ST Workers Strike : एसटी कामगारांकडून केलेल्या वसुलीतून पडळकर, खोतांचा हिस्सा किती? अतुल लोंढेंचा सवाल

| Updated on: Apr 12, 2022 | 6:35 PM

काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांच्यावर गंभीर आरोप करत, खोचक सवाल केलाय. एसटी कामगारांकडून केलेल्या वसुलीतून पडळकर, खोतांचा हिस्सा किती? असा प्रश्न लोंढे यांनी विचारलाय.

ST Workers Strike : एसटी कामगारांकडून केलेल्या वसुलीतून पडळकर, खोतांचा हिस्सा किती? अतुल लोंढेंचा सवाल
अतुल लोंडे, गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या निवासस्थानी 100 पेक्षा अधिक एसटी कर्मचाऱ्यांनी जोरदार राडा घातला. हा राडा भाजप आणि वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांच्या सांगण्यावरुन घालण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून करण्यात येतोत. त्यानंतर सदावर्ते यांना अटकही करण्यात आली. या प्रकरणात आता गंभीर आरोप केले जात आहेत. सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात पैसे गोळा केल्याचा आरोप करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्यातील काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) आणि आमदार सदाभाऊ खोत यांच्यावर गंभीर आरोप करत, खोचक सवाल केलाय. एसटी कामगारांकडून केलेल्या वसुलीतून पडळकर, खोतांचा हिस्सा किती? असा प्रश्न लोंढे यांनी विचारलाय.

‘एसटी कामगारांच्या पाच महिन्यातील आंदोलनादरम्यान त्यांच्याकडून प्रत्येकी 550 रुपये घेतल्याचे उघड झाले आहेत. जवळपास 70 ते 75 हजार एस. टी. कामगार या आंदोलनात सहभागी झाले होते. या आंदोलनाचे नेतृत्व माजी राज्यमंत्री आ. सदाभाऊ खोत व भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले होते. या दोघांना या वसुलीतील किती हिस्सा मिळाला? कशाच्या आधारे ही वसुली केली? याची चौकशी करून दोषींवर कारवाई केली पाहिजे’, अशी मागणी अतुल लोंढे यांनी केली आहे.

दोन्ही आमदारांना या वसुलीतील हिस्सा मिळाला का?

अतुल लोंढे म्हणाले की, हजारो एस. टी. कामगारांनी त्यांच्या मागण्यांसाठी आझाद मैदानात पाच महिने आंदोलन केले. महाविकास आघाडी सरकार या कामगारांच्या पाठीशी पहिल्यापासून खंबीरपणे उभे होते, पगारवाढीसह त्यांच्या इतर मागण्याही मान्य केल्या आहेत. परंतु यादरम्यान कामगारांकडून प्रत्येकी 550 रुपये घेतले गेल्याचे उघड झाले आहे. काही एस. टी. कामगारांनी त्यांच्याकडून पैसे घेतल्याच्या बातम्या प्रसार माध्यमांवर प्रसारित झाल्या आहेत. या आंदोलनाचे नेतृत्व माजी राज्यमंत्री आमदार सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले होते. या दोन्ही आमदारांना या वसुलीतील हिस्सा मिळाला का? कोणत्या आधारे त्यांनी ही वसुली केली ? या वसुलीतील वाटपावरूनच सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांचे वकील सदावर्ते गुणरत्ने यांच्याशी वाद होऊन बाहेर पडावे लागले का, याचा खुलासा झाला पाहीजे, असंही लोंढे यांनी म्हटलंय.

गुणरत्न सदावर्तेंवर नेमका आरोप काय?

गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांकडून पैसे गोळा केल्याचा आरोप स्वारगेट आगारातील एसटी कर्मचारी संजय मुंडे यांनी केला आहे. ज्या लोकांवर कारवाई करण्यात आली नव्हती त्यांच्याकडून प्रत्येकी तीनशे रुपये तर ज्यांच्यावर कारवाई झाली होती, त्यांच्याकडून प्रत्येकी 540 रुपये आंदोलन काळात गोळा करण्यात आल्याचे मुंडे यांनी म्हटले आहे. आम्ही स्वारगेट आगारामधून अजय कुमार गुजर यांच्या सागण्यावरून कर्मचाऱ्यांकडून पैसे गोळा केले, पहिल्या टप्प्यात आम्ही गुणरत्न सदावर्ते आणि जयश्री पाटील यांच्याकडे एक लाख दहा हजार रुपये जमा केल्याचा आरोप मुंडे यांनी केला आहे. मुंडे यांनी केलेल्या या आरोपांमुळे आता वादात आणखी भर पडली आहे.

इतर बातम्या : 

Chitra Wagh : ‘तुझं चामडं सांभाळ, ते कुठल्याही क्षणी सोलण्याची व्यवस्था आहे’, चित्रा वाघांचा मेहबुब शेख यांना इशारा

INS Vikrant Case : ‘किरीट सोमय्या पळपुटं नेतृत्व नाही, ते चौकशीला सामोरं जातील’, प्रवीण दरेकरांचं वक्तव्य, सरकारवर निशाणा