दोन जिल्ह्यांचे पालकमंत्री तात्पुरते बदलले, कॉंग्रेसच्या 'या' मंत्र्यांना जबाबदारी

विश्वजीत कदम यांच्या जागी सुनील केदार यांच्याकडे भंडाऱ्याच्या पालकमंत्रिपदाची, तर एकनाथ शिंदे यांच्या जागी विजय वडेट्टीवार यांच्याकडे गडचिरोलीच्या पालकमंत्रिपदाची तात्पुरती जबाबदारी सोपवण्यात आली आहे. (Bhandara Gadchiroli Guardian Minister Changed)

दोन जिल्ह्यांचे पालकमंत्री तात्पुरते बदलले, कॉंग्रेसच्या 'या' मंत्र्यांना जबाबदारी

मुंबई : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर दोन जिल्ह्यांचे पालकमंत्री तात्पुरत्या स्वरुपात बदलण्यात आले आहेत. कॉंग्रेस मंत्री विश्वजीत कदम यांच्या जागी कॉंग्रेस मंत्री सुनील केदार यांच्याकडे भंडाऱ्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी तूर्तास सोपवण्यात आली आहे. तर शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या जागी गडचिरोलीचे पालकमंत्रिपद कॉंग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे तात्पुरते सुपूर्द करण्यात आले आहे. (Bhandara Gadchiroli Guardian Minister Changed)

कॉंग्रेस नेते विश्वजीत कदम हे भंडाऱ्याचे पालकमंत्री होते. मात्र त्यांचा पदभार आता सुनील केदार यांना देण्यात आला आहे. ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर शासन निर्णयामध्ये अंशत: बदल केल्याचा उल्लेख परिपत्रकात करण्यात आला आहे

माजी मंत्री छत्रपाल केदार यांचे सुपुत्र असलेले सुनील केदार हे सावनेर मतदारसंघातून आमदार आहेत. सुनील केदार यांच्याकडे पशु दुग्धविकास मंत्रालयाच्या कॅबिनेट मंत्रिपदाची धुरा आहे. सुनील केदार यांच्याकडे आधीच वर्ध्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी होती, त्यात आता भंडाऱ्याची भर पडली आहे.

हेही वाचा : सोलापूरच्या पालकमंत्रिपदावरुन वळसे पाटलांची उचलबांगडी, जितेंद्र आव्हाडांना जबाबदारी

दुसरीकडे, गडचिरोलीचे पालकमंत्रिपद तूर्तास विजय वडेट्टीवार यांना देण्यात आले आहे. याआधी शिवसेनेचे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे गडचिरोलीचे पालकमंत्री होते.

विजय वडेट्टीवारांकडे मदत आणि पुनर्वसन तसेच बहुजन कल्याण खात्याची धुरा आहे. वडेट्टीवार हे चंद्रपूरमधून आमदार आहेत. त्या जिल्ह्याचं पालकत्वही त्यांच्याकडे आहे. आता गडचिरोलीची अतिरिक्त जबाबदारीही सध्या वडेट्टीवार यांना मिळाली आहे.

गेल्याच महिन्यात सोलापूरचे पालकमंत्री बदलले होते. सोलापूरचा भार राष्ट्रवादीचे मंत्री दिलीप वळसे-पाटलांकडून काढून राष्ट्रवादीचेच मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याकडे देण्यात आला होता.

(Bhandara Gadchiroli Guardian Minister Changed)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *