स्वतःहून युती तोडायची नाही, उद्धव ठाकरेंची भूमिका, पण मुख्यमंत्रिपदावर ठाम

| Updated on: Nov 07, 2019 | 1:45 PM

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना स्मरुन प्रत्येक आमदाराला शपथ दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

स्वतःहून युती तोडायची नाही, उद्धव ठाकरेंची भूमिका, पण मुख्यमंत्रिपदावर ठाम
Follow us on

मुंबई : मला स्वतःहून युती तोडायची नाही, युती कायम राहावी, ही माझी इच्छा आहे. सगळं गोडीने व्हायला पाहिजे. भाजपाध्यक्ष अमित शाहांसोबत 50-50 चा फॉर्म्युला ठरला होता. आता जो निर्णय आहे, तो भाजपने घ्यावा, अशी भूमिका घेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चेंडू भाजपच्या कोर्टात टाकला आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात ‘मातोश्री’ निवासस्थानी शिवसेनेच्या सर्व विजयी उमेदवारांची बैठक पार पडली (Shivsena MLA Meeting on Matoshree) यावेळी उद्धव ठाकरे यांना निर्णयाचे सर्वाधिकार देण्यात आले असून खासदार संजय राऊतच केवळ पक्षाची अधिकृत भूमिका मांडतील, असा निर्णय झाल्याचं सेनेच्या आमदारांनी ‘टीव्ही9 मराठी’शी बोलताना सांगितलं. उद्धव ठाकरे 50-50 मुख्यमंत्रिपदाच्या फॉर्म्युलावर ठाम असल्याची माहिती आहे.

उद्धव ठाकरे यांनी सत्तास्थापनेबाबत सर्व आमदारांचं मत आजमावून पाहण्यासाठी बैठकीचं आयोजन केलं होतं. शिवसेना आपली पुढील राजकीय रणनीती ठरवणार असल्यामुळे फक्त सेनाच नाही, तर भाजपचे डोळेही या बैठकीकडे लागून राहिले होते. पोलिसांचा फौजफाटा तैनात केल्याने मातोश्रीला जणू छावणीचंच स्वरुप आलं होतं.

बैठकीनंतर शिवसेनेचे सर्व आमदार एकत्रित ट्रायडेंट या पंचतारांकित हॉटेलमध्ये राहणार असल्याचं बोललं जात होतं. आमदारांमध्ये फूट पडू नये यासाठी यासाठी ही पावलं उचलण्यात येत असल्याची चर्चा होती. परंतु आमचे आमदार निष्ठावान आहेत. आमदारांच्या आसपास फिरकण्याची, शिवसेनेच्या वाऱ्यालाही उभं राहण्याची कोणाची हिंमत नाही. हिंमत करुन दाखवावी, असं चॅलेंज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिलं होतं. कर्नाटकमध्ये सत्ता स्थापनेदरम्यान अशाचप्रकारे सर्व आमदारांना मुंबईच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये एकत्रित ठेवण्यात आलं होते.

भाजपला पाठिंबा दिलेले अपक्ष आमदार रवी राणा यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे 25 आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा दावा केला होता. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शिवसेनेने ही पावलं उचल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

भाजप नेते राज्यपालांना भेटणार

त्याच वेळी चंद्रकात पाटील, सुधीर मुनगंटीवार आणि आशिष शेलार हे भाजपचे ज्येष्ठ नेते राजभवनात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घ्यायला गेले होते. भाजप नेत्यांनी सकाळी साडेदहा वाजता राज्यपालांच्या भेटीची वेळ मागितली होती. मात्र नंतर वेळ बदलून दुपारी दोन वाजताची करण्यात आली.

शिवसेना बैठकीत काय निर्णय घेते, कोणती रणनीती ठरवते, त्यानुसार भाजप पावलं टाकणार असल्याचं दिसत आहे. त्यामुळेच भाजपने राज्यपालांच्या भेटीची उशिराची वेळ बदलून घेतल्याचं म्हटलं जातं. या भेटीनंतर सुधीर मुनगंटीवार पत्रकार परिषद घेऊन तपशील सांगणार आहेत.

चाव्या नाही, रिमोट कंट्रोल

महाराष्ट्राच्या सत्तेच्या चाव्या नाही, पण ‘रिमोट कंट्रोल’ सोपवून भाजप शिवसेनेची मनधरणी करणार का, असा सवाल उपस्थित होत आहे. कारण मुख्यमंत्रिपद नाही, परंतु सुकाणू समितीचं अध्यक्षपद शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सोपवण्याचा प्रस्ताव भाजपने सेनेसमोर (Shivsena MLA Meeting on Matoshree) ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मुख्यमंत्रिपदासह सर्व पदं आणि जबाबदाऱ्यांचं समसमान वाटप ही शिवसेनेची मागणी कायम आहे. मात्र त्यावर उतारा म्हणून सुकाणू समितीचं अध्यक्षपद टेकवून सेनेची बोळवण करण्याचा भाजपचा इरादा आहे. आता भाजपच्या ऑफरला शिवसेना कशाप्रकारे प्रतिसाद देते, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

निकाल पंधरवडा

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून आता 15 दिवस उलटले. तरीही सत्ता स्थापनेचा पेच अद्यापही सुटलेला नाही. लहान भाऊ-मोठा भाऊ म्हणत ज्या भाजप-शिवसेनेने एकत्रितपणे ही निवडणूक लढली, तेच आता 50-50 चा फॉर्म्युला, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रिपद यावर अडून बसले आहेत. त्यामुळे सत्ता स्थापनेचा पेच कायम आहे.

विधानसभा निवडणुकीत भाजपने 288 पैकी 105 जागांसह सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला. मात्र कोणत्याही एका पक्षाला 145 हा सत्तास्थापनेच्या आकडा गाठता आलेलं नाही. त्यामुळे सत्ता स्थापन्यासाठी कोणत्या ना कोणत्या पक्षाचा पाठिंबा घ्यावाच लागणार आहे.

शिवसेनेला आतापर्यंत 8 अपक्ष आमदारांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे शिवसेनेचं संख्याबळ 56 वरुन 64 वर पोहचलं आहे. भाजपला 11 अपक्षांनी पाठिंबा दर्शवल्यामुळे त्यांचं संख्याबळ 105 वरुन 116 जागांवर पोहोचलं आहे. भाजप-शिवसेना यांचं एकत्रित संख्याबळ 180 वर जातं. परंतु देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याने दुखावलेल्या शिवसेनेच्या पाठीवर काँग्रेस ‘हात’ ठेवला आणि राष्ट्रवादीने ‘वेळ’ साधली, तर शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार येणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.

Shivsena MLA Meeting on Matoshree

शिवसेनेसंबंधी दिवसभरातील मोठ्या बातम्या :

मुख्यमंत्रिपद नाही, पण ‘रिमोट कंट्रोल’, भाजपचा शिवसेनेला नवा पर्याय?

शिवसेना आमदारांच्या बैठकीमुळे भाजपने ‘वेळ’ बदलली?

मुनगंटीवार सारखे ‘गोड बातमी’ म्हणतात, कोणी बाळंत होणार आहे का? : सामना

महाराष्ट्रात कर्नाटकची पुनरावृत्ती? बैठकीनंतर शिवसेना आमदारांची पंचतारांकित हॉटेलात रवानगी : सूत्र