Uddhav Thackeray Interview : पुन्हा शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल का? उद्धव ठाकरे म्हणतात, मग माझ्या लढ्याला काय अर्थ!

| Updated on: Jul 27, 2022 | 8:54 AM

मुलाखतीत संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना पुन्हा शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल का? असा सवाल केला. त्यावर उद्धव ठाकरे यांनीही का नाही होणार, तो जर करायचा नसेल तर माझ्या लढायला काय अर्थ आहे, असं सांगत आपला इरादा स्पष्ट केला.

Uddhav Thackeray Interview : पुन्हा शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल का? उद्धव ठाकरे म्हणतात, मग माझ्या लढ्याला काय अर्थ!
उद्धव ठाकरे यांची मुलाखत
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार व्हावं लागलं. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळलं. त्यानंतर अनपेक्षितपणे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनले. शिंदे यांच्यासारख्या सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री करुन भाजपनं बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचं इच्छा पूर्ण केल्याच दावा भाजपनं केला. दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेत्यांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्या गटातील आमदार, भाजपवर जोरदार टीका करण्यात येतेय. याच मुद्द्यावरुन मुलाखतीत संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना पुन्हा शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल का? असा सवाल केला. त्यावर उद्धव ठाकरे यांनीही का नाही होणार, तो जर करायचा नसेल तर माझ्या लढायला काय अर्थ आहे, असं सांगत आपला इरादा स्पष्ट केला.

‘जे शिवसेनाप्रमुखांना वचन आहे ते आजही कायम’

संजय राऊत यांनी ठाकरेंना प्रश्न विचारला की, शिवसेनेचा मुख्यमंत्री पुन्हा होईल? त्यावर ठाकरे म्हणाले की, का नाही होणार. तो जर करायचा नसेल तर माझ्या लढायला काय अर्थ आहे. माझं जे शिवसेनाप्रमुखांना वचन आहे ते आजही कायम आहे. मी शिवसेनेचा पक्षप्रमुख आहे. माझा हेतू नव्हता की मी मुख्यमंत्री होईल. वचन पूर्ण केल्यानंतर सुद्धा मी काय दुकान बंद करून बसणार नाही. शिवसेना मला वाढवायची आहे. ती जर का वाढवण्याचा प्रयत्न मी सोडणार असेल तर मी कशाला पक्षप्रमुख हवा आहे. आज तुम्ही आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याकडे बघत आहात. सगळीकडे प्रचंड गर्दी आहे, सगळीकडे ही चर्चा आहे की यांना धडा शिकवायचा. मी साधारणतः ऑगस्टमध्ये बाहेर पडणार आहे. याचं कारण असं की गेल्या आठवड्यात मी जिल्हाप्रमुखांना काही सूचना दिलेल्या आहेत. जास्तीत जास्त सदस्य नोंदणी, तसेच सक्रिय कार्यकर्त्यांशी नोंदणी करा. ती आत्ता चालू आहे. आता जसे आदित्य ठाकरे फिरत आहेत, जेव्हा राज्यामध्ये मी फिरायला लागेल तेव्हा सर्व नेते माझ्यासोबत फिरतील. तेव्हा राज्याचा जो काही एक दौरा होईल त्याच्यामध्ये या लोकांना त्या दौऱ्यात येण्यासाठी ही काम सोडावी लागतील, म्हणून मी तेवढ्यासाठी थांबलो आहे. हे सगळं होऊ द्या त्यानंतर मी बाहेर पडणार. शिवसेनेचा तुफान महाराष्ट्रामध्ये आहे, लोकांच्या मनामध्ये हृदयामध्ये तुफान आहे, असा दावा उद्धव ठाकरे यांनी केलाय.

मुंबई महानगरपालिका निवडणुका लवकर जाहीर झाल्या पाहिजेत

अलीकडच्या या सगळ्या राजकारणात तुम्हाला मुंबईचा घात करण्याची योजना दिसते का? असाही प्रश्न संजय राऊतांनी विचारला. त्यावर ठाकरेंनी उत्तर दिलं की, मुंबईचा घात करणे हे त्यांचं जुनं स्वप्न आहे. मागे मी एकदा म्हटलं होतं जसा रावणाचा जीव हा बेंबीत होता, तसं या यांचा जीव मुंबईत आहे, असा विचित्र प्रकार आहे. दिल्ली मिळाली तर यांना मुंबई पाहिजेय. त्या वेळेला जी युती झाली होती त्यावेळेस बाळासाहेब ठाकरे यांचे एक वाक्य आहे, तुम्ही ते सांभाळा मी मुंबई सांभाळतो. पण तुम्ही देशात तर आम्हाला पसरू देतच नाही, पण लाल किल्ल्यावरती जाऊन भाषण करण्याची वगैरे तशी आपली इच्छाही नाही. पण निदान महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये सुद्धा तुम्ही आम्हाला जागा देणार नसाल तर अर्थ काय?

हे सुद्धा वाचा

मुंबई महानगरपालिका निवडणुका लवकर जाहीर झाल्या पाहिजेत. मुंबईवर पुन्हा भगवा फडकणार. अनेकांनी म्हटलं होतं की या निवडणुकीनंतर शिवसेना राहणार नाही. मात्र मुंबईमध्ये मुंबईकर म्हणून सर्वजण एकत्र झालेले आहेत. तेव्हा यांनी मराठी मराठी, हिंदुत्वामध्ये फोडाफोडीचा प्रयत्न केला होता. ते सुद्धा आता मला येऊन भेटत आहेत. मराठी माणसांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न ते आजही करत आहेत. मुंबईकर आज निवडणुकांची वाट बघतोय. त्यामुळे माझं मत आहे लवकरात लवकर निवडणुका घ्याव्यात. केवळ मुंबईच्या नाहीतर राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका घ्याव्यात, असं आव्हानच ठाकरे यांनी भाजपला दिलंय.