
नाशिक : सध्या आदित्य ठाकरे आणि सुहास कांदे (Suhas Kande) यांच्यातील वाद चांगलाच पेटल्याचं पाहायला मिळतंय. दोन्ही बाजूने दावे प्रतिदावे केले जात आहेत. अश्यात सुहास कांदे यांनी आदित्य यांना वाघ तर म्हटलंय सोबतच त्यांना टोलाही लगावला आहे. “आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) वाघ आहेत, पण मटण खायच्याऐवजी डाळ भात खात आहेत. उद्धवसाहेब आमदार गेले पण तुमच्या आजू बाजूचे पोट भरणारे बडवे तिथेच आहेत”, असं म्हणत सुहास कांदे यांनी आदित्य यांना टोला लगावला आहे. शिवाय ठाकरेंच्या भेटी विषयी कांदेंनी आपली खंत बोलून दाखवली आहे. “आदित्य आणि उद्धव ठाकरे यांना 100 पत्र दिली. पण एकाही पत्राला उत्तर नाही म्हणून योजना रखडल्या.एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि दुसऱ्या दिवशी परवानगी मिळाली. माझ्या दुबईवरून आणलेल्या जाड चपला घासल्या गेल्या पण आदित्य ठाकरे काही भेटले नाहीत”, असं कांदे म्हणालेत.
आदित्य ठाकरेंनी आम्हाला निधी दिला नाही. त्यांनी माझ्या काही प्रश्नांची उत्तरं दिली पाहिजेत. त्यांनी उत्तरे दिली तर मी तात्काळ आमदारकीचा राजीनामा देईन, असं आव्हानच शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी दिलं होतं. तसेच आदित्य ठाकरे यांना भेटून जाब विचारणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. आदित्य ठाकरे यांनी ही कांदे यांच्यावर पलटवार केला आहे. मी गद्दारांना उत्तर देणार नाही. त्यांना मी बांधिल नाही. मी उत्तरं द्यावीत एवढी गद्दारांची लायकीही नाही, अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी सुहास कांदे यांना फटकारले आहे.
आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर आहेत, मात्र त्यांच्या हातात शिवबंधन नाही हेदेखील सुहास कांदे यांनी निदर्शनास आणून दिले. एकनाथ शिंदे यांच्या गटात गेलेल्या आमदारांमध्ये शिवसैनिकांचं रक्त नाही. त्यांनी उद्धव ठाकरेंच्या पाठित खंजीर खुपसला असा आरोप केला जातोय, मात्र सुहास कांदे यांनी आदित्य ठाकरेना प्रत्युत्तर दिले.