
1990 मध्ये गुजरातचे सोमनाथ मंदिर ते अयोध्या अशी 1,700 किमीची राम रथयात्रा काढणारे भाजपचे लालकृष्ण अडवाणी देशभरात चर्चेत आले होते. अडवाणी यांच्या या रथयात्रेमुळे देशात अयोध्येतील राम मंदिराचा मुद्दा प्रखरतेने चर्चेत आला. रामजन्मभूमी आंदोलनासाठी लालकृष्ण अडवाणी यांनी स्वयंसेवकांना एकत्रित करण्यासाठीच ही राम रथयात्रा काढली होती. त्यांच्या या राम रथयात्रेमुळेच 1991 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपला अनपेक्षित असे यश मिळाले. देशात काँग्रेस नंतर भाजप दुसरा सर्वात मोठा पक्ष बनला. त्यानंतर 1992 मध्ये बाबरी मशीद पाडण्यात आली. मात्र, त्यापूर्वी अडवाणी यांनी प्रक्षोभक भाषण केल्याचा आरोप ठेवण्यात आला. सीबीआयच्या विशेष न्यायालयात हा खटला सुरु होता. दुसरीकडे, अयोध्येतील श्रीराम मंदिर आणि वादग्रस्त बाबरी मशीद प्रकरण सर्वोच्च न्यायालयात सुरु होते. 9 नोव्हेंबर 2019 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने यावर निकाल दिला. बाबरी मशीद अवैध होती असे या निकालात म्हटले. यामुळे अयोध्येत राम मंदिर बनण्याचा मार्ग मोकळा झाला. त्यानंतर 30 सप्टेंबर 2020 रोजी लालकृष्ण अडवाणी यांची सीबीआयच्या विशेष न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. ...