आपके फोन टॅप हो रहे है, भाजपच्या माजी मंत्र्यानेच माहिती दिली, संजय राऊतांचा दावा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारने भाजप सरकारच्या काळातील फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत

आपके फोन टॅप हो रहे है, भाजपच्या माजी मंत्र्यानेच माहिती दिली, संजय राऊतांचा दावा
| Updated on: Jan 24, 2020 | 10:37 AM

मुंबई : भाजपच्या माजी ज्येष्ठ मंत्र्याने माझा फोन टॅप होत असल्याचं सांगितलं होतं, असा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. फडणवीस सरकारने आपल्या काळात तत्कालीन विरोधी पक्षातील नेत्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप झाल्यानंतर राऊतांनी ट्विटरवरुन हा दावा (Sanjay Raut on Phone Tapping) केला आहे.

‘तुमचा फोन टॅप होत आहे, ही माहिती मला भाजपच्या एका वरिष्ठ मंत्र्याने (त्यावेळी) दिली होती. मी म्हणालो होतो, भाईसाहेब, माझं बोलणं कोणाला ऐकायचं असेल, तर स्वागतच आहे. मी बाळासाहेब ठाकरेंचा शिष्य आहे. कोणतीही गोष्ट लपून छपून करत नाही. ऐका माझं बोलणं’ असं संजय राऊत यांनी ट्विटरवरुन म्हटलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारने भाजप सरकारच्या काळातील फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारवर विरोधी पक्षातील नेत्यांसह सामाजिक कार्यकर्त्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

फोन टॅपिंग आणि स्नूपिंग झालेल्या नेत्यांमध्ये खुद्द दिग्विजय सिंग यांच्यासह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, संजय राऊत यांचाही समावेश असल्याचा आरोप होत आहे.

भाजपच्या काळात विरोधकांच्या फोन टॅपिंगचा आरोप, ठाकरे सरकारकडून चौकशीचे आदेश

फडणवीस सरकारकडून तत्कालीन विरोधी पक्ष आणि शिवसेनेच्या नेत्यांचे फोन टॅप झाल्याचं दिग्विजय सिंह यांनी सांगितलं. आम्ही हे प्रकरण गांभीर्याने घेत आहोत. फोन टॅपिंग करुन नेत्यांवर पाळत ठेवण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान घेण्यासाठी इस्रायलला  कोण गेलं होतं, याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत, असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं.

Sanjay Raut on Phone Tapping