात आहे. लोकांना कोरोनाची भीती राहिलेली नाही. त्यांना बिहारात सत्ताबदल करायचा आहे. बिहारमध्ये जे काय निकाल लागायचे ते लागतील, पण भाजपने लोकांच्या मनात कोरोनाची भीती वाढवून मोफत लसीच्या सुया
टोचण्याचे ‘फुकट’ उद्योग सुरू केले आहेत,” असेही शिवसेनेनं म्हटलं आहे.

“सत्ताबदल झाला तर भाजप ही लस बिहारला देणार नाही का?” 

‘‘तुम्ही आम्हाला मत द्या, आम्ही तुम्हाला कोरोनाची लस फुकट टोचू’’ असा हा सौदा आहे. मतदारांना भीती दाखवून लस टोचण्याचा हा प्रकार निवडणूक आयोगाच्या नजरेतून सुटला कसा? सत्ता मिळविण्यासाठी मतदारांना भुरळ घालण्यासाठी नैतिकतावाले पक्ष कोणत्या थराला जाऊ शकतात ते आता दिसले. मोफत लस फक्त बिहारलाच का? संपूर्ण देशाला का नाही? याचे उत्तर द्या,” असेही शिवसेनेनं अग्रलेखात म्हटलं आहे.

“बिहारच्या निवडणुकीतून ‘विकास’ हरवला आहे. रोटी, कपडा, मकान, रोजगार हे मुद्दे चालत नाहीत. कारण त्याबाबत सगळा दुष्काळच आहे. पण ‘लस’ आधी बिहारात भाजपास मतदान करणाऱ्यांना मिळेल, पण समजा बिहारात सत्ताबदल झाला तर भाजप ही लस बिहारला देणार नाही काय? अनेक राज्यांत भाजपची सरकारे नाहीत. त्यांनाही ‘लस’ देण्याबाबत केंद्र सरकार हात आखडता घेणार काय?” असा सवालही शिवसेनेनं उपस्थित केला आहे.

“विरोधी पक्षाच्या एखाददुसऱ्या आमदारास कोरोना झालाच तर भाजपतर्फे सांगितले जाईल, ‘‘लस टोचून घ्यायची असेल तर आधी पक्षांतर करा, नाहीतर बसा बोंबलत!’’ बाजारात लस आली नाही तोवर यांच्या मारामाऱ्या सुरू झाल्या आहेत. बिहारला ‘लस’ मिळावी याबाबत दुमत नाही, पण इतर राज्ये काही पाकिस्तानात नाहीत,” असा सल्लाही शिवसेनेनं केंद्राला दिला आहे. (Shivsena Criticism Modi Government On Giving Free Corona Vaccine)

संबंधित बातम्या : 

बिहारमध्ये पुन्हा NDA सरकार, पंतप्रधान मोदींना विश्वास, RJD आणि काँग्रेसवर सडकून टीका

बिहार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात पंतप्रधान मोदी-राहुल गांधी आज आमनेसामने, रॅली आणि सभांचा धडाका