
आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकी होणार आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी यासाठी तयारी सुरु केली. अशातच आता ईव्हीएम मशीनला पुन्हा एकदा विरोधकांकडून विरोध होताना दिसत आहे. प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी यावरून भाजपला टोला लगावला आहे. तसेच निवडणूक आयोगाला याबाबत पत्र लिहिणार असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत व्हिव्हिपॅट मशीन वापरायची नाही असा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे. यावर बोलताना प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी म्हटलं आहे की, ‘आता तर व्हिव्हिपॅट मिळणार नाही. त्यामुळे निवडणूक घेण्यापेक्षा भाजप कार्यालयात ठपके मारा. कारण 2-3 देश सोडले तर ईव्हीएम मशीन वापरली जात नाही. त्यामुळे मी निवडणूक आयोगाला पत्र लिहिणार आहे की, मतदान हे शाळेत न ठेवता भाजपच्या कार्यालयात ठेवा.’
बच्चू कडू यांनी आज राज ठाकरे यांची भेट घेतली. यावर बोलताना बच्चू कडू म्हणाले की, ‘राज ठाकरेंसोबत राजकीय बैठक नव्हती. शेतकऱ्यांचा विषय हाच एक संवाद होता. आमचा हेतू एकच आहे की शेतकऱ्यांना न्याय मिळाला हवा. शेतकरी अडचणीत आहे आणि सरकार त्याची टिंगल करतय. दुष्काळ पडला की कर्जमाफी असं मुख्यमंत्री म्हणतात ही टिंगल आहे. भाव भेटत नाही हे दुष्काळापेक्षा मोठ दुःख शेतकऱ्याचं असतं.’
पुढे बोलताना बच्चू कडू म्हणाले की, ‘राज साहेबांना मी निमंत्रित केलेलं आहे की आमच्या भागात यावं आणि शेतकऱ्यांना संबोधित कराव. मुंबईनेही आंदोलन सुरू असताना एक दोन तास शेतकऱ्यांच्या पाठी उभ रहावं अशी आमची इच्छा आहे. हा विषय कुठल्या जाती धर्माचा किंवा एका पक्षाचा नाहीये. आमचा अजेंडा हा निवडणुकीचा नाहीये तर शेतकऱ्याच्या अस्तित्वाचा आहे. सध्या आम्ही शेतकऱ्यांसाठी लढतो आहोत तर त्यात जात धर्म पक्ष न आणता लढायला हवं. शेतकऱ्यांचा विषय जनतेपर्यंत, सरकारपर्यंत पोहोचू द्यात. 9 तारखेला रक्षाबंधन आहे आम्ही मोदी साहेबांना आणि देवेंद्रजींना वेदनेची राखी बांधणार आहोत.’
बच्चू कडू यांच्या आंदोलनाबाबत बोलताना मनसे नेते बाळा नांदगावकर म्हणाले की, बच्चू कडू यांनी काढलेल्या शेतकऱ्यांसाठीच्या पदयात्रेत, चक्काजाम आंदोलनात राज साहेबांच्या आदेशानुसार मी सहभागी झालो होतो. त्यांची भावना शेतकऱ्यांसाठी आहे त्यात काहीही चुकीच नाही. मराठवाडा, विदर्भात शेतकरी आणि दिव्यांग बंधूंच्यासाठी त्यांची भावना आहे. तिथे साहेबांची एक सभा व्हावी अशी बच्चू कडू यांची इच्छा आहे. त्यानुसार साहेबानीही सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. शेतकऱ्यांसाठी मुंबई बंद रहावी यावर आम्हीही सकारात्मक आहोत त्याला आम्ही पाठिंबा देऊ.