‘महायुतीत जागावाटपावरुन खूनखराबा होऊ नये, एवढीच अपेक्षा’, ठाकरे गटाच्या खासदाराच वक्तव्य

"नवाब मलिक यांच्याविषयी कारवाई सूडाने केली आहे. नवाब मलिक हे देवेंद्र फडणवीसांसह काही लोकांविषयी सातत्याने पुराव्यासह बोलत होते. ते पुरावे समोर आल्याने सीबीआय, एनआयएला कारवाई करावी लागली"

महायुतीत जागावाटपावरुन खूनखराबा होऊ नये, एवढीच अपेक्षा, ठाकरे गटाच्या खासदाराच वक्तव्य
शिंदे गट आणि अजितदादांना विधानसभेच्या किती जागा मिळणार ?
| Updated on: Aug 20, 2024 | 10:36 AM

“महायुतीमधील तीन पक्षात एक वाक्यता नाहीय. महायुती हा शब्द गोंडस आहे. ही महायुती नसून संघर्ष आहे. रोज त्यांच्या मारामाऱ्या सुरु आहेत. पण त्या दिसत नाहीत. एक मंत्री आपल्या सहकारी पक्षाच्या नेत्याला मारण्याची, थोबाड फोडण्याची भाषा करतो. यावरुन प्रकरण किती टोकाला गेलय ते दिसतं. हे कशावरुन चाललय. मुंबई-गोवा महामार्ग स्वर्गात जाण्याचा मार्ग बनलाय. मुंबईतील अनेक रस्ते, कोकणातील रस्ते, मुंबई-नाशिक रस्ता जाऊन पाहा. ठेकेदारांकडून लूट सुरु आहे. पीडब्ल्यूडी, नगरविकास खातं शिंदे गटाच्या ATM मशीन्स आहेत. काम होत नाहीयत. सरकार पैशांच्या मागे लागलय” अशी टीका संजय राऊत यांनी केली.

“ज्या मंत्र्याविषयी, रस्त्यांबाबत शिंदे गटाच्या नेत्याने सांगितलं, ते सत्य आहे. प्रकरण मारामारीपर्यंत गेलय. जागावाटपात त्यांच्या मारामाऱ्या होणार आहेत. एकमेकाच्या जागा पाडल्या जातील. जागावाटपाच्या बैठकीत खूनखराबा होऊ नये, एवढीच अपेक्षा” असं संजय राऊत म्हणाले. काँग्रेस आमदार झीशान सिद्दीकी आणि नवाब मलिक अजित पवारांसोबत दिसलेत, तरी काँग्रेस कारवाई करत नाही, या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले की, “तो काँग्रेसचा प्रश्न आहे. विधानसभेची मुदत संपत आली आहे. नवाब मलिक यांच्याविषयी कारवाई सूडाने केली आहे. नवाब मलिक हे देवेंद्र फडणवीसांसह काही लोकांविषयी सातत्याने पुराव्यासह बोलत होते. ते पुरावे समोर आल्याने सीबीआय, एनआयएला कारवाई करावी लागली”

‘खटले खोटे आहेत, हे जाहीर करावं’

“नवाब मलिक विधानसभेत सरकारी बाकावर बसले होते, तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना पत्र लिहिलं. हे कसं योग्य नाही. भाजपाच्या त्यांच्याविषयीच्या भावना फडणवीसांनी लिहिल्या. ते पत्र देवेंद्र फडणवीस यांनी मागे घ्यावं किंवा नवाब मलिक यांच्यावरील खटले खोटे आहेत, हे जाहीर करावं” असं संजय राऊत म्हणाले.