बेलापूरमध्ये भगवा फडकवणार, आदित्य ठाकरेंचा निर्धार, भाजप आमदार मंदा म्हात्रे-गणेश नाईकांना डोकेदुखी

| Updated on: Sep 17, 2019 | 8:03 AM

विधानसभा निवडणुकीनंतर मी बेलापूरमध्ये पुन्हा येणार त्यावेळी विजयी जल्लोष केला जाईल, असं आदित्य ठाकरे म्हणाल्यामुळे शिवसेना बेलापुरातून निवडणूक लढवण्याच्या चर्चांना उधाण आलं आहे

बेलापूरमध्ये भगवा फडकवणार, आदित्य ठाकरेंचा निर्धार, भाजप आमदार मंदा म्हात्रे-गणेश नाईकांना डोकेदुखी
Follow us on

नवी मुंबई : शिवसेना-भाजप युती आणि जागावाटपावर अद्याप शिक्कामोर्तब झालेलं नसतानाच भाजपच्या जागेवर शिवसेनेचा डोळा असल्याचं दिसत आहे. नवी मुंबईत भाजप आमदार असलेल्या बेलापूर मतदारसंघातून शिवसेना विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता (Shivsena eyes on Belapur) आहे. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केलेलं वक्तव्य त्याचे अप्रत्यक्ष संकेत देत आहे. त्यामुळे बेलापूरच्या विद्यमान भाजप आमदार मंदा म्हात्रे यांच्यासह राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केलेले ज्येष्ठ नेते गणेश नाईक नाराज होण्याची चिन्हं (Shivsena eyes on Belapur) आहेत.

विधानसभा निवडणुकीनंतर मी बेलापूरमध्ये पुन्हा येणार त्यावेळी विजयी जल्लोष केला जाईल, असं आदित्य ठाकरे म्हणाले. यामुळे बेलापूरमधून शिवसेना निवडणूक लढवणार (Shivsena eyes on Belapur) असल्याचे तर्क लढवले जात आहेत. यामुळे शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारला आहे.

शिवसेना नेते विजय नाहता यांनी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामार्फत भाजपवर कुरघोडी करुन त्यांची बेलापूरमध्ये मुस्कटदाबी करण्याची व्यूहरचना ‘मातोश्री’वर सुरु केली आहे. पहिल्या टप्प्यात आदित्य ठाकरे यांचा विजय संकल्प मेळावा वाशीमध्ये आयोजित केल्याने हे दिसून आलं.

दुसरीकडे, युती होवो अथवा तुटो पण कोणत्याही परिस्थिती बेलापूर विधानसभा मतदारसंघ सोडणार नाही. त्यामुळे शिवसैनिकांनी नाईकांपासून दूर राहण्याचा कानमंत्र खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार ठाणे जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना या आदेशाची माहिती दिल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. शिवसैनिकांनीही कोणत्याही परिस्थितीत बेलापूरची जागा ताब्यात घेऊन जिंकण्याचा शब्द दिला आहे.

बेलापूरच्या भाजप आमदार मंदा म्हात्रे (BJP MLA Manda Mhatre) गणेश नाईकांच्या भाजप प्रवेशावरुन नाराज होत्या, मात्र मंदा म्हात्रे यांचं स्थान अबाधित राहिल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी दिल्यानंतर त्यांची नाराजी दूर झाली.

गणेश नाईकांच्या प्रवेशाला विरोध, मुख्यमंत्र्यांच्या भेटीत मंदा म्हात्रेंची नाराजी दूर

गणेश नाईक हा नवी मुंबई आणि ठाणे या भागातील सर्वात मोठा चेहरा आहे. 17 डिसेंबर 1992 रोजी नवी मुंबई महानगरपालिका स्थापन झाली. तेव्हापासून नवी मुंबई महापालिकेवर गणेश नाईक यांची एकहाती सत्ता आहे.

गणेश नाईक हे आधी शिवसेनेत होते. 1990 ला ते पहिल्यांदा नवी मुंबईतून आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर 25 मे 1999 रोजी शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना करण्यात आली. तेव्हा गणेश नाईक यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर राज्यातील सत्तेची समीकरणं कितीही बदलली तरी नवी मुंबईत मात्र राष्ट्रवादीचीच सत्ता राहिली.

दरम्यान, विधानसभा निवडणूक तोंडावर आली म्हणून मतं मागण्यासाठी जनआशीर्वाद यात्रा काढलेली नाही, तर लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या खासदारांना मतदान केलेल्या मतदारांचे आभार मानण्यासाठी आणि दुष्काळमुक्त, बेरोजगारी मुक्त, कर्जमुक्त, सुजलाम सुफलाम नवीन महाराष्ट्र घडविण्यासाठी काढली आहे, असं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.