माझी निष्ठा पवार साहेबांवर, पक्ष सोडणार नाही : सुनील तटकरे

सचिन पाटील

| Edited By: |

Updated on: Jul 31, 2019 | 5:04 PM

मी मतदारसंघातील कामासाठी चंद्रकांत पाटलांना भेटलो, असं स्पष्टीकरण सुनील तटकरे (NCP MP Sunil Tatkare) यांनी दिलंय. माझी निष्ठा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार साहेब यांच्यावर असल्यामुळे पक्ष सोडणार नाही, असं ते म्हणाले.

माझी निष्ठा पवार साहेबांवर, पक्ष सोडणार नाही : सुनील तटकरे

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगडचे खासदार सुनील तटकरे (NCP MP Sunil Tatkare) यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली आणि राजकीय चर्चा सुरु झाल्या. सद्यपरिस्थितीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना भेटायला गेलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्याचा भाजप प्रवेशच निश्चित मानला जातो. पण मी मतदारसंघातील कामासाठी चंद्रकांत पाटलांना भेटलो, असं स्पष्टीकरण सुनील तटकरे (NCP MP Sunil Tatkare) यांनी दिलंय. माझी निष्ठा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार साहेब यांच्यावर असल्यामुळे पक्ष सोडणार नाही, असं ते म्हणाले.

रायगड मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करताना मतदारसंघातील अनेक प्रश्नांसाठी मंत्र्यांना भेटावं लागतं. फक्त चंद्रकांत पाटीलच नव्हे, तर चार मंत्र्यांना मी भेटलो, ज्यात शिवसेनेच्या मंत्र्यांचाही समावेश आहे. काही सचिवांनाही भेटलो. रस्त्यांच्या कामासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून चंद्रकांत पाटलांची भेट घेऊन निधी मंजूर करुन घेण्याचा प्रयत्न केला. निष्ठा ही पवार साहेबांवर आहे. पक्ष सोडण्याचं वृत्त हे पसरवण्यात आलंय. आम्ही पुन्हा एकदा मोठी झेप घेऊ, असा विश्वासही तटकरेंनी व्यक्त केला.

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांचा भाजप प्रवेश

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. शरद पवारांचे कट्टर समर्थक आणि राष्ट्रवादीचे संस्थापक सदस्य मधुकर पिचड, त्यांचे सुपुत्र वैभव पिचड, साताऱ्याचे राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले, मुंबईच्या वडाळा येथील काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर, नवी मुंबईतील ऐरोलीचे राष्ट्रवादीचे आमदार संदीप नाईक आणि राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मुंबईतील गरवारे क्लब हाऊसमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा रंगला.

भाजपमध्ये आज प्रवेश केलेल्या नेत्यांची नावे

  1. राष्ट्रवादीचे नेते मधुकर पिचड
  2. राष्ट्रवादीचे आमदार वैभव पिचड
  3. राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले
  4. राष्ट्रवादीचे आमदार संदीप नाईक
  5. काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर
  6. राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ
  7. नवी मुंबईचे माजी महापौर सागर नाईक
  8. महात्मा फुले यांच्या वंशज नीता हुले
  9. माजी पोलीस उपायुक्त साहेबराव पाटील

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI