“दिल्लीत विष्णूचे तेरावे अवतार अन् बारामतीत…” संजय राऊतांचा सणसणीत टोला

देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार नकल दाढी, मिशी, टोप्या आणि वेषांतर करुन फिरत आहेत, ते सर्वजण अल-रशीदची पोरं आहेत, असे संजय राऊत यावेळी म्हणाले.

दिल्लीत विष्णूचे तेरावे अवतार अन् बारामतीत... संजय राऊतांचा सणसणीत टोला
| Updated on: Jul 31, 2024 | 10:21 AM

Sanjay Raut Criticism On Ajit Pawar : महायुतीत सहभागी होण्यापूर्वी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी वेषांतर करुन अनेकदा अमित शाहांची भेट घेतल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. जवळपास १० ते १५ वेळा ही भेट झाल्याचेही बोललं जात आहे. यावरुन आता विरोधक आक्रमक झाले आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणावरुन अमित शाह आणि अजित पवारांवर घणाघात केले. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार नकल दाढी, मिशी, टोप्या आणि वेषांतर करुन फिरत आहेत, ते सर्वजण अल-रशीदची पोरं आहेत, असे संजय राऊत यावेळी म्हणाले.

“महाराष्ट्रात नाटक, संगीत, चित्रपट, राजकारण्याला फार मोठी परंपरा आहे. मराठी लोकं मराठी नाटक आणि रंगभूमीवर प्रेमही करतात. त्यामुळे आपले नवे बारामतीचे जे विष्णूदास आहेत. त्यांना विष्णूदास यासाठी म्हणावं लागले, कारण विष्णूचे 13 वे अवतार दिल्लीत आहेत. त्यामुळे ते विष्णूदास”, असा टोला संजय राऊतांनी लगावला.

“ही सर्वजण अल-रशीदची पोरं”

“आता त्यांची जी नाट्यकला समोर आलेली आहे, या अभिनय कलेमागचे नेपथ्य, दिग्दर्शन आणि पडद्यामागची पटकथा हे सुद्धा हळहळू बाहेर येईल. पण महाराष्ट्राने यासर्व घडामोडींचा आनंद घ्यायला हवा. एकनाथ शिंदे यांनी मौलवीचा वेष धारण करुन दिल्लीत प्रवेश केला होता, आधी अहमद पटेल यांना भेटण्यासाठी आणि त्यानंतर अमित शाह यांना भेटण्यासाठी हे वेषांतर केले होते. छगन भुजबळ यांनी बेळगावातील लढ्यासाठी केलेले वेषांतर महाराष्ट्राला आवडले होते. त्यासाठी त्यांनी महाराष्ट्रासाठी लाठ्याकाठ्या खाल्ल्या, तुरुंगवास भोगला. पण आता देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार नकल दाढी, मिशी, टोप्या आणि वेषांतर करुन फिरत आहेत, ते सर्वजण अल-रशीदची पोरं आहेत”, असेही संजय राऊत म्हणाले.

“हा चिंतनाचा विषय”

“राष्ट्रीय सुरक्षा कशाप्रकारे धोक्यात येऊ शकते, याचे हे उत्तम उदाहरण आहे. हा प्रकार महाराष्ट्राला आणि देशाला घातक आहे. तुम्ही खोटी नावं, खोटी वेषांतर, खोटे बोर्डिंग पास, खोटी ओळखपत्र तयार करुन आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन प्रवास करता. CRPF ची सुरक्षा व्यवस्था अमित शाहांच्या हातात आहे. याचा अर्थ अमित शाहांनी CRPF ला यांना सोडा हे आधीच कळवलं होतं. दाऊद इब्राहिम, नीरव मोदी, विजय मल्या, मेहुल चौकशी, टायगर मेमन यांना सोडलंय का? हा आता चिंतनाचा विषय आहे”, असेही संजय राऊतांनी म्हटले.