सोलापूरचे पालकमंत्री महिन्यात दुसऱ्यांदा बदलले, आव्हाडांच्या जागी ‘या’ मंत्र्याकडे धुरा

| Updated on: Apr 22, 2020 | 3:19 PM

इंदापूरचे आमदार असलेल्या दत्ता भरणे यांच्याकडे सोलापूर जिल्ह्याचे पालकत्व सोपवण्यात आले आहे. (Dattatray Bharane Solapur Guardian Minister)

सोलापूरचे पालकमंत्री महिन्यात दुसऱ्यांदा बदलले, आव्हाडांच्या जागी या मंत्र्याकडे धुरा
Follow us on

सोलापूर : राष्ट्रवादीचे मंत्री दत्ता भरणे यांच्याकडे सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या जागी जलसंधारण राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या महिन्याभरात दोनवेळा सोलापूरचे पालकमंत्री बदलले आहेत. (Dattatray Bharane Solapur Guardian Minister)

इंदापूरचे आमदार असलेल्या दत्ता भरणे यांच्याकडे सोलापूर जिल्ह्याचे पालकत्व सोपवण्यात आले आहे. 15 दिवसांपूर्वीच जितेंद्र आव्हाडांकडे सोलापूरच्या पालकमंत्रिपदाचा पदभार देण्यात आला होता. परंतु लॉकडाऊनमुळे आव्हाडांना सोलापूरला जाताच आले नाही. त्यामुळे आता दत्ता भरणे यांना सोलापूरच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे

दत्ता भरणे यांच्याकडे आतापर्यंत एकाही जिल्ह्याचे पालकमंत्रिपद नव्हते. सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), मृद व जलसंधारण, वने, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय, सामान्य प्रशासन या विभागांचे राज्यमंत्री म्हणून ते काम पाहतात.

हेही वाचा सोलापूरच्या पालकमंत्रिपदावरुन वळसे पाटलांची उचलबांगडी, जितेंद्र आव्हाडांना जबाबदारी

दरम्यान, दत्तात्रय भरणे उद्याच प्रशासनाची बैठक घेणार आहेत. “सोलापूर ‘कोरोना’मुक्त करण्याला प्राधान्य देणार”, अशी प्रतिक्रिया सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. (Dattatray Bharane Solapur Guardian Minister)

31 मार्चला सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्रिपद कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटलांकडून काढून जितेंद्र आव्हाड यांच्याकडे देण्यात आले होते. वळसे पाटील पालकमंत्रिपदाबाबत फार इच्छुक नव्हते. त्यांच्याविरोधात सोलापूर जिल्हावासियांनी सातत्याने तक्रारी केल्या होत्या. पालकमंत्री झाल्यापासून केवळ दोनदा त्यांनी जिल्हा दौरा केला होता. तर जितेंद्र आव्हाड यांना कोणत्याही पालकमंत्री पदाची जबाबदारी दिली नव्हती.

हेही वाचा : दोन जिल्ह्यांचे पालकमंत्री तात्पुरते बदलले, कॉंग्रेसच्या ‘या’ मंत्र्यांना जबाबदारी

गेल्याच आठवड्यात, ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर दोन जिल्ह्यांचे पालकमंत्री तात्पुरत्या स्वरुपात बदलण्यात आले. कॉंग्रेस मंत्री विश्वजीत कदम यांच्या जागी कॉंग्रेस मंत्री सुनील केदार यांच्याकडे भंडाऱ्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी तूर्तास सोपवण्यात आली आहे. तर शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या जागी गडचिरोलीचे पालकमंत्रिपद कॉंग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे तात्पुरते सुपूर्द करण्यात आले आहे.