शिवसेनेने पाच बंडखोरांना हाकललं, तृप्ती सावंत-राजुल पटेलांचं काय?

| Updated on: Oct 11, 2019 | 12:21 PM

उस्मानाबादमधील अजित पिंगळे आणि सुरेश कांबळे, माढा मतदारसंघातील महेश चिवटे, तर सोलापूरमधील प्रवीण कटारिया आणि महेश कोठे यांच्यावर शिवसेनेने बंडखोरीची कारवाई केली आहे.

शिवसेनेने पाच बंडखोरांना हाकललं, तृप्ती सावंत-राजुल पटेलांचं काय?
Follow us on

मुंबई : भाजपने चार बंडखोरांची हकालपट्टी केल्यानंतर मित्रपक्ष शिवसेनेनेही कारवाईचा बडगा उगारला आहे. पाच बंडखोरांना पक्षातून हाकलण्यात (Shivsena expels rebels) आलं आहे. मात्र तृप्ती सावंत, राजुल पटेल आणि सुरेश भालेराव या तिघा बंडखोरांबाबत शिवसेनेने ‘आस्ते कदम’ची भूमिका घेतली आहे.

भाजपने बंडखोरांना बाहेरचा रस्ता दाखवल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेतही कारवाईची सूत्रं हलली आहेत. उस्मानाबाद आणि सोलापुरातील प्रत्येकी दोन, तर माढ्यातील एका बंडखोराची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

उस्मानाबादमधील अजित पिंगळे आणि सुरेश कांबळे, माढा मतदारसंघातील महेश चिवटे, तर सोलापूरमधील प्रवीण कटारिया आणि जिल्हाप्रमुख महेश कोठे यांच्यावर बंडखोरीची कारवाई (Shivsena expels rebels) करण्यात आलेली आहे.

विशेष म्हणजे वांद्रे (पूर्व) मतदारसंघातील बंडखोर आमदार तृप्ती सावंत, वर्सोव्यातील बंडखोर नगरसेविका राजुल पटेल आणि घाटकोपर पश्चिममध्ये बंडखोरी करणाऱ्या सुरेश भालेराव यांच्यावर कारवाई करण्याबाबत पक्षनेतृत्वाने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे बंडखोरांबाबत सेना दुजाभाव करत आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

वांद्रे पूर्व मतदारसंघाची पार्श्वभूमी

2015 मध्ये शिवसेनेचे तत्कालीन आमदार बाळा सावंत यांचं निधन झाल्यामुळे पोटनिवडणूक जाहीर झाली. शिवसेनेने प्रकाश सावंत यांची पत्नी तृप्ती सावंत यांनाच उमेदवारी दिली. तृप्ती सावंत पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवार आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणेंना हरवून जवळपास 20 हजारांच्या मताधिक्याने जिंकून आल्या होत्या.

यंदाच्या तिकीटवाटपावेळी शिवसेनेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या ‘वांद्रे पूर्व’ मतदारसंघात तिढा निर्माण झाला होता. अखेर विद्यमान आमदार तृप्ती सावंत यांना डावलत शिवसेनेने उमेदवारीची माळ मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या गळ्यात टाकली. त्यामुळे नाराज झालेल्या तृप्ती सावंत यांनी बंडाचं निशाण फडकावलं.

राज्याच्या विविध भागातील बंडोबांना थंड करणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ‘मातोश्री’च्या अंगणातील बंडखोरी रोखण्यात अपयशी ठरले. बाळा सावंत यांच्याशी असलेल्या घरच्या संबंधांची आठवण करुन देऊनही तृप्ती सावंत यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही.

बाळा सावंत घरचा माणूस, भावनिक नातं तोडू नका, उद्धव ठाकरेंच्या विनंतीनंतरही तृप्ती सावंत बंडखोरीवर ठाम

वांद्रे (पूर्व) – विश्वनाथ महाडेश्वर (शिवसेना) विरुद्ध झिशान सिद्दीकी (काँग्रेस) विरुद्ध तृप्ती सावंत (शिवसेना बंडखोर)
वर्सोवा – भारती लवेकर (शिवसंग्राम-भाजप) विरुद्ध बलदेव खोसा (काँग्रेस) विरुद्ध राजुल पटेल (शिवसेना बंडखोर)

पक्षाने सांगूनही अपक्ष उमेदवारी अर्ज मागे न घेणाऱ्या बंडखोरांची भाजपने काल हकालपट्टी केली होती. चरण वाघमारे, गीता जैन, बाळासाहेब ओव्हाळ आणि दिलीप देशमुख या उमेदवारांना पक्षाने बाहेर काढलं.

शिवसेना आणि भाजप युतीमध्ये अनेक जणांनी बंडखोरी (BJP suspends rebels) करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या सर्वांनी उमेदवारी मागे घ्यावी, असं आवाहन पक्षाकडून करण्यात आलं. पण न ऐकल्यामुळे पक्षाने निलंबनाची कारवाई केली आहे.