भास्कर जाधवांच्या दिमतीला शिवसेनेचं स्पेशल चार्टर्ड विमान, राजीनाम्यानंतर तातडीने पक्षप्रवेश

| Updated on: Sep 13, 2019 | 3:42 PM

भास्कर जाधव यांनी मुंबईत सचिवांकडे राजीनामा न देता थेट औरंगाबादला हरिभाऊ बागडे यांच्याकडे राजीनामा दिला. यासाठी शिवसेनेने विशेष विमानाचीही/चार्टर्ड विमानाची (Chartered plane) व्यवस्था केली.

भास्कर जाधवांच्या दिमतीला शिवसेनेचं स्पेशल चार्टर्ड विमान, राजीनाम्यानंतर तातडीने पक्षप्रवेश
Follow us on

मुंबई : कोकणातील राष्ट्रवादीचे (NCP) प्रभावी नेते आणि आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) आज शिवसेनेमध्ये (Shivsena) प्रवेश करत आहेत. पक्षांतर करताना नियमाप्रमाणे त्यांना आधी आपल्या आमदारकीचा राजीनामा देणे आवश्यक होते. हा राजीनामा विधानभवनात विधानसभा अध्यक्षांकडे किंवा त्यांच्या गैरहजेरीत विधानसभा सचिवांकडे देता येतो. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे (Haribhau Bagade) औरंगाबादला आहेत. अशास्थितीत भास्कर जाधव यांनी मुंबईत सचिवांकडे राजीनामा न देता थेट औरंगाबादला हरिभाऊ बागडे यांच्याकडे राजीनामा दिला. यासाठी शिवसेनेने विशेष विमानाचीही/चार्टर्ड विमानाची (Chartered plane) व्यवस्था केली. त्यामुळे याची बरिच चर्चा सुरू आहे.

विधानसभा सचिवांकडे राजीनामा देण्याचा पर्याय असतानाही भास्कर जाधव यांनी औरंगाबादमध्ये जाऊन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडेंकडे राजीनामा का दिला असाही प्रश्न अनेकांना पडला आहे. विशेष म्हणजे शिवसेनेने त्यांच्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था केल्यानं अनेकांना आश्चर्य वाटलं. मात्र, यामागे महत्त्वाचं कारण आहे.

विधानसभा अध्यक्षांकडेच राजीनामा देण्याचं कारण काय?

विधानसभा अध्यक्षांच्या गैरहजेरीत विधानसभा सचिवांना आमदारकीचा राजीनामा देता येतो. राजीनामा सचिवांकडे आल्यानंतर सचिव हा राजीनामा फॅक्स किंवा ईमेलद्वारे अध्यक्ष जेथे असतील तेथे पाठवतात. त्यावर अध्यक्षांची स्वाक्षरी झाली की राजीनामा मंजूर होतो. आमदाराच्या राजीनामच्याची हीच सर्वसाधारण प्रक्रिया आहे. याप्रमाणे आमदार भास्कर जाधव देखील अशाप्रकारे राजीनामा देणार होते. मात्र, शिवसेनेने जाधव यांच्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था करुन त्यांना औरंगाबादला विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा देण्यास पाठवले.

भास्कर जाधव यांचा राजीनामा मंजूर होण्यास विलंब झाला असता तर त्यांच्या शिवसेना प्रवेशातही अडचणी निर्माण झाल्या असत्या. हे टाळण्यासाठीच शिवसेनेने विशेष विमानाची व्यवस्था केली. भास्कर जाधव यांनी या विशेष विमानातून औरंगबादला जात आमदारकीचा राजीनामा सादर केला. विधानसभा अध्यभ हरिभाऊ बागडे यांनी तो तात्काळ स्वीकारत मंजूर केला. त्यानंतर जाधव मुंबईला परतणार आहेत. दुपारी 2 वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित भास्कर जाधव शिवसेनेत परतणार आहेत.

शिवसेनेने या निर्णयातून भास्कर जाधव यांचं नेतृत्व किती महत्वाचं आहे हेच दाखवून दिलं आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतः लक्ष घालून कोकणातील पक्षाची पकड मजबूत करण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू केल्याचंही बोललं जात आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात भास्कर जाधव यांना कोणत्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या मिळतात हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे.