भाजपमधून आमदारासह या चार बंडखोरांची हकालपट्टी

शिवसेना आणि भाजप युतीमध्ये अनेक जणांनी बंडखोरी (BJP suspends rebels) करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या सर्वांनी उमेदवारी मागे घ्यावी, असं आवाहन पक्षाकडून करण्यात आलं. पण बंडखोरी केल्यामुळे पक्षाने निलंबनाची कारवाई केली आहे.

भाजपमधून आमदारासह या चार बंडखोरांची हकालपट्टी

मुंबई : पक्षाने सांगूनही अपक्ष उमेदवारी अर्ज मागे न घेणाऱ्या बंडखोरांची भाजपने हकालपट्टी (BJP suspends rebels) केली आहे. चरण वाघमारे, गीता जैन, बाळासाहेब ओव्हाळ आणि दिलीप देशमुख या उमेदवारांचा यामध्ये समावेश आहे. शिवसेना आणि भाजप युतीमध्ये अनेक जणांनी बंडखोरी (BJP suspends rebels) करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या सर्वांनी उमेदवारी मागे घ्यावी, असं आवाहन पक्षाकडून करण्यात आलं. पण बंडखोरी केल्यामुळे पक्षाने निलंबनाची कारवाई केली आहे.

तुमसर

भंडारा जिल्ह्यातील राजकारणात तुमसर विधानसभा मतदारसंघ अति महत्वाचा मतदारसंघ मानला जातो. विद्यमान आमदार चरण वाघमारे यांना डावलून भाजपने जिल्हा अध्यक्ष प्रदीप पडोळे यांना उमेदवारी दिल्याने वाघमारे हे नाराज झाले. त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करत निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला.

मीरा भाईंदर

मीरा भाईंदर विधानसभा मतदारसंघात माजी महापौर गीता जैन यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. पक्षाने अर्ज मागे घेण्याचं आवाहन करुनही त्या अपक्ष लढण्यावर ठाम राहिल्या. त्यामुळे भाजप उमेदवार नरेंद्र मेहता यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कारण, नरेंद्र मेहता यांच्याशी नाराज भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते गीता जैन यांना मदत करत असल्याचं सांगितलं जातंय.

पिंपरी

पिंपरी मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार गौतम चाबुकस्वार यांच्याविरोधात बंडखोरी करणारे बाळासाहेब ओव्हाळ यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. महायुतीत पिंपरी मतदारसंघ शिवसेनेला सुटला आहे. शिवसेनेकडून गौतम चाबुकस्वार यांना उमेदवारी देण्यात आली. पण भाजप नगरसेवकाने इथे बंडखोरी केली.

अहमदपूर

अहमदपूर विधानसभा मतदारसंघात बंडखोरी केलेले भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी दिलीप देशमुख यांच्यावरही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या मतदारसंघात भाजपने विद्यमान आमदार विनायक पाटील यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघात चौरंगी लढत होणार असल्याचं चित्र आहे. कारण, दिलीप देशमुख, विनायकराव पाटील हे आमनेसामने तर असतीलच, पण भाजपच्या अयोध्या केंद्रे यांनी पंचायत समिती सभापतीपदाचा आणि भाजपचा त्याग करून वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी दाखल केली. राष्ट्रवादीने माजी आमदार बाबासाहेब पाटील यांना उमेदवारी दिली आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI