गलवान खोर्‍यात चीनची घुसखोरी, सरकार सोनिया-राहुल गांधींना उत्तर देण्यात व्यस्त : सामना

| Updated on: Jun 30, 2020 | 8:21 AM

भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि काँग्रेस यांच्यात वाकयुद्ध रंगलं आहे. मात्र, सध्या केंद्र सरकारने काँग्रेसला उत्तरे देण्यापेक्षा चीनला प्रत्युत्तर द्यावे, असा सल्ला 'सामना' अग्रलेखातून देण्यात आला आहे (Shivsena on BJP and congress dispute).

गलवान खोर्‍यात चीनची घुसखोरी, सरकार सोनिया-राहुल गांधींना उत्तर देण्यात व्यस्त : सामना
Follow us on

मुंबई :सीमेवरील गलवान खोर्‍यात चीनची घुसखोरी, बेकायदा बांधकामे सुरुच आहेत. त्यांना सडेतोड उत्तर देण्याऐवजी सरकार पक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षालाच सडेतोड उत्तरे देत बसला आहे”,  असा टोला शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखातून लगावण्यात आला आहे (Shivsena on BJP and congress dispute).

भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि काँग्रेस यांच्यात वाकयुद्ध रंगलं आहे. काँग्रेसकडून केंद्र सरकारला अनेक प्रश्न विचारण्यात आले आहेत. तर भाजपकडूनही काँग्रेसवर सडकून टीका करण्यात आली. मात्र, सध्या केंद्र सरकारने काँग्रेसला उत्तरे देण्यापेक्षा चीनला प्रत्युत्तर द्यावे, असा सल्ला ‘सामना’ अग्रलेखातून देण्यात आला आहे (Shivsena on BJP and congress dispute).

“कोरोना कॉलर ट्यूनचा लोकांना कंटाळा आला आहे तसा चीनप्रकरणी भाजप आणि काँग्रेसमध्ये सुरु असलेल्या ट्यून युद्धाचाही कंटाळा आला आहे. ‘आपल्याला चीनशी लढायचे आहे, सरकारच्या विरोधकांशी नाही’ अशी एक कॉलर ट्यून कोणीतरी दिल्लीत सतत वाजवायला हवी”, असा टोला अग्रलेखात लगावण्यात आला आहे.

हेही वाचा : मुंबई पोलिसांच्या नावे फेक मेसेज व्हायरल, दोघं बाहेर पडल्यास अटक होण्याचे दावे धादांत खोटे

“राजीव गांधी फाऊंडेशनला चीनकडून निधी मिळाला. चीन आणि काँग्रेसचे नाते काय? असे प्रश्न भाजपकडून विचारण्यात आले. यावर काँग्रेसने प्रतिटोले मारले”, असं अग्रलेखात म्हटलं आहे.

“पंतप्रधान केअर्स फंडला चिनी कंपन्यांकडून शेकडो कोटी रुपये आले आहेत. सध्याचे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांच्या मुलाच्या खात्यातही चिनी कंपन्यांकडून पैसे जमा झाल्याचा आरोप काँग्रेसने केला. म्हणजे आम्ही म्हणतोय तो मुद्दा हाच आहे. चीन सीमेवर चौक्या आणि बंकर्स उभे करीत आहे आणि देशात भाजप विरुद्ध काँग्रेस असे युद्ध रोज सुरु आहे”, असं अग्रलेखात म्हटलं आहे.

“या सगळ्या युद्धात शरद पवार यांनी एक काडी टाकली आहे ती अशी की, ‘देशाची सुरक्षा, राष्ट्रीय सुरक्षा वगैरे विषयांत कोणी राजकारण करु नये. हे बरे नाही.’ पवार यांनी हा टोला काँग्रेस किंवा राहुल गांधी यांनाच लगावला असे भाजपपुरस्कृत समाज माध्यमांवर पसरवले जात आहे”, असं ‘सामना’ अग्रलेखात म्हटलं आहे.

“चिनी घुसखोरीचे राजकारण करु नये, हे पवारांचे म्हणणे बरोबर! पवारांचा हा टोला सरकार पक्षालाही लागू पडतो. चीनप्रश्नी राजकारण कोणीच करु नये. पण असे राजकारण नक्की कोण करीत आहे? काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी चीनच्या घुसखोरीसंदर्भात विचारलेले प्रश्न म्हणजे पाण्यावरील बुडबुडे नाहीत. हेच प्रश्न कदाचित शरद पवार यांच्याही मनात घोळत असतील”, असा चिमटा अग्रलेखात काढला आहे.

“चीनने आमच्या जमिनीवर घुसखोरी केली नाही, मग 20 जवानांचे बलिदान का झाले? चीन आमच्या हद्दीत घुसला आहे काय? हे सर्व प्रश्न तर आहेतच. यावर पंतप्रधानांचे ठाम उत्तर असे आहे की, ”हिंदुस्थानच्या भूमीकडे वाकड्या नजरेने पाहणार्‍यांना सडेतोड आणि ठोस उत्तर मिळाले आहे.’ पंतप्रधान जे बोलले ते बरोबर आहे. चीनचे नाव न घेता पंतप्रधानांनी राहुल गांधींच्या शंकेचे निरसन केले आहे”, असं अग्रलेखात म्हटलं आहे.

“‘पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थान कोरोना आणि चीनविरुद्धच्या लढाया जिंकणार आहे,’ असे गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले. शाह यांना आमच्या शुभेच्छा आहेत. त्यांनी या दोन्ही लढायांवरच आपले लक्ष केंद्रित केले पाहिजे. विरोधी पक्ष काय आदळआपट करीत आहे त्याकडे लक्ष देऊ नये. त्यांनी रोगाशी लढावे. रोग्यांशी लढून देशाचा वेळ आणि पैसा वाया घालवू नये”, असा टोला ‘सामना’ अग्रलेखात लगावण्यात आला आहे.