मै आपका नौकर रहना चाहता हूँ, सावरकरांचं ‘ते’ पत्रं फडणवीस यांनी वाचावं; राहुल गांधी यांचा टोला

आमची लढाई ही विचारधारेची आहे. ही लढाई समजून घेतली पाहिजे. लोकशाहीत एक राजकीय पक्ष दुसऱ्या राजकीय पक्षाशी लढतो. युद्धाच्या मैदानात देशाच्या संस्था त्यात फेयरनेसचं वातावरण निर्माण करतात.

मै आपका नौकर रहना चाहता हूँ, सावरकरांचं ते पत्रं फडणवीस यांनी वाचावं; राहुल गांधी यांचा टोला
मै आपका नौकर रहना चाहता हूँ, सावरकरांचं 'ते' पत्रं फडणवीस यांनी वाचावं; राहुल गांधी यांचा टोला
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 17, 2022 | 1:52 PM

अकोला: मै आपका नौकर रहना चाहता हूँ, असं पत्रच स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलं होतं. मी माझ्या मनाचं काही सांगत नाही. देवेंद्र फडणवीसयांना हे पत्रं वाचायचं असेल तर ते वाचू शकतात, अशा शब्दात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपवर हल्लाबोल केला. राहुल गांधी अकोल्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी भर पत्रकार परिषदेत सावरकरांच्या माफीनाम्याचं पत्रंही दाखवलं.

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा अकोल्यात आली आहे. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. ही कागदपत्रं माझ्याकडे आहेत. सावरकरांचं इंग्रजांना लिहिलेलं हे पत्रं आहे. इंग्रजीत लिहिलं आहे. सर, मै आपका नोकर रहना चाहता हूँ. हे मी म्हटलं नाही. तर सावरकर यांनी म्हटलंय. फडणवीसांना वाचायचं असेल तर त्यांनी हे पत्रं वाचावं. सावरकरांनी इंग्रजांची मदत केली होती, असा पुनरुच्चार राहुल गांधी यांनी केला.

आमची यात्रा रोखायची असेल तर रोखा. काहीच अडचण नाही. कुणाचा काही विचार असेल तर तो मांडला पाहिजे. सरकारला वाटलं ही यात्रा रोखली पाहिजे तर त्यांनी रोखण्याचा प्रयत्न करावा, असं आव्हानच त्यांनी दिलं.

माझा फोकस भारत जोडो यात्रेवर आहे. या यात्रेला अजून दोन तीन महिने लागणार आहेत. लोकांचं प्रेम मिळत आहे. लोकांकडून शिकायला मिळत आहे, असं राहुल गांधी म्हणाले. आमचं काम भारत जोडोचं आहे. आम्हाला भारत जोडायचा आहे. हे आम्हाला करायचं आहे. आम्ही इतर गोष्टींचा विचार करत नाहीये, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

89 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी महात्मा गांधी अकोल्यात आले होते. राहुल गांधीही अकोल्यात आले. या योगायोगाबद्दल त्यांना विचारण्यात आलं. त्यावर महात्मा गांधींशी माझी तुलना करू नका. महात्मा गांधींनी देशासाठी आयुष्य वाहिलं. देशाला मार्ग दाखवला. मी त्यांच्यासमोर काहीच नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

काँग्रेसची खरी विचारधारा ही विदर्भात आहे. नैचरल काँग्रेसी हे विदर्भातच आहेत. त्यामुळेच महात्मा गांधी यांनी वर्ध्याची निवड केली असावी, असं त्यांनी सांगितलं.

आमची लढाई ही विचारधारेची आहे. ही लढाई समजून घेतली पाहिजे. लोकशाहीत एक राजकीय पक्ष दुसऱ्या राजकीय पक्षाशी लढतो. युद्धाच्या मैदानात देशाच्या संस्था त्यात फेयरनेसचं वातावरण निर्माण करतात. पण आज परिस्थिती वेगळी आहे. विरोधी पक्षाची प्रेसवर कंट्रोल नाही. भाजपचा प्रेस, इन्स्टिट्यूशन आणि न्यायालयावर दबाव आहे, असा आरोप त्यांनी केला.