‘ऊन, वारा आणि आज तर पावसाला तोंड देत एसटी कर्मचारी आस लावून, त्यांच्याकडे लक्ष द्याल का?’

| Updated on: Nov 17, 2021 | 10:20 PM

आठ दिवसांपासून ऊन, वारा सहन करत हे एसटी कर्मचारी आझाद मैदानावर आंदोलनाला बसले आहेत. आज संध्याकाळी अचानक पाऊस सुरु झाला. मात्र, अशा स्थितीतही भाजप नेते आणि एसटी कर्मचारी भिजलेल्या अवस्थेत आंदोलनस्थळी बसून राहिले. यावरुन विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केलीय.

ऊन, वारा आणि आज तर पावसाला तोंड देत एसटी कर्मचारी आस लावून, त्यांच्याकडे लक्ष द्याल का?
भर पावसात आझाद मैदानात एसटी कर्मचारी आणि भाजप नेत्यांचं आंदोलन
Follow us on

मुंबई : ऐन दिवाळीपासून पुकारलेला एसटी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अद्यापही सुरुच आहे. मुंबईतील आझाद मैदानातही आठवड्याभरापासून शेकडो एसटी कर्मचारी, भाजप आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत ठाण मांडून बसले आहेत. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आज पुन्हा एकदा या आंदोलनात सहभागी झाले होते. गेल्या आठ दिवसांपासून ऊन, वारा सहन करत हे एसटी कर्मचारी आझाद मैदानावर आंदोलनाला बसले आहेत. आज संध्याकाळी अचानक पाऊस सुरु झाला. मात्र, अशा स्थितीतही भाजप नेते आणि एसटी कर्मचारी भिजलेल्या अवस्थेत आंदोलनस्थळी बसून राहिले. यावरुन विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केलीय. (Agitation of ST workers and BJP leaders in heavy rains, Devendra Fadnavis criticizes State government)

राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. मात्र, अन्य विषय पुढे आणत एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्याचं काम केलं जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. फडणवीस यांनी ट्विट करत, ‘विविध विषयांच्या धुराळ्यात एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न आहे तसेच कायम आहेत! ऊन, वारा आणि आज तर पावसाला तोंड देत 10 दिवसांपासून एसटी कर्मचारी आस लावून आहेत! दिशाभूल, संभ्रम, खोटे आरोप,फसवाफसवी, माध्यम व्यवस्थापन इत्यादी काही काळ बाजूला ठेऊन त्यांच्या समस्यांकडे लक्ष द्याल का?’ असा सवाल फडणवीसांनी केलाय.

सदाभाऊ खोतांचा पवारांना खोचक टोला

आमदार सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना खोचक टोला लगावत जोरदार टीका केलीय. कुणीतरी पावसात भिजला आणि सत्ता आणली. आता एसटी कामगार पावसात भिजतोय, त्यांचं विलिनीकरण करा, अशी मागणी खोत यांनी केलीय. जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही, आम्ही आंदोलन करणार. सरकारला दिसत नाही का की पाऊस पडतोय. एसटी कामगार पावसात आहे. बीएमसी हेडकॉटर समोर आहे. मात्र, एसटी कर्मचाऱ्यांकडे कुणाचे लक्ष नाही, पाणी नाही, लाईट नाही, जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आझाद मैदानातच मुक्काम राहिल, असं भाजप नेत्यांनी स्पष्ट केलंय.

संपात हस्तक्षेप करा, पडळकरांची राज्यपालांकडे मागणी

आतापर्यंत 36 एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. या आत्महत्या रोखण्यासाठी सातवा वेतन आयोग लागू करावा आणि एसटी महामंडळाचं सरकारमध्ये विलिनीकरण करण्यात यावं या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. हा संप चिघळत चालला आहे. सरकारही या संपाकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे या संपात हस्तक्षेप करून मार्ग काढा, अशी विनंती भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना केली.

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनवर जाऊन भेट घेतली. या शिष्टमंडळात रयक क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत, अॅड. गुणरत्न सदावर्ते, अॅड. जयश्री पाटील आणि पाच महिला कर्मचारी उपस्थित होत्या. राज्यपालांच्या भेटीनंतर गोपीचंद पडळकर यांनी मीडियाशी संवाद साधला.

इतर बातम्या : 

राज्यात कुठेही दंगल झाली तरी भाजपच्या माथी लावण्याचं ठाकरे सरकारचं काम, भाजपचा आरोप

शरद पवारांचा पुन्हा एकदा फडणवीसांना टोला, तर गडकरीचं कौतुक; हिंसाचाराच्या घटनेवरही भाष्य

Agitation of ST workers and BJP leaders in heavy rains, Devendra Fadnavis criticizes State government