अंधेर नगरी चौपट राजा, सोनिया गांधी मोदी सरकारवर कडाडल्या

| Updated on: Dec 14, 2019 | 3:41 PM

काळा पैसा आणण्यासाठी नोटबंदी करण्यात आली, तो काळा पैसा आलाच नाही, अशी टीका सोनिया गांधी यांनी रामलीला मैदानात काँग्रेसच्या भारत बचाओ रॅलीदरम्यान केली

अंधेर नगरी चौपट राजा, सोनिया गांधी मोदी सरकारवर कडाडल्या
Follow us on

नवी दिल्ली : देशात ‘अंधेर नगरी चौपट राजा’ असं वातावरण असल्याची टीका काँग्रसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केली. राजधानी दिल्लीतील रामलीला मैदानात काँग्रेसने आयोजित केलेल्या ‘भारत बचाओ रॅली’त त्या बोलत होत्या. ‘सबका साथ, सबका विकास’ कुठे आहे? असा सवालही सोनिया गांधींनी (Sonia Gandhi in Bharat Bachao Rally) विचारला.

‘देश वाचवायचा असेल, तर कठोर संघर्ष करावा लागेल. देशात बेरोजगारीचं वातावरण आहे. युवकांना नोकरीसाठी दारोदार हिंडावं लागत आहे. शेतकऱ्यांच्या समस्या वाढत आहेत. त्यांना शेतीसाठी नवीन सुविधा मिळत नाहीत. देशात ‘अंधेर नगरी चौपट राजा’सारखं वातावरण आहे. सबका साथ, सबका विकास’ कुठे आहे? असं अख्खा देश विचारत आहे. काळा पैसा आणण्यासाठी नोटबंदी करण्यात आली, तो काळा पैसा आलाच नाही. याचा तपास व्हायला हवा की नाही?’ असा प्रश्न सोनिया गांधी यांनी विचारला.

‘सध्याचं वातावरण असं आहे, की मनात आलं आणि कलम बदलले, राज्याचा दर्जा बदलला, राष्ट्रपती राजवट हटवा किंवा कोणतंही विधेयक पारित करा. दैनंदिन वस्तूंच्या किमतींनी मर्यादा ओलांडल्या आहेत. देशातील युवकांसमोर अंधःकार आहे. चुकीच्या धोरणांमुळे कामधंदे संपुष्टात आले. कंपन्या कोणाला आणि का विकल्या जात आहेत?’ असा सवालही सोनिया गांधींनी उपस्थित केला.

मी राहुल सावरकर नाही राहुल गांधी आहे : राहुल गांधी

‘या लोकांनी आणलेला नागरिकत्व कायदा आसाम आणि ईशान्येकडील राज्याप्रमाणे भारताचा आत्मा टराटरा फाडेल. हे लोक संविधानाचे पालन करण्याचा दिखावा करतात आणि दररोज संविधानाची वाट लावतात’, असा घणाघातही सोनिया गांधी (Sonia Gandhi in Bharat Bachao Rally) यांनी केला.


मी राहुल सावरकर नाही, राहुल गांधी आहे. मरण पत्करेन पण माफी मागणार नाही, असा आक्रमक पवित्रा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी घेतला. राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी मोदी सरकारवर निशाणा साधत भारतात ‘मेक इन इंडिया’ नसून ‘रेप इन इंडिया’ झाल्याचं म्हटलं होतं. या वक्तव्याचा भाजपकडून लोकसभेत निषेध करण्यात आला होता. राहुल गांधींनी देशाची माफी मागावी, अशी मागणीही भाजपने केली होती. यावर राहुल गांधींनी प्रत्युत्तर दिलं.