50 हजार कोटीचा मालक बोलता बोलता गेला… अजित पवारांबाबत गुलाबराव पाटलांच विधान, असं का म्हणाले?
अजित पवारांसाारख्या माणसाला देवानं नेलं, काय करु शकतो. त्यांना कशाची कमी होती, सकाळी ६.३० वाजता माणूस टेबलावर असायचा. ५० हजार कोटींचा मालक होता, असं वक्तव्य शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं आहे.

अजित पवारांसारखा सोन्यासारखा माणूस बोलता बोलता गेला, दादांच्या जाण्यानं राज्याचं मोठं नुकसान झालं, असं शिवसेनेचे नेते आणि मंत्री गुलाबरावल पाटील यांनी म्हटलं आहे. ते जळगावमधील एका जाहीर कार्यक्रमामध्ये बोलत होते. अजित दादांचा आणि माझा पक्ष वेगवेगळा होता पण माणूस मला आवडायचा. दादांना काय कमी होतं, ते ५० हजार कोटींचे मालक होते. बोलेल तशी सत्ता होती, वाटेल तसं काम करणारा नेता होता. सकाळी साडे सहा वाजता टेबलावर बसून काम करणारा नेता होता, शेवटी देवानं नेलं, असं मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले आहेत. जळगावमध्ये जिल्हा बँकेच्या निवडणुकीमुळे सध्या कार्यकर्त्यांशी भेटीगाठी सुरु आहेत. यावेळी आयोजित एका कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
नेमकं काय म्हणाले गुलाबराव पाटील?
अजितदादा सारखा सोन्या सारखा माणूस बोलता बोलता गेला… अर्धा मिनिट चुकला आणि आपल्या राज्याचे केवढ मोठे नुकसान झाले. माझा आणि त्यांचा पक्ष वेगवेगळा होता. पण माणूस मला आवडायचा. पार्ट्याचे राजकीय पक्ष काय खरं राहिलं नाही आता, दर चार महिन्यांनी विचारावे लागते, कोणत्या पार्टीत होता. मी तर बाबा खुश राहतो जे होणार आहे ते कोणी टाळू शकत नाही. काय कमी होती आमच्या दादांना, ५० हजार कोटींचा मालक होता. बोलेल तशी सत्ता होती, वागेल तसा काम करणारा होता. सकाळी 6 वाजता उठून काम करणारा नेता होता, पण शेवटी देवाने नेले.
आर आर पाटील यांच्याबद्दलही केलं वक्तव्य
आर. आर. आबा कोणत्या पक्षाचे होते यांच्याशी मला घेण देणं नाही. पण ज्यांनी चांगले निर्णय घेतले ते मान्यच केलं पाहिजे. झोपडीतला, वाड्या वस्त्यावरचा प्रत्येक मुलगा पोलीस झाला, याचा श्रेय द्यायचं म्हटलं तर ते फक्त आणि फक्त आर आर आबा यांचे आहे. मंत्री याबरोबरच मी एक माणूस आहे, माणसाने माणसाला मदत करावी, असे बाबासाहेब आंबेडकरांनी शिकवलं आहे. बाबासाहेब नसते तर माझ्यासारखा ओबीसी माणूस मंत्री झाला नसता. बारिश ना होती तो खेती ना होती, बाबासाहेब ना होते तो समता ना होती, असंही गुलाबराव पाटलांनी म्हटलं आहे.