राजे, सरदार कितीही गेले तरी राष्ट्रवादी तरेल : धनंजय मुंडे

| Updated on: Sep 13, 2019 | 3:50 PM

राजे, सरदार कितीही गेले तरी सामान्य माणसांच्या जीवावर राष्ट्रवादी काँग्रेस तरेल. पवारसाहेबांनी इतका जीव लावूनही ते पक्ष सोडत असतील तर प्रवेश दुर्दैवी आहे, असंही धनंजय मुंडे (Dhananjay Munde on Udayanraje) म्हणाले.

राजे, सरदार कितीही गेले तरी राष्ट्रवादी तरेल : धनंजय मुंडे
Follow us on

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशावर राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde on Udayanraje) यांनी टीका केली आहे. उदयनराजे यांनी पक्ष का सोडला हेच कळत नाही. पण राजे, सरदार कितीही गेले तरी सामान्य माणसांच्या जीवावर राष्ट्रवादी काँग्रेस तरेल. पवारसाहेबांनी इतका जीव लावूनही ते पक्ष सोडत असतील तर प्रवेश दुर्दैवी आहे, असंही धनंजय मुंडे (Dhananjay Munde on Udayanraje) म्हणाले.

भाजपकडून दबावाचं राजकारण केलं जात असल्याचा आरोपही धनंजय मुंडेंनी केला. प्रत्येक जण प्रवेश करताना काहीतरी दबावामुळे जातोय. भाजप दबावाचं राजकारण करत आहे. रयत ही राष्ट्रवादीबरोबर कायम राहते. प्रत्येक नेत्याला वाटतं की त्यांनी पक्ष सोडला म्हणजे जनता त्यांच्याबरोबर जाईल. पण असं होत नाही, जनतेला खरं काय ते कळतं. भाजपने अत्यंत खालच्या पातळीवरचं राजकारण सुरु केलंय, असंही ते म्हणाले.

“मनसेबाबत अजून चर्चा नाही”

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभेत आघाडीसोबत यावं याबद्दल कोणतीही औपचारिक चर्चा अद्याप झालेली नाही, अशी माहिती धनंजय मुंडेंनी दिली. मात्र राज्यातील सर्व विरोधी पक्ष एकत्र यावेत आणि त्यात राज ठाकरे असावेत असं आघाडीतल्या काही जेष्ठ नेत्यांचं वैयक्तीक मत असल्याचंही ते म्हणाले. मनसेने विधानसभा लढवावी का लोकसभेसारखं परत शांत रहावं हा त्यांच्या पक्षाचा वैयक्तीक प्रश्न आहे. कारण आता त्यांच्याही मागे ईडी लागली आहे आणि चौकशी झाल्यानंतर पुढे काय झालं हे तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे, असंही ते म्हणाले.

उदयनराजेंचा भाजप प्रवेश ठरला

उदयनराजे शुक्रवारीच राजीनामा देऊन भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हे उदयनराजेंचा राजीनामा स्वीकारण्यासाठी दिल्लीत आहेत. उदयनराजे  लोकसभा अध्यक्षांकडे रात्री आठ वाजता राजीनामा सादर करतील. त्यानंतर भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्या उपस्थितीत उदयनराजेंचा भाजपप्रवेश होईल. उदयनराजेंसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना होण्याची शक्यता आहे.