शिवसेनेचा एकही आमदार निवडून येणार नाही हा राणेंचा विनोद, त्यांनी आत्मपरीक्षण करावं, उदय सामंत यांचा निशाणा

| Updated on: Jan 15, 2021 | 7:58 PM

शिवसेनेचा एकही आमदार निवडून येणार नाही हा राणेंचा विनोद आहे. राणेंना सध्या आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे, असा टोला उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी लगावला.

शिवसेनेचा एकही आमदार निवडून येणार नाही हा राणेंचा विनोद, त्यांनी आत्मपरीक्षण करावं, उदय सामंत यांचा निशाणा
Follow us on

सिंधुदुर्ग : कोकणात शिवसेनेचा एकही आमदार निवडून येणार नाही, असा दावा करणाऱ्या भाजप नेते नारायण राणेंचा (Narayan Rane) उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री, शिवसेना नेते उदय सामंत (Uday Samant) यांनी समाचार घेतलाय. कोकणात शिवसेनेचा एकही आमदार निवडून येणार नाही हा राणेंचा विनोद आहे. राणेंना सध्या आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे, असा टोला उदय सामंत यांनी लगावला. (Uday Samant Criticized Narayan Rane)

“आम्ही सर्व तीन-चारदा निवडून आलेलो शिवसेनेचे लोकप्रतिनिधी आहोत. आम्ही पराभव कधीच पाहिला नाही. राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक घ्यायचं हे भाजपचं आव्हान आमच्यासाठी फार छोटं आणि कमकुवत आव्हान आहे”, असं म्हणत उदय सामंत यांनी राणेंना ललकारलं.

“आम्हाला आव्हान देणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. एकदा पराभव ठीक आहे, दोनदा-तीनदा पराभव होतो. कोकणवासियांनी ज्यांना नाकारलं त्यांच्याबद्दल बोलून त्यांना मला मोठं करायचं नाही”, असा टोमणाही त्यांनी राणेंना लगावला.

पुढे बोलताना उदय सामंत म्हणाले, “कोकणात यानंतर शिवसेनेचा एकही आमदार निवडून येणार नाही हा राणेंचा फार मोठा विनोद आहे. मी सर्वसामान्य ग्रामपंचायत सदस्यांनाही हलक्यात घेत नाही ,राणेंना तर घेणारच नाही”.

पत्रकारांनी उदय सामंत यांनी माजी मंत्री दीपक केसरकर यांच्या नाराजीबाबत विचारलं. यावर बोलताना ते म्हणाले, “जिल्ह्याला मंत्रीपद मिळावं अशी प्रत्येकाची भावना असते. त्यामुळे केसरकरांचं म्हणणं वावग आहे असं मला वाटत नाही”. दीपक केसरकरांची नाराजी दूर करणार काय? या प्रश्नाला मात्र त्यांनी बगल देऊन उत्तर दिलं.

“मला पालकमंत्री पद मिळालं म्हणून केसरकर नाराज नाहीत. पालकमंत्री म्हणून त्यांनी चांगलं काम केलं आहे. इतिहासात कोणी निधी आणला नाही तेवढा निधी केसरकरांनी आणला. त्यामुळे आमच्यासाठी ते आदरणीय आहेत. दीपकभाई ज्येष्ठ आहेत, त्यामुळे त्यांना माझा कान धरण्याचा अधिकार आहे”, असंही ते म्हणाले.

(Uday Samant Criticized Narayan Rane)

संबंधित बातम्या

शिवसेनेला कोकणातून हद्दपार करणार; नारायण राणेंची गर्जना

नारायण राणेंनी नसती स्वप्नं पाहू नयेत, शिवसेनची स्पर्धा करण्याचे तुमचे दिवस कधीच गेले; विनायक राऊतांचा हल्लाबोल