ठाकरे सरकारचं पहिलं अर्थसंकल्पीय अधिवेशन, भाजपच्या हल्ल्यासमोर सरकारची कसोटी

| Updated on: Feb 24, 2020 | 9:34 AM

राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरु होत आहे.

ठाकरे सरकारचं पहिलं अर्थसंकल्पीय अधिवेशन, भाजपच्या हल्ल्यासमोर सरकारची कसोटी
Follow us on

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन (Thackeray Govt First Budget Session) आजपासून सुरु होत आहे. राज्याची आर्थिक स्थिती, अर्थसंकल्प, शेतकरी कर्जमाफी या मुद्द्यांवर अधिवेशनात चर्चा होईल. तर सीएएविरोधातील (CAA) आंदोलनं, एल्गार प्रकरणाचा तपास, कोरेगाव-भीमा या मुद्यांवर सत्ताधारी तसेच विरोधक दोन्ही बाजूंकडील सदस्य आक्रमक होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच हे अधिवेशन चांगलेच गाजणार असल्याची चर्चा आहे.

अधिवेशनात कोणते मुद्दे गाजणार?

या अधिवेशनात राष्ट्रीय मुद्दे गाजण्याची चिन्हे आहेत (Thackeray Govt First Budget Session). CAA, NPR, NRC वरुन विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे. तसेच, महाविकास सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी, जलयुक्त शिवार बंद करण्याची चर्चा, कायदा-सुव्यवस्था, स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव प्रस्ताव इत्यादी मुद्दे विरोधक मांडण्याची शक्यता आहे.

अधिवेशनात विरोधी पक्ष भाजपच्या हल्ल्यासमोर सरकारची कसोटी लागणार आहे. कारण, भाजप आपल्या मुद्यांवरुन ठाकरे सरकारवा कोंडीत पकडण्याच्या तयारीत आहे. तर तीन वेगवेगळ्या पक्षाचं सरकार या सर्वांमध्ये अधिवेशनात एकसंघ राहातील की नाही?, हा प्रश्न आहे. कारण, तीन वेगवेगळ्या पक्षाचं सरकार जरी स्थापन झालं असलं तरी CAA, NPR, NRC वर या तीनही पक्षाचे वेगवेगळे विचार आहेत. त्यामुळे त्यांच्यातील अंतर्गत मतभेद आता पुढे येऊ लागले आहे. त्यामुळे ठाकरे सरकारसाठी हे अधिवेशन एक मोठं आव्हान ठरणार आहे.

दुसरीकडे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शेतकरी कर्जमाफीच्या पूर्तीवर जोर देताना दिसतील. कर्जमाफी झालेल्या 68 गावांच्या लाभार्थ्यांची यादी आज जाहीर होणार आहे. 35 लाख शेतकऱ्यांना एप्रिल अखेरपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याचंही सांगण्यात येत आहे. प्रत्येक शेतकऱ्याला 2 लाखांची कर्जमाफी मिळणार आहे.

ठाकरे सरकारविरोधात भाजपचं 400 ठिकाणी आंदोलन

अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी भाजपकडून राज्यात 400 ठिकाणी राज्य सरकारविरुद्ध धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी, हिंदुत्व, स्वातंत्र्यवीर सावरकर तसेच महिलांवरील अत्याचार या सर्व मुद्द्यांसाठी (Thackeray Govt First Budget Session) भाजप ठाकरे सरकारविरोधात आंदोलनं करणार आहेत.