मस्तवाल राजकारणास मिळालेली चपराक, भाजप हरला आणि कोरोना जिंकला, शिवसेनेचं टीकास्त्र

| Updated on: May 03, 2021 | 8:04 AM

प. बंगालात ममतांचा पराभव करण्यासाठी भाजपने काय करायचे बाकी ठेवले? असा सवालही शिवसेनेनं केला. (Shivsena On West Bengal Election Result)

मस्तवाल राजकारणास मिळालेली चपराक, भाजप हरला आणि कोरोना जिंकला, शिवसेनेचं टीकास्त्र
संजय राऊत, ममता बॅनर्जी, पंतप्रधान मोदी
Follow us on

मुंबई : ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने अत्यंत स्पष्ट बहुमत मिळविले. मोदी-शहा यांनी कृत्रिम ढगांचा गडगडाट केला, पण जमिनीवरील लाट ही प्रत्यक्षात ममता बॅनर्जी यांचीच होती. याचा अर्थ असा की, मोदी-शहांच्या भाजपकडे निवडणुका जिंकण्याचे तंत्र व यंत्र असले तरी ते अजिंक्य नाहीत. प. बंगालची वाघीण ऐन निवडणुकीत जखमी झाली. त्या जखमी वाघिणीने देशाच्या राजकारणाला नवी दिशा दिली आहे. प. बंगालच्या निवडणुकीचे विश्लेषण एका वाक्यात करायचे तर भाजप हरला आणि कोरोना जिंकला. प. बंगालची जनता धूर धुक्यात हरवली नाही. कृत्रिम लाटेत वाहून गेली नाही, असा टोला शिवसेनेनं पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपला लगावला. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून पश्चिम बंगालच्या निवडणुकीबाबत वक्तव्य करण्यात आले आहे. (Shivsena Saamana Editorial On West Bengal Election Result)

सामनाच्या अग्रलेखात नेमकं काय म्हटलं? 

ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने अत्यंत स्पष्ट बहुमत मिळविले. मोदी-शहा यांनी कृत्रिम ढगांचा गडगडाट केला, पण जमिनीवरील लाट ही प्रत्यक्षात ममता बॅनर्जी यांचीच होती. याचा अर्थ असा की, मोदी-शहांच्या भाजपकडे निवडणुका जिंकण्याचे तंत्र व यंत्र असले तरी ते अजिंक्य नाहीत व त्यांच्या बोलघेवडेपणावर शहाणीसुरती जनता विश्वास ठेवेलच असे नाही. प. बंगालची वाघीण ऐन निवडणुकीत जखमी झाली. त्या जखमी वाघिणीने देशाच्या राजकारणाला नवी दिशा दिली आहे. प. बंगालच्या जनतेचेही अभिनंदन करावे तेवढे थोडेच. प. बंगालची जनता धूर धुक्यात हरवली नाही. कृत्रिम लाटेत वाहून गेली नाही. आपल्या मातीतील माणसांच्या प्रतिष्ठेसाठी बंगाली जनता ठामपणे उभी राहिली. देशाने प. बंगालकडून शिकावे, असा प्रसंग घडला आहे! असे शिवसेनेनं यात म्हटले आहे.

मस्तवाल राजकारणास मिळालेली चपराक

पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले. तरी प. बंगालात काय होणार, याकडेच सगळय़ांचे लक्ष होते. कारण देशात थैमान घालत असलेल्या महाभयंकर कोरोना महामारीस हरवायचे सोडून पंतप्रधान मोदींसह संपूर्ण केंद्र सरकार प. बंगालात ममता बॅनर्जी व त्यांच्या तृणमूल काँग्रेसला हरविण्यासाठी उतरले होते. प. बंगाल जिंकता यावे म्हणून तेथे मतदानाच्या आठ फेऱया लादण्यात आल्या. पण झाले काय? तृणमूल काँग्रेसने मोदी, शहांसह संपूर्ण केंद्र सरकार व भाजपला धूळ चारली आहे. प. बंगालात ममता बॅनर्जी यांनी विजयाची ‘हॅट्ट्रिक’ साधली. इतकेच नव्हे, तर मोदी-शहांनी उभे केलेले तुफान रोखत भाजपचा डाव शंभरच्या आत ‘ऑल आऊट’ करून टाकला. ममता दीदी 2 मेनंतर घरी जातील अशा गमजा केल्या गेल्या. ‘2 मई दीदी गई’ असा घोषा पंतप्रधान मोदी जाहीर सभांतून लावत होते. ममता यांना घरी बसविण्यासाठी भारतीय जनता पक्षाने पैसा, सत्ता व सरकारी यंत्रणेचा पूरेपूर वापर केला. तरीही ममता बॅनर्जी यांनी जिद्दीने विजय मिळविला. हा विजय म्हणजे मस्तवाल राजकारणास मिळालेली चपराक आहे, अशी टीकाही शिवसेनेनं केली .

ममतांचा पराभव करण्यासाठी भाजपने काय करायचे बाकी ठेवले?

प. बंगालच्या निवडणुकीचे विश्लेषण एका वाक्यात करायचे तर भाजप हरला आणि कोरोना जिंकला. पाच राज्यांतील, विशेषतः प. बंगालातील निवडणुकीच्या अनियंत्रित रेटय़ामुळे देशात कोरोना वाढत गेला हे मद्रास हायकोर्टाचे निरीक्षण आहे. देशात ज्या वेगाने कोरोना वाढला व पडझड झाली त्यास मद्रास हायकोर्टाने निवडणूक आयोगास जबाबदार धरले व ते योग्यच आहे. फक्त प. बंगाल जिंकायचेच, या एका ईर्षेने व द्वेषाने ‘मोदी-शहां’चा भाजप मैदानात उतरला. त्यांनी लाखोंच्या सभा, रोड शो करून कोरोनाबाबतचे सर्व नियम पायदळी तुडवले. त्यानंतर निवडणुका संपल्यावर दिल्लीत येऊन कोरोना निवारणाच्या देवपूजेला लागले, पण वेळ हातची गेली आहे. इतके करूनही प. बंगालच्या जनतेने भाजपला साफ नाकारले आहे. प. बंगालात ममतांचा पराभव करण्यासाठी भाजपने काय करायचे बाकी ठेवले? असा सवालही शिवसेनेनं केला.

पराभवाची नैतिक जबाबदारी कोणी घ्यायची ते त्यांनीच ठरवावे

‘जय श्रीराम’चे नारे देण्यापासून ते ममतांना ‘बेगम ममता’ असे डिवचण्यापर्यंत हिंदू-मुसलमान मतांचे ध्रृवीकरण करण्याचा चोख हातखंडा प्रयोगही सफल झाला नाही. जेथे हिंदूंचे मताधिक्य आहे त्या मतदारसंघांतही ममता बॅनर्जी यांनी विजय मिळविला. या काळात पंतप्रधान मोदी हे बांगलादेशातही सैर करून आले. बांगलादेशचे निर्माते शेख मुजीबूर रेहमान यांना गांधी शांतता पुरस्कार जाहीर करून तो त्यांच्या कन्या बांगलादेशच्या विद्यमान पंतप्रधान शेख हसीना यांना प्रदान करून आले. त्यामुळे प. बंगालातील मुसलमान मते मिळतील असा कयास असावा, पण तसे घडले नाही. ममता बॅनर्जी यांचा पक्षही उभा-आडवा फोडला, पण तरीही विषम लढाईत तृणमूल काँग्रेसने मोदी-शहांच्या राजकारणास धूळ चारली. हे ऐतिहासिक व सगळय़ांसाठी प्रेरणादायी आहे.

प. बंगालातील लढाईत डावे व काँग्रेस कुठे औषधालाही उरले नाहीत. डाव्यांची जागा भाजपने घेतली. मतांची बेरीज वाढली तरी त्या प्रमाणात जागा जिंकता आल्या नाहीत. भारतीय जनता पक्षाने अनेक मोहरे उभे केले. केंद्रीयमंत्री बाबुल सुप्रियोपासून पत्रकार स्वपन दासगुप्तांपर्यंत. ते सगळे आडवे झाले. ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने अत्यंत स्पष्ट बहुमत मिळविले. मोदी-शहा यांनी कृत्रिम ढगांचा गडगडाट केला, पण जमिनीवरील लाट ही प्रत्यक्षात ममता बॅनर्जी यांचीच होती. दोनशेवर जागा जिंकून ममता यांनी ते सिद्ध केले. प. बंगालातील ममतांचा विजय हा मोदी-शहा-नड्डांचा दारुण पराभव आहे व या पराभवाची नैतिक जबाबदारी कोणी घ्यायची ते त्यांनीच ठरवायला हवे, असा खोचक सवालही शिवसेनेनं केला आहे.

भाजपच्या हाती नव्याने काय लागले?

देशाचे पंतप्रधान व गृहमंत्री एखादी निवडणूक व्यक्तिगत प्रतिष्ठेची करतात तेव्हा जय-पराजयाचे श्रेय त्यांनीच स्वीकारायचे असते व राजकारणात तीच परंपरा आहे. पाच राज्यांतील निवडणूक निकालांमुळे देशात असे घडेल आणि तसे घडेल अशा पैजा लागल्या, पण नवे काय घडले? आसाम सोडले तर भारतीय जनता पक्षाने सर्वत्र मातीच खाल्ली आहे. केरळात डाव्यांनी पुन्हा सत्ता राखली. तेथे सामना काँग्रेसशी झाला. तामीळनाडूत ‘द्रमुक’ने सत्ता मिळवली. पुद्दूचेरी ही 30 आमदारांची विधानसभा. तेथे भाजपने विजय मिळवला. आसामात काँग्रेसने चांगली लढत देऊनही भाजपने पुन्हा विजय मिळविला. मग भाजपच्या हाती नव्याने काय लागले? असा सवालही शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून केला आहे.  (Shivsena Saamana Editorial On West Bengal Election Result)

संबंधित बातम्या : 

5 States Result : पाच राज्यात कोणत्या पक्षाला किती जागा? 5 राज्यांचा संपूर्ण निकाल

West Begnal results 2021: ममता बॅनर्जींच्या विजयामागे शरद पवारांचा अदृश्य हात; भाजप नेत्याचा गौप्यस्फोट