स्पॅनिश वृत्तपत्रात भारतीय अर्थव्यवस्थेचं चित्र काय? Zerodha च्या संस्थापकांसह भाजप नेते चिडले

भाजप खासदार पीसी मोहन यांनी हा कार्टूनचा फोटो ट्विट केला. त्यात त्यांनी लिहिलंय, भारतीय अर्थव्यवस्थेच्या वृद्धीच्या काळात.. एका स्पॅनिश साप्ताहिकाने केलेली ही टॉप स्टोरी.

स्पॅनिश वृत्तपत्रात भारतीय अर्थव्यवस्थेचं चित्र काय? Zerodha च्या संस्थापकांसह भाजप नेते चिडले
Image Credit source: social media
| Updated on: Oct 15, 2022 | 11:05 AM

स्पेनच्या वृत्तपत्रात (Spanish News Paper) भारतीय अर्थव्यवस्थेचं (Indian Economy) चित्रण करणारं एक व्यंगचित्र (Cartoon) दाखवण्यात आलंय. यावरून सोशल मीडियात प्रचंड संताप व्यक्त होतोय. भारताच्या वेगानं वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेवर व्यंगाद्वारे टीका करण्यात आली आहे. या चित्रात एका आलेख पेपरवर अर्थव्यवस्थेचा ग्राफ दाखवण्यात आलाय. तर हा ग्राफ एका बिन वाजवणाऱ्या गारुड्यामुळे वर जातोय, असं चित्रात दिसंतय.

भारताने नुकतंच ब्रिटनला मागे सारत जगातल्या पाचव्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेचा मान पटकावला आहे. त्यामुळे स्पेनने असे व्यंगचित्र छापल्याचा आरोप भारतीय नेटिझन्सकडून करण्यात येतोय.

याविषयी आलेल्या वृत्तांनुसार, La Vanguardia या स्पॅनिश वृत्तपत्राने ९ ऑक्टोबर रोजी Dinero (Money) या पुरवणीच्या मुखपृष्ठावर हे कार्टून प्रकाशित केलंय. त्यावर The hour of the Indian economy या शीर्षकाखाली हे कार्टून देण्यात आलंय.

आशिया खंडातील हा एक देश एक शक्तीच्या रुपात चीनच्याही पुढे जातोय… असं या कार्टूनच्या वर लिहिण्यात आलंय. सोशल मीडियावर असंख्य लोकांनी हे शएअर केलंय. यात भाजप खासदार पीसी मोहन यांचाही समावेश आहे.

भाजप खासदार पीसी मोहन यांनी हा कार्टूनचा फोटो ट्विट केला. त्यात त्यांनी लिहिलंय, भारतीय अर्थव्यवस्थेच्या वृद्धीच्या काळात.. एका स्पॅनिश साप्ताहिकाने केलेली ही टॉप स्टोरी.

भारतीय अर्थव्यवस्थेची प्रतीमा मजबूत होतेय. स्वातंत्र्याच्या एवढ्या वर्षानंतरही भारताची प्रतिमा गारुड्याच्या हाती अशा प्रकारे चित्रीत करणे हे मूर्खपणाचे आहे. तसेच ही विदेशी मानसिकता बदलणं कठीण आहे, अशी टिप्पणीही त्यांनी केलीय.

Zerodha या ऑनलाइन स्टॉक ट्रेडिंग कंपनीचे संस्थापक आणि सीईओ नितिन कामत यांनीही या वृत्तपत्रातील कार्टूनवर टीका केली. वृत्तपत्राचा फोटो शेअर करत त्यांनी लिहिलंय, जगाचं लक्ष वेधलं जातंय, ही चांगली बाब आहे. पण भारताचं प्रतिनिधित्व करण्यासाठी एका गारुड्याचा वापर करणं हे अपमानकारक आहे.